महाराष्ट्रात देखील लवकरच भगवा फडकणार; नितीन गडकरींचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आज नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी मोठे विधान केले.”गोव्यात विजय मिळाला आहे. हा विजय आता थांबणार नाही. हि विजयाची पताका आहे. एक दिवस नक्की महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय जनता पक्षावर चार राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखविला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात विकास कामाला जनतेने मत दिले. आपण जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. हे जातीयवाद, अस्पृश्यता हे समूळ नष्ट करून आत्मनिर्भर भारत कसा निर्माण होईल याचे स्वप्न मोदींनी पाहिलेआहे  ते आपण पूर्ण करत आहोत.

लोकं जात पात बघत नाही, जाती पाहून मत जनता देत नाही, तर जनता विकासाला मत देतात. त्यामुळे कोणीही जाती पातीच राजकारण बंद करा. राज्यात आणि देशात काम केलं तसं महापालिकेत करावं लागणार आहे. शहराच्या विकासाची अनेक काम आपण केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे अनेक विरोधक देव पाण्यात घालून ठेवले होते. त्यावेळी त्यांनी गोव्यात युती केली, सांगितले आम्हीचं निवडून येणार. खरं म्हणजे त्यांची लढाई आमच्याशी नाही, नोटाशी आहे. मात्र, त्यांना नोटापेक्षा अधिक मतं मिळाली नाही. आता लढाई एका शिगेला पोहचतं आहे. आमच्या नेत्याला फसवलं जात आहे. तुमचा भ्रष्टाचारी चेहरा आम्ही लोकांच्या समोर आणणार आहोत. महापालिकेत आम्ही आमची सत्ता आणणार आहोत. वास्तविक महाराष्ट्रात महाविकास आघाडी नाही तर महा वसुली सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.