हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्काना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांना विचारले त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
गडकरी म्हणाले, राज ठाकरेंच्या कुटुंबीयांशी माझे गेल्या 30 वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे, त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी आणि त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी मी शिवतिर्थ या बंगल्यावर पोहोचलो. या भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही. या भेटीकडे कौटुंबिक स्नेहभेट म्हणून बघता येईल,” असेही गडकरींनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकार वर जोरदार प्रहार केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाजपविरोधात एकही शब्द टीका केली नाही. उलट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.