आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही; संजय राऊतांनी हाणला भाजपाला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘मी स्वत: प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वाचा विचार अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं मांडत आलोय. पण आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही. देश तुटावा, आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा. व्होटबँका निर्माण कराव्यात हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता,’ असं खासदार संजय राऊत म्हणाले.एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबरोबरच भाजपच्या कारभारावर परखड भाष्य केलं. ‘देशात गृहयुद्ध सुरू झालंय. ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते भयंकर आहे. प्रत्येक मुद्द्यावर कठोरपणे बोलत असल्यामुळं कदाचित उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवलं जाईल,’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

भारतातील मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याच्या प्रश्नावर त्यांनी आपलं मत मांडलं. ‘भाजपशी संलग्न संस्था, संघटना ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यातून धार्मिक अराजक निर्माण होऊ शकतं. देशात अशांतता आणि अस्थिरता माजू शकते. अशानं एखाद्याचं पंतप्रधानपद, मुख्यमंत्रिपद राहील, पण देश राहणार नाही. याचं भान ठेवलं पाहिजे,’ असंही ते म्हणाले.

‘भारतातील मुस्लिमांची संख्या मोठी आहे. त्यांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही. मात्र, आता ठरवून आपण फाळणीच्या दिशेनं चाललो आहोत. हे असंच सुरू राहिलं तर देश कायमचा तुटेल,’ अशी भीती शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ‘मुस्लिमांमधील काही लोक देशविघातक काम करतात. तसे इतरही आहेत. पण त्यासाठी आपल्याकडं कठोर कायदे आहेत. नक्षलवादाविरुद्धही कायदे आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. हे कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी मोदींची आहे. कोणाला चिरडून राज्य करता येत नाही,’ असा सल्लाही संजय राऊत यांनी भाजप नैतृत्वाला दिला.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.