हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात भाजपची एकहाती सत्ता असून नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा नेता अद्याप विरोधी पक्षांना मिळाला नसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असताना त्यांनी आपलं मत व्यक्त केले. मोदींना पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक असून याबाबत राष्ट्रवादी सहकार्याची भूमिका घेईल असे पवारांनी स्पष्ट केले.
देशात तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत, याबाबत प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी मोदी सरकारविरुद्ध कुणी नेतृत्व करावं हा मुळात मुद्दाच नसल्याचं स्पष्ट केलं. पण मो़दींना पर्याय उपलब्ध करणं गरजेचं असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं.
मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधातील लढय़ाचे नेतृत्व कोणी करावे हा मुद्दा नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करावे की आणखी कोणी हा विषयच नाही. पण, एक पर्याय देणे आवश्यक आहे. लोकांची तशी इच्छा आहे आणि पर्याय उभा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य राहणार आहे असे पवारांनी स्पष्ट केले.