हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात हनुमान चालीसेवरून चांगलेच राजकारण तापले आहे. या राजकारणात आता भाजप आमदार नितेश राणेंनी उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला असून त्यातून मुख्यमंत्र्यांनाच कारवाई करण्यासंदर्भात आव्हान दिले आहे. सत्तार यांनी प्रभू हनुमानाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत मुख्यमंत्री स्वतःला मर्द म्हणता ना.. मग सत्तारांना तुरुंगात दाबून दाखवा, असे म्हंटले आहे.
नितेश राणे यांनी जो व्हिडीओ ट्विट केला आहे. तो व्हिडीओ 2017 रोजीचा असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या दहिगाव शिवारात शेतजमिनीच्या वादातून दोन गटात वादावादी झालेल्या प्रकाराचा आहे. त्यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्च भाषेत धार्मिक भावना दुखावतील अशी शिवीगाळ केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर त्यावेळी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्यावेळी याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
— nitesh rane (@NiteshNRane) April 27, 2022
अब्दुल सत्तार यांच्या या प्रकारावरून राणे यांनी उद्धव ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. “व्हिडीओमध्ये प्रभू हनुमानाला शिव्या देणारा व्यक्ती शिवसेनेचे राज्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करू नये, आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, असे म्हणतात. मग ते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करून त्यांचे हिंदुत्व सिद्ध करून दाखवतील का?, असा सवाल राणेंनी केला आहे.