हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील पाच साखर कारखान्यांवर छापा टाकला आहे. संबंधित साखर कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याने यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली. “सोमवारी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली म्हणून भाजपने संतापून ही प्रतिक्रिया दिली आहे. लखमीपूरच्या घटनेला भाजप जबाबदार आहे. भाजपकडून धाडसत्र करून लक्ष वेगळ्या दिशेने वळवण्याचे काम केले जात असल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे,” असे पाटील म्हणाले.
आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर धाड टाकली आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लखीमपूर येथील हिंसेवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच भाजपने आयकर विभागाच्या मदतीने या साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
अगोदर भाजपचे नेते आमच्या नेत्यांचे नाव घेतात. त्यांच्यानंतर ईडी, आयकर विभाग, सीबीयकडून त्यांच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या जातात. भाजपकडून एकप्रकारे आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात आहे. यात काही शंका नाही. सध्या आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात असल्या तरी आमचा कायद्यावर विश्वास असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.