हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आज संदर्भात एनसीबीच्यावतीने महत्वाची माहिती देण्यात आली आहे. “कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असे एनसीबीच्या विशेष चौकशी समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही,” असा निष्कर्ष समितीने दिला आहे.
आर्यन खान व ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्यावतीने सांगण्यात आले की, “अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे. दरम्यान, आता एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झाले आहे की आर्यन खानकडे कोणतंही ड्रग नव्हते आणि त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता.
त्याचप्रमाणे अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते, तसेच ते आर्यन खानसाठीच होते हेही तपासात कुठेही सिद्ध झालं नाही. त्यामुळे हा आर्यन खानसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून एनसीबीने 14 जणांना ताब्यात घेतले होते.
चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती. त्यानंतर आर्यन खान काही परदेशी ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात होता आणि त्याच्या चॅटमध्ये ‘हार्ड ड्रग्ज’ आणि ‘मोठ्या प्रमाणात’ असा उल्लेख असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुमारे महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची गेल्या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली होती.