Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2704

नगरसेवक सक्षम नसल्याने वॉर्डातील रस्त्याचे काम रखडले : जावेद नायकवडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराडमधील वाढीव त्रिशंकू भागातील वॉर्ड नंबर 13 मधील नागरीकांनी वॉर्डातील विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. शिक्षक कॉलनीपासून पुढे जाणारा रस्ता अनेक वर्ष रखडला असून या वॉर्डातील नगरसेवक सक्षम नसल्यानेच हा प्रश्न रखडल्याचा आरोप आंदोलनकर्ते जावेद नायकवडी यांनी केला आहे.

कराड नगरपालिकेची निवडणूक काही दिवसावर येवून ठेपलेली आहे. तरीही अनेक कामे प्रलंबित असल्याने आता आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. प्रभागात रस्ता, पिण्याचे पाणी, ड्रेनेजसारख्या अनेक बाबतीत असुविधा आहेत. त्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचेही आंदोलनाला बसलेल्या नागरीकांनी मत व्यक्त केले.

या आंदोलनामध्ये 13 नंबर वॉर्डमधील आकाश भिसे, ओंकार भंडारी, शृशी रणदिवे, संजय सुर्वे, मशाक शेख सहभागी असून प्रातिनिधिक स्वरुपामध्ये हे सर्वजण आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे वाॅर्ड क्रमांक 13 मधील राजकारण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे.

“महाविकास आघाडीचे सरकार दाऊद समर्पित”; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर अनेक विषयांवरून हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारला आम्ही अनेक प्रश्नावरून घेरणार आहोत. नवाब मलिकांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उभे आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सरकारमधील काही लोक अजूनही दाऊदची धुणी भांडी करतात. हे सरकार दारूला समर्पित आहे. हे सरकार दारूला समर्पित आहे. या अधिवेशनात सरकारचा अहंकार उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

भाजपच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार त्याच्या पाठीशी उभे राहिले आहे. आम्ही काहीही झाले तरी या अधिवेशनात मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत. नवाब मलिकांचा राजीनामा काहीही झाले तरी आम्ही मागणारच आहोत. आम्हाला चहापाण्याला बोलवलं जात आहे. काहीही झाले तरी आम्ही चहा पाण्याला जाणार नाही.

उद्याच्या अधिवेशनात घोषित केलेल्यांना कर्जमाफी, आणि नियमित फेडणाऱ्यांना अनुदान, याबाबतही आमचा आग्रह असणार आहे. मराठा-ओबीसी आरक्षण हे दोन्ही मोठे विषय, खरं म्हणजे छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसावं लागणं हे वाईट, आताही सरकार ते आश्वासन पूर्ण करेल याबाबत सांगता येत नाही. आधी सुरु असलेल्या योजनाही बंद केल्या. महाज्योती बंद पाडण्याचं काम सरकारने केले आहे. ओबीसींवर सरकारचा इतका राग का आहे, हा प्रश्न पडतो. या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा, बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू,असा इशारा फडणवीस यांनी दिला.

युक्रेनमध्ये अडकलेल्या कडेगावातील दोन विद्यार्थीनी सुखरूप, मंत्री विश्वजित कदम यांनी दोन्ही विद्यार्थिनींशी साधला संवाद

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मेडिकल शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेलेल्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील व कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव या दोन विद्यार्थीनी सुखरूप आहेत. या दोन्ही विद्यार्थिंनीसह १५ भारतीय विद्यार्थी खरकीव्हमधून रोमानियाला ट्रेनने रवाना झाले असून पुढे ते हंगेरी बोर्डवर येणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना दिली.

मंत्री कदम यांनी शिवांजली व ऐश्वर्या या दोघीशी व्हिडिओ कॉलिंगवरून संवाद साधला. ‘तुम्ही घाबरू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहे. तुम्हाला देशात आणण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांशी वारंवार चर्चा सुरू असून लवकरच तुम्ही मायदेशात याल,’ असे सांगत कदम यांनी संबंधित विद्यार्थिनींना दिलासा दिला. दरम्यान, मागील ६ दिवसापासून रशियाचा युक्रेनवर भ्याड हल्ला सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री कदम यांचे या विद्यार्थिंनीना मायदेशात आणण्यासाठी युद्धाच्या पहिल्या दिवसापासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारा या विद्यार्थिनीशी संपर्क साधला. यावेळी सुखरूप असल्याचे विद्यार्थिंनी सांगितले. तसेच आज पहाटे आम्ही दोघी आणि १५ भारतीय विद्यार्थी खरकीव्हमधून रोमानियाकडे रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.

वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श होऊन ट्रकला लागली भीषण आग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या आपटा पोलीस चौकीजवळ एका पाईपने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागली. वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श झाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत बर्निंग आयशरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

संजयनगर परिसरात राहणारे चालक ऋषिकेश सुतार हे त्यांच्या जवळील आयशर ट्रक घेऊन स्वरूप टॉकी ते आपटा पोलीस चौकीकडे निघाले होते. सांगली शहरात गॅसच्या पाईपलाईनचे ठिकठिकाणी काम सुरु आहे. यासाठी लागणाऱ्या पाईप घेऊन सदरचा ट्रक निघाला होता. आपटा पोलीस चौकी जवळ असणाऱ्या महापालिकेच्या आरसीएच कार्यालयाजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक आला असता वीज मंडळाच्या उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श या पाईपला झाला.

सदरच्या पाईपला प्लास्टिक इन्सुलिंग कोटींग असल्याने ठिणग्या पडून पाईपला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. काही क्षणातच आग वाढल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरु झाली. याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला नागरिकांनी दिली. दोन बंब आणि सहा जवानांच्या मदतीने धाव घेत या बर्निंग टेम्पोच्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले.

“कितीही गोंधळ घातला तरी मलिकांचा राजीनामा घेणार नाहीच”; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनात भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक कारणांवरून गोंधळ घेतला जाणार आहार. खास करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना ठणकावले आहे. “विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामाआम्ही घेणार नाही म्हणजे नाहीच, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.

मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपकडून सध्या अनेक कारणांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

भारतीय रिटेल गुंतवणूकदार आता NSE च्या ‘या’ प्लॅटफॉर्मवरून यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकतील

नवी दिल्ली । NSE IFSC ला निवडक अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. NSE IFSC हे खरेतर NSE चे इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. ही NSE ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदार अमेरिकन स्टॉक खरेदी करू शकतील आणि शेअर्सच्या डिपॉझिटरी रिसीट देऊ शकतील.

या प्लॅटफॉर्मवर 50 स्टॉकच्या रिसीट खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापैकी आठ 3 मार्चपासून ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील. या स्टॉकमध्ये Alphabet Inc (Google), Amazon Inc, Tesla Inc, Meta Platforms (Facebook), Microsoft corporation, Netflix, Apple आणि Walmart यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व अमेरिकेचे मोठे आणि प्रसिद्ध स्टॉक्स आहेत.

बाकी स्टॉक्सचे काय?
उर्वरित स्टॉक्समध्ये ट्रेडिंग सुरू होण्याची तारीख वेगळ्या परिपत्रकाद्वारे सूचित केली जाईल. या प्लॅटफॉर्मवर यूएस स्टॉकची ट्रेडिंग, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंगची संपूर्ण प्रक्रिया IFSC अथॉरिटीच्या रेग्युलेशन फ्रेमवर्क अंतर्गत पूर्ण केली जाईल.

भारतीय रिटेल गुंतवणूकदार NSE IFSC च्या प्लॅटफॉर्मद्वारे लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) मर्यादेअंतर्गत ट्रेडिंग करण्यास सक्षम असतील. LRS ची तरतूद RBI ने केली आहे. NSE IFSC नुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक खूप सोपी होईल आणि त्याची किंमत जास्त नसेल. गुंतवणूकदारांना या प्लॅटफॉर्मवर अंशात्मक प्रमाणात गुंतवणूक करण्याची सुविधा देखील असेल.

मसूरला सशस्त्र दरोडा : डाॅक्टर पतीसह- पत्नीला मारहण, चोरट्यांकडून रोख रक्कमेसह दागिने लंपास

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मसूर येथे मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून या दरोड्यात डॉक्टर पती-पत्नीस जबर मारहाण करण्यात आली. या दरोड्यात रोख रक्कमेसह दागिण्यांची चोरी झालेली असून पोलिस घटनास्थळी दाखल झालेले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या दरोड्यामुळे मसूरसह तालुक्यात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डाॅक्टर दांम्पत्यांवर कराड येथे सह्याद्री दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मसूर- शामगाव मार्गावर बुधवारी दि. 2 रोजी पहाटे संतोषीमातानगर येथील नविन गावठाणमध्ये असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. संपत हिराप्पा वारे (वय- मूळ रा. कालगाव, ता. कराड), अनिता संपत बारे (वय – 48) यांच्या बंगल्यात दरोडा पडला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला असून दरोड्यात डाॅ. वारे यांच्यासह त्यांच्या पत्नीस जबर मारहाण करण्यात आली. बंगल्यातील रोख रक्कम व दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल, पोलिस उपविभागीय अधिकारी रणजित पाटील, उंब्रज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी भेट दिली असून श्वानपथकास पाचारण करण्यात आले.

या दरोडेखोरांनी बंगल्यात घूसल्यानंतर बंगल्यातील काही खोल्या बाहेरुन बंद केल्या. तर मुख्य रूममध्ये असणाऱ्या डॉक्टर पती-पत्नी यांना मारहाण करीत रुममधील कपाटे साहित्य अस्ताव्यस्त करीत मोठ्या प्रमाणात दागिने व रोख रक्कम लुटून पोबारा केला आहे. विरोध करणाऱ्या डॉ. पती-पत्नीस जबरी मारहाण केली. गस्त घालणारे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या मारहाणीत डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांना सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रशिया – युक्रेन युद्धावरून जो बायडेन यांनी रशियाला थेट दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला आहे. “त्यांच्यावर कोणतं संकट येऊ घातलेलं आहे, याची त्यांना कल्पनाही नाही. या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि नाटो देश युक्रेनच्या एक-एक इंच जमिनीचं रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल,”अशा शब्दांत जो बायडेन यांनी इशारा दिला आहे.

जी बायडेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “त्यांच्यासमोर आता मोठं संकट उभे राहणार आहे. त्यांना अजिबात कल्पना नाही की कोणतं संकट त्यांच्यावर येऊ घातलं आहे. आज मी ही घोषणा करतो की आम्ही आमच्या मित्र देशांसमवेत मिळून रशियाच्या कोणत्याही प्रकारच्या विमानांसाठी आमची हवाई हद्द पूर्णपणे बंद करतोय”, असे जो बायडेन यांनी म्हंटले आहे.

रशियन सैन्याच्यावतीने युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करण्यात आले आहे. किव्हमधील अनेक इमारतींवर रॉकेट्सने हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी युरोपियन संसदेसमोर केलेल्या भाषणात जगासमोर मदतीची विनंती केली आहे. “आम्ही मजबूत आहोत. आम्ही स्वातंत्र्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तुम्ही सिद्ध करा की आम्हाला एकटं सोडणार नाही”, असं आवाहन त्यांनी केले.

सरकार LIC चा IPO पुढे ढकलू शकते, ‘या’ आठवड्यात काय निर्णय होणार जाणून घ्या

LIC IPO Date

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी आली आहे. बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे घाबरलेले सरकार LIC चा IPO पुढे ढकलू शकते.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की,”मार्च अखेरपर्यंत IPO लॉन्च करण्याची तयारी पूर्ण करत असलेले सरकार पुढील आर्थिक वर्षात ते जारी करण्याचा विचार करू शकते. IPO वर अंतिम निर्णय घेण्यासाठी सरकार या आठवड्यात एक बैठक घेणार आहे, ज्यामध्ये LIC ची लिस्टिंग या वर्षी मार्चमध्ये होईल की नाही हे ठरवले जाईल.” या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की,”जागतिक परिस्थिती पाहता IPO ची वेळ बदलली जाऊ शकते.”

सीतारामन यांनीही सूचित केले
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अलीकडेच सांगितले होते की, “मला पूर्वीच्या योजनेनुसार जायचे आहे, कारण ते भारतीय बाजारावर अवलंबून आहे. मात्र, जर जागतिक वातावरण बिघडले तर IPO च्या वेळेवर पुनर्विचार केला जाऊ शकतो. कंपनीने IPO साठी 13 फेब्रुवारी रोजीच बाजार नियामक सेबीकडे DRHP सादर केला आहे.”

मोठे गुंतवणूकदार सरकारवर दबाव आणत आहेत
LIC च्या IPO मध्ये पैसे टाकणाऱ्या बड्या गुंतवणूक बँका लिस्ट पुढे ढकलण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. ते म्हणतात की,”रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात अजूनही अस्थिरता आहे, ज्याचा परिणाम IPO च्या कामगिरीवरही होईल. तो पुढे ढकलला गेला तर स्थिरता आल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही वाढेल, ज्याचा फायदा होईल.”

“आर्यनकडे ड्रग्ज आढळलेच नाही”; एनसीबीच्या विशेष तपास पथकाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आज संदर्भात एनसीबीच्यावतीने महत्वाची माहिती देण्यात आली आहे. “कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असे एनसीबीच्या विशेष चौकशी समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही,” असा निष्कर्ष समितीने दिला आहे.

आर्यन खान व ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्यावतीने सांगण्यात आले की, “अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे. दरम्यान, आता एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झाले आहे की आर्यन खानकडे कोणतंही ड्रग नव्हते आणि त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता.

त्याचप्रमाणे अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते, तसेच ते आर्यन खानसाठीच होते हेही तपासात कुठेही सिद्ध झालं नाही. त्यामुळे हा आर्यन खानसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून एनसीबीने 14 जणांना ताब्यात घेतले होते.

चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती. त्यानंतर आर्यन खान काही परदेशी ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात होता आणि त्याच्या चॅटमध्ये ‘हार्ड ड्रग्ज’ आणि ‘मोठ्या प्रमाणात’ असा उल्लेख असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुमारे महिनाभर कारागृहात राहिल्यानंतर आर्यन खानची गेल्या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका झाली होती.