आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या, आता हे महाशय…; राणेंची पवारांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केली आहे. मात्र भाजप नेते निलेश राणे यांनी मात्र रोहित पवारांवर टीका केली आहे. अध्यक्षपदी निवड होण्यामागे रोहित पवारांचे क्रिकेटमध्ये योगदान काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.

निलेश राणे यांनी खोचक ट्विट करत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं अभिनंदन पण अध्यक्षपदी निवड होण्यामागे नेमकं त्यांचं क्रिकेटमध्ये योगदान काय हे समजलं नाही. त्यांच्या आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या हे महाशय काय आणतात बघूया अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, काल महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीच्या बैठकीनंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची बिनविरोध निवड झाली आली.

शरद पवार आणि क्रिकेट यांचं नातं संपूर्ण देशाला माहित आहे. शरद पवारांनी अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन, तसेच आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले आहे. क्रिकेटमध्ये शरद पवारांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते. आता रोहित पवार सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकटच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांची कारकीर्द कशी होते हे आता पाहावं लागेल.