Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2705

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात जोरदार वाढ, आजची किंमत पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या दरात सध्या जोरदार वाढ झाली असून, त्यामुळे ते 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज एप्रिल डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.6 टक्क्यांनी वाढला आहे तर चांदीचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरला आहे.

सोने 52,000 च्या जवळ पोहोचले
एप्रिल डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.6 टक्क्यांनी वाढून 51,845 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी स्वस्त झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरून 67,900 रुपयांवर आला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,090 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,040 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,140 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,700 रुपये
पुणे – 47,780 रुपये
नागपूर – 47,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,040 रुपये
पुणे -52,090 रुपये
नागपूर – 52,140 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4682.00 Rs 4710.00 0.594 %⌃
8 GRAM Rs 37456 Rs 37680 0.594 %⌃
10 GRAM Rs 46820 Rs 47100 0.594 %⌃
100 GRAM Rs 468200 Rs 471000 0.594 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5113.00 Rs 5130.00 0.331 %⌃
8 GRAM Rs 40904 Rs 41040 0.331 %⌃
10 GRAM Rs 51130 Rs 51300 0.331 %⌃
100 GRAM Rs 511300 Rs 513000 0.331 %⌃

“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा”; संजय राऊतांचा इशारा

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आज आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने क्लीनचिट दिल्यानंतर भाजप आणि किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. “या प्रकरणात बनाव केला गेला होता. आर्यन प्रकरणात जसा बनाव केला तसाच बनाव आमच्या प्रकरणात केला गेला आहे. आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा. तसेच बाप-बेटे तुरुंगात जाणारच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आर्यन खानचा ड्रग्स प्रकरणात काहीच संबंध नसल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणाचे सत्यबाहेर आले आहे. त्या साडेतीन लोकांची नावे मी सांगितली तर ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील. त्यामुळे जसजसे ते आत जातील ते तुम्ही पाहात राहा. काही अधिकाऱ्यांना वाटतं केंद्रात आमचं सरकार आहे. ते भ्रमात आहेत. महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनाही राज्यात झालेल्या भ्रष्टाचार, खंडणीवर तपास करून आरोपींना अटक करण्याचा अधिकार आहे.

आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर त्यावरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “आर्यन खान प्रकरणात एसआयटीनं सांगितलं की त्या मुलाकडे ड्रग्ज सापडलंच नाही. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत केला जातोय. हे उघड होईल. आता मी समोर आलोय. आत्तापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी सगळ्यांचे मुखवटे उतरवून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा”, असे राऊत म्हणाले.

Stock Market : सेन्सेक्स 600 अंकांवर तर निफ्टी 16,600 वर सुरु

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराने बुधवारी पुन्हा एकदा कमकुवतपणाने सुरुवात केली. सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठ्या घसरणीसह ट्रेडींगला सुरुवात केली.

जागतिक घटकाच्या दबावाखाली गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा विक्री सुरू केली आणि बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी खाली आला. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 618 अंकांनी घसरून 55,629.30 वर तर निफ्टी 21 अंकांच्या घसरणीसह 16,593.10 वर उघडला. सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्स 613 अंकांच्या घसरणीसह 55,700 च्या जवळ ट्रेड करत होता. निफ्टीही 144 अंकांनी घसरून 16,650 वर ट्रेड करत होता.

‘या’ शेअर्स वर गुंतवणूकदारांची नजर आहे
जर आपण क्षेत्रानुसार पाहिले तर आज बाजारात संमिश्र कल दिसत आहे. बँक आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण होत असतानाच आज धातूचे शेअर्स कडाडले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वस्तूंच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे गुंतवणूकदार मेटल क्षेत्रातील शेअर्सवर सट्टा लावत आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.

आशियाई बाजारांची सुरुवातही कमकुवतपणाने झाली
बुधवारी आशियातील प्रमुख शेअर बाजारात घसरणीसह ट्रेडींगला सुरुवात झाली. सिंगापूरच्या एक्सचेंजमध्ये 0.78 टक्के आणि जपानमध्ये 1.33 टक्के घसरण झाली. तैवानमधील ट्रेडिंगही 0.32 टक्क्यांच्या तोट्याने सुरू झाले. केवळ दक्षिण कोरियाच्या बाजारात 0.06 टक्क्यांची वाढ दिसून आली. युरोपीय बाजारही एका दिवसापूर्वी सुमारे 4 टक्क्यांच्या घसरणीने बंद झाले.

MBBS चा युक्रेन पॅटर्न अभ्यासणार, युक्रेन पॅटर्नची महाराष्ट्राकडून दखल : अमित देशमुख

Dr Amit Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्या देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये MBBS च्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले आहेत. त्यांना परत मायदेशी आणले जात आहे. युक्रेनमधील वैधकीय शिक्षण अंडी भारतातील वैद्यकीय शिक्षण यावरून काँग्रेस नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी महत्वाचे विधान केले आहे. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण भारताच्या तुलनेत अत्यंत स्वस्त आणि दर्जेदार आहे. त्यामुळे आता युक्रेनमधील स्वस्त आणि दर्जेदार MBBS च्या पॅटर्नचा अभ्यास करणार, असे देशमुख यांनी म्हंटले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, देशातील तब्बल 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी त्या ठिकाणी जात असल्याचे दिसून आले आहे. मराठवाड्यासह राज्यातील हजारो तरुण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेले असल्याचे युद्धामुळे समोर आले. यापूर्वी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्यांची संख्या एवढी मोठी आहे, हे माहितीच नव्हते.

युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणातील शुल्क रचना आणि महाराष्ट्र राज्यातील शुल्क रचना याची माहिती घेतली जाईल. सध्या शुल्क रचनेला कायद्याचा आधार आहे. मात्र, युक्रेनमधील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांची आवश्यक ती नोंद राज्य सरकारने घेतली आहे. त्याबाबतचा अहवाल तयार झाल्यानंतरच पुढे अधिक माहिती दिली जाईल, असे मंत्री देशमुख यांनी म्हंटले.

शहरात मध्यरात्री दोन ठिकाणी आग भडकली; सुदैवाने जिवितहानी नाही

औरंगाबाद – गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या स्फोटाने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्फोटाच्या जोरदार आवाजाने चिकलठाणा परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नेमका आवाज कशाचा आला, काय झाले, याची विचारणा परिसरातील नागरिक रात्री उशीरापर्यंत एकमेकांना करीत होते.

चिकलठाणा विमानतळासमोर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या परिसरात गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारे काही सिलिंडर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास यातील एक सिलिंडर अचानक फुटले. सिलिंडर फुटल्यानंतर उंच उडाले. त्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या काही भागाचे नूकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा कोणी नव्हते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. आवाजामुळे अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री 1 वाजेच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुसऱ्या घटनेत औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या लालाजी एक्झिक्युटिव्ह नावाच्या हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागली मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली होती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. लालाजी एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या कॅफेमधील बॉयलरने पेट घेतल्यामुळे आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळ असलेल्या लाकडांमुळे अग्नितांडव झाल्याचं समजतं.

भाजपाच्या दोन नेत्यांच्यातील कोट्यावधीच्या अर्थिक फसवणूकीचा वाद पोलिस ठाण्यात

फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांच्याच कार्यकर्त्यांने सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर आर्थिक गुन्हे शाखेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तक्रारदार दिगंबर आगवणे या दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. भाजपच्या दोन नेत्यांच्यात कोट्यावधीच्या अर्थिक फसवणूकीचा वादामुळे सातारा व माढा लोकसभा मतदार संघात खळबळ उडाली आहे.

दिगंबर आगवणे यांनी गेल्या पंचवार्षिकला भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. याच आगवणे यांनी सातारा जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटून माढा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केलाय. आगवणे यांनी आरोप केलाय की, फलटण शहरातील विविध जमिनींवर काढलेल्या कर्जातील तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या खात्यात जमा केली आहे. त्यांनी बँकेच्या सर्व देवाण-घेवाणीचे उतारे या तक्रारीबरोबर जोडले आहेत. एवढंच नाही तर दिगंबर आगवणे यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील साखरवाडी येथील जमीन गहाण ठेवून 226 कोटी रुपयांचे कर्ज काढून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार दिगंबर आगवणे आहे तरी कोण?

दिगंबर आगवणे हे गिरवी तालुका फलटण येथील राहणारा असून त्याने विधानसभा निवडणुकीत दोन वेळा काँग्रेस आणि एक वेळा भाजप असे तीन वेळा आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात खांद्याला खांदा लावून दिगंबर आगवणे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम केले. आगवणे हे खासदारांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयात दिगंबर आगवणे यांचाही वाटा असल्याचे स्टेजवरुन खुद्द खासदारांनी सांगितले होते. आणि अचानक दिगंबर आगवणे यांनी केलेल्या तक्रारीमुळे संपूर्ण माढा मतदार संघ आणि फलटण मतदार संघात खळबळ उडाली आहे. या कर्जप्रकरणामुळे मी रस्त्यावर आल्याचे दिगंबर आगवणे सांगत असून त्यांनी आता न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करणार असल्याचही तक्रारीत नमूद केलंय. एवढंच नाही तर माझ्या जिवातालाही धोका असल्याचा उल्लेख त्याने तक्रारी अर्जात केला आहे.

आरोप खोटे असल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं स्पष्टीकरण

या खळबळजनक आरोपानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या झालेल्या सर्व प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय या कर्ज प्रकरणाला इतरही प्रॉपर्टी मॉर्गेज केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तक्रारीनंतर खासदारांनी याबाबत पोलिसांना आपले म्हणणे सादर केले आहे.

“केंद्र सरकारने भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडले हे मान्य करावे”; नाना पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. मंगळवारी तोफमाऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “आज ज्यांची मुलं त्या ठिकाणी शिकत आहे त्यांच्या परिवाराला काय वेदना होत असतील हे ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना कळणार नाही. खऱ्या अर्थाने केंद्र सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडलेलं आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे”, अशी टीका पटोले यांनी केली.

नाना पटोले यांनी आज गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने केंद्रातले सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून मायदेशी आणण्यात कमी पडलेलं आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. तुम्ही तिथले बंकरमधील व्हिडीओ पाहिले असतील. एक मुलगी सांगते की मुलीच गायब करतात तिथून. अशी सगळी परिस्थिती असताना आता देशाचे प्रधानमंत्री जागे झालेत. मी तिथल्या विद्यार्थ्यांसोबत स्वत: बोललोय. मी तिथल्या विद्यार्ध्यांच्या संपर्कात आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयालाही आम्ही अनेकदा कळवले.

पाच राज्यांच्या निवडणुका सुरु झाल्यात. या निवडणुकांच्या कालावधीमध्येच रशियाच्या माध्यमातून सातत्याने युक्रेनमध्ये युद्धाचा इशारा दिला जात होता. तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की बाकीचे देश आपल्या आपल्या पोरांना घेऊन गेले. पण आपल्या देशातून कुठली मदत केली नाही. युक्रेनमधील आपल्या देशातील राजदूत साधा फोन घ्यायला तयार नाहीत, असा आरोप यावेळी पटोले यांनी केला.

देशभरात महाविकास आघाडी; राहूल गांधी करतील नेतृत्व

rahul gandhi

औरंगाबाद – देशात आघाडीचे वारे वाहत असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात उत्कृष्ट काम करून देशाला दिशा दाखविली आहे. याच धर्तीवर देशातही महाविकास आघाडीचा प्रयोग होईल व त्याचे नेतृत्व राहुल गांधीच करतील, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल केला.

काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा मराठवाडा विभागाचा आढावा मंगळवारी चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसॉर्ट येथे घेण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सचिव संपत कुमार, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला. त्याची परंपरा सुशीलकुमार शिंदे यांनी पुढे चालविली. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली. कोविड काळात जगभरात रुग्णांचे हाल झाले. उपचार मिळाले नाहीत, म्हणून बळी गेले. पण आघाडी सरकारने कोरोना काळात अनेक क्षेत्रांत केलेले काम देशात दिशादर्शक ठरले. देशातही महाविकास आघाडीचे वारे आहे. या महाविकास आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असा दावा देशमुख यांनी केला.

नारायण राणेंना मालवणी पोलिसांनी बजावले समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी एक विधान केले होते. त्यावरून आता राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावलंले आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर त्याच्या या विधानाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मालवण पोलिसांना पत्र पाठवून या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले होते.

त्यानंतर मालवणी पोलिसांनी नारायण राणेंना समन्स बजावले आहेत. ३ मार्च रोजी अर्थात गुरुवारी नारायण राणेंना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंनी केलेल्या दाव्यांबाबत त्यांचा जबाब यावेळी नोंदवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ४ मार्च रोजी नितेश राणे यांना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे.

मनपाच्या वॉर्ड रचनेबाबात त्वरित सुनावणी घ्यावी; राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयास विनंती

Supreme Court

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्ड रचनेच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. अजित कडेठाणकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वोर्ड रचनेच्या अधिनियमात झालेल्या सुधारणांमुळे याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना काहीही अर्थ उरला नसून, याचिकेत पारित झालेल्या जैसे थे आदेशामुळे आयोगास नवीन नियमानुसार निवडणूक घेणे अशक्य बनल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नमूद केले, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात 23 महानगरपालिका, 219 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती आणि 8 हजार 596 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. केवळ औरंगाबाद महापालिका त्यापासून वंचित असल्याचे आणि गेल्या दोन वर्षापासून तेथे लोकनियुक्त प्रतिनिधींना असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्वरित सुनावणीसाठी निवडणूक आयोगातर्फे ही सलग चौथी विनंती असल्याचा उल्लेख करुन याबाबतचा प्रलंबित याचिका त्वरित निकाली काढाव्यात अशी विनंती केली. नवीन वॉर्ड रचनेत याचिकाकर्त्यांना वा कोणत्याही नागरिकास काही आक्षेप असल्यास उपस्थित आक्षेपांवर गुणवत्तेवर यथोचित निर्णय घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.