मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांच्या दबावामुळेच प्रभाग रचनेचा निर्णय बदलला; राऊतांचा हल्लाबोल

Nitin Raut Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज नागपूरात मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे नेते व माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पराभव होण्याच्या भीतीमुळे फडणवीसांच्या दबावामुळेच मुख्यमंत्री शिंदेनी प्रभाग रचनेचा निर्णय बदलला, असा आरोप करत राऊतांनी हल्लाबोल केला.

नागपूरात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर माजी मंत्री राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग रचनेचा विषय मंत्रिमंडळात आला. तेव्हा आपण तीन सदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला होता. पण, त्यावेळी शिंदेनी तीन सदस्यीय प्रभाग रचनेला सहमती दर्शवली होती.

मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रभाग रचनेत भाजपला पराभव होणार असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आघाडी सरकारच्या प्रभाग रचनेचा निर्णय बदलला, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला.

कांदे, बटाट्याची माळ घालून महागाईचा निषेध – 

नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी भेंडी, कारले, कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांची माळ घालून महागाईच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधत निषेध नोंदवला.