डेळेवाडीत पुन्हा राष्ट्रवादी विजयी : विरोधकांना 3 जागा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील
डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकत सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मात्र, विरोधी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटानेही 3 जागांवर यश मिळवत कमबॅंक केले आहे. डेळेवाडी येथे मागील निवडणुकीत एकहाती राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता होती. सरपंच पदासाठी अर्ज दाखल न झाल्याने पद रिक्त राहिले आहे.

सत्ताधारी राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून – प्रभाग 2 मधून सर्जेराव वसंतराव बाबर, लता सुभाष बाबर. प्रभाग 3 मधून भीमराव मारुती बाबर, शुभांगी विजयकुमार बाबर यांनी विजय मिळवला आहे. तर विरोधी गटातून प्रभाग 1 मधून विजया संजय बाबर, माया अंकुश खबाले, उमाताई प्रकाश बाबर यांनी विजय मिळवला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी गटातून माजी सरपंच व पॅनेल प्रमुख तात्यासो पांडुरंग बाबर यांचा पराभव झाला आहे.

सत्ताधारी गट माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांना मानणाऱ्या सत्ताधारी हनुमान, मथुरादास, भैरवनाथ विकास पॅनेलचे नेतृत्व काशीनाथ बाबर, प्रकाश बाबर, पंढरीनाथ मोरे, अनिल बाबर, प्रताप बाबर, मुकंद बाबर, उमेश बाबर, संतोष बाबर, संपत बाबर यांनी केले. तर पालकमंत्री शंभूराज देसाई, रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या श्री. मथुरादास ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच सुरेश विष्णू बाबर, संजय बाबर, संदीप बाबर, प्रकाश बाबर, संजय बाबर यांनी केले.