हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमी या ना त्या कारणांनी टीका करणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावरून आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना काँग्रेस राष्ट्रवादीची भीती वाटते. ते औषध देखील त्यांना विचारल्या शिवाय घेऊ शकत नाही, ते काय औरंगाबाद नाव बदलणार? असा सवाल करत त्यांनी टोला लगावला आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हिंदू देवदेवतांची विटंबना केल्या प्रकरणी आज नाशिकमध्ये नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आमदारांना लपवून ठेवावी लागण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आज आली आहे. एकेकाळी शिवसेनेच्या धाकाने इतर पक्षाचे आमदार पळायचे आता यांचे आमदार पळत आहे.
यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले की, शिवसेनेचे कट्टर समर्थक हे संजय पवार असून संजय राऊत नाही. संजय राऊत बाहेरून आला आहे. संजय राऊत निर्लज्ज असून त्याने मासाहेब आणि बाळासाहेब यांच्यात वाद असल्याचा लेख लिहिला होता. अशा संजय राऊतला शिवसेनेचे आमदार मत देतीला का? संजय राऊतला लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.