Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5697

म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता कमी; भाव घसरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू सर्वकाही उघडण्यास सुरुवात झाली आहे. सराफ दुकाने उघडण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सोन्याच्या किंमती वाढत आहेत. देशातील एकूण परिस्थिती ही आर्थिक मंदीच्या दिशेने आहे. या भीतीमुळे नागरिक सोन्याच्या खरेदीकडे वळत नाहीयेत. त्यामुळे येत्या काही दिवसात तरी सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता नाही.

जगातील मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री होणारा दुसऱ्या क्रमांकाच्या देशात आर्थिक विकास दरातील घसरणीमुळे पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी आधीच कमी झाली होती. २५ मार्चपासून लागू झालेल्या दोन महिन्यांच्या संचारबंदीत सोनेविक्री आणखी घसरली. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काैन्सिलचे उपाध्यक्ष शंकर सेन यांच्या म्हणण्यानुसार १ जूनपासून सराफ बाजारपेठ सुरू होऊ लागली आहे, मात्र, अद्याप ग्राहकांनी सोनेखरेदीत रस दाखविला नाही. सध्या लोक आपला नोकरी व्यवसाय सांभाळण्याकडे लक्ष देत आहेत.

आधीच ऑर्डर दिलेले लोक व ऑनलाईन खरेदी केलेले लोक आता प्रत्यक्ष दागिने घेत आहेत. वाहतूक सुरू न झाल्यामुळेही ग्राहकांची संख्या कमी हाेत आहे. सेन म्हणाले, जून महिन्यातही विक्री खूप कमी होण्याची शक्यता आहे.सोन्याची मागणी आणि खरेदी सप्टेंबरआधी होणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. सणासुदीत होणारी दागिन्यांची खरेदीही लोकांनी टाळली आहे. यंदा संचारबंदीमुळे अक्षय्य तृतीयेलाही सोन्याची नाममात्र विक्री झाली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती, आर्थिक मरगळीमुळे लोकांच्या क्रयशक्तीत आलेल्या घसरणीमुळे नजीकच्या भविष्यात जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायाला दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना संकटाच्या ‘आयत्या बिळात’ लपून बसलेल्या ‘युवा नागोबांसाठी’ एक पत्र

विचार तर कराल । प्रणाली सिसोदिया

Disclaimer: COVID-19 दरम्यान फील्डवर विविध प्रकारचं काम करणाऱ्यांसाठी, COVID-19 रुग्णांची कुठल्याही प्रकारची सेवा करणाऱ्यांसाठी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांसाठी, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी नसलेल्यांसाठी, गरोदर मित्र-मैत्रिणींसाठी, लहान बाळ घरात असणाऱ्यांसाठी आणि अत्यंत स्व-मग्न; ज्यांना सामाजिक बांधिलकी कशाशी खातात किंवा सहवेदना म्हणजे नेमकं काय हे माहित नसलेल्यांसाठी हे मनोगत नाही.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी ‘कोरोना विरुध्दच्या युद्धात युवांची भूमिका काय?’ यावर समाजमाध्यमाद्वारे आपले विचार मांडून तरुणांना मार्गदर्शन केलं. त्यात ते म्हणतात, “MBBS च्या दुसऱ्या वर्षाला असताना परीक्षा बाजूला ठेवून बांगलादेशी निर्वासितांची आरोग्य सेवा करायला आणि इंटर्नशीप बाजूला ठेवून मराठवाड्यातील दुष्काळात आरोग्य सेवा द्यायला मी गेलो. त्यातून मला माझं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान मिळालं, स्वधर्म कळला, माझं शिक्षण झालं आणि अभय बंग त्याच्यातून घडला.” खोलवर विचार केला तर हे वाक्य खूप वजनदार आहे.

मीही स्वतःला कोरोना दरम्यान माझ्या भूमिकेविषयी प्रश्न विचारला आणि उत्तराच्या शोधात कामाला लागली.
फिल्डवर काम करत असताना सतत मनात एक खंत होती आणि अजूनही आहे की आज जगावर एवढं मोठ्ठं संकट येऊन पडलंय, व्यवस्थेचं कंबरडं मोडलंय आणि तरीही स्वतःच्या मूल्यांना – तत्त्वांना जागणारा, सामाजिक बांधिलकी मनात ठेवून आजवर काम करणारा, समाजाप्रती सहवेदना बाळगणारा, स्वतःला पुरोगामी म्हणवणारा, समाजात खुट्ट झालं तरी पेटून उठणारा युवा आज या कोरोना संकटाच्या काळात नेमका कुठल्या बिळात लपून बसलाय? आणि का?

आज ग्रामीण भागांत, पुणे-मुंबई-नाशिक-नागपूर आणि इतर राज्यांत अनेक ठिकाणी माझे मित्र-मैत्रिणी आहेत. विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करताय; अर्थात विचारीही नक्कीच आहेत. परंतु आज समाजाला त्यांची प्रचंड गरज असताना ते आज काय करताय? (Disclaimer मधील सोडून) खरंतर दुर्दैवाने त्यांनी असुशिक्षितासारखं कोरोनाला घाबरून स्वतःला घरात कोंडून घेतलंय. आपापल्या कुटुंबासोबत लॉकडाऊन एन्जॉय करताय, सिरीज बघताय, लॅपटॉप समोर बसून ऑफिसचं काम करताय (ते करणं चूक आहे असं नाही), वेगवेगळे ट्रेनिंग घेताय आणि देताय. सरकार कसं फालतू आहे, व्यवस्था कशी कुचकामी आहे, गरिबांचे, मजुरांचे कसे हाल होताय यांच्या बातम्या बघताय, त्याविषयी सोशल मिडियावर आरडा-ओरडा करताय. अरे हो, हे सगळं करा ना पण त्यासोबत दिवसातून किमान २ – ४ तास फिल्डवर जाऊन कामही करा, या सगळ्यापेक्षा तिथे तुमची जास्त गरज आहे.
अरे मी तर म्हणते खड्ड्यात गेलं तुमचं ऑफिसचं काम, ट्रेनिंग आणि सर्व काही. आज फक्त आणि फक्त माणूस वाचणं महत्वाचं आहे. आज समाजाचं जे काही मानसिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि नीतीच्या, माणुसकीच्या पातळीवर हनन होत आहे ते थांबवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते युवा वर्गच करू शकतो.

आज जर तुम्ही वंचितांना, गरिबांना आणि इतरांनाही तुमच्यातला राम नाही दाखवला ना तर ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास उठेल. मी म्हणते बाहेर पडून कवडीचंही काम न करता व्यवस्थेविरुध्द, सरकार विरुध्द, लोकांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टांविरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकार तरी तुमच्यापाशी आहे का? एरवी बोलताना किती मोठमोठ्या बदलाच्या भाषा करतात, लोकांना शिकवतात, स्वतःला गांधी-विनोबांचे अनुयायी म्हणवतात, समाजवादी, पुरोगामी आणि काय काय पालुपदं लावतात. आज जर तुम्ही काहीही काम करत नसाल तर माझ्यालेखी हे सर्व झूट आहे, अत्यंत दांभिकपणा आहे हा!

आज समाजाला युवावर्गाची मोठ्या प्रमाणात गरज असतानाही तुमच्यातला माणूस, तुमच्यातला विवेक तुम्हाला घरात कसा बसू देतोय? आज इतका मोठ्ठा वर्ग उपाशी झोपत असताना तुमच्या गळ्याखाली घास तरी कसा उतरतोय? काहीतरी ‘क्ष’ रक्कम मदत म्हणून देऊन हात वर करताना इतर जबाबदारी झटकण्याचा दांभिकपणा कुठ्न आलाय तुमच्यात? गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रश्न खरंच मला खूप छळताय.
अर्थात, मीही या युवा वर्गाचाच भाग असल्याने आणि माझ्यासारख्या असंख्य युवांना मी आपलं मानत असल्याने प्रेमाच्या अधिकाराने मी आज हे प्रश्न तमाम युवा वर्गाला (Disclaimer मधील सोडून) विचारतीये.

मात्र याच्या दुसऱ्या बाजूला माझे काही युवा मित्र-मैत्रिणी जीवाची पर्वा न करता जिथे शक्य होईल तिथे जाऊन काम करताय. परंतु दुर्दैवाने ही नावं बोटावर मोजण्याइतकीच आहेत. या सर्वांना माझा हृदयातून सलाम! विशेष म्हणजे युवांसोबत अशी काही नावं माझ्या आजूबाजूला आहेत; ज्यांना जीव धोक्यात घालून काम करताना मी जवळून बघतेय. जे साठीच्या पुढचे आहेत, कोरोनाचा धोका त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि तरीही ते कंबर कसून समाजात जाऊन काम करताना दिसताय. ६५ वर्षांच्या मेधा पाटकर या गावोगाव फिरून मजुरांच्या घरी जाण्याचा मार्ग सोपा करताय, जळगावातील ६६ वर्षांचे दिलीप चौबे सर घरोघरी गॅस मिळावा म्हणून रोज ऑफिसला येऊन बसताय, गरिबांना अन्न-पाणी-औषधी वाटताय, जळगावातीलच ६१ वर्षांच्या वासंती दिघे गोरगरीब जनतेला शोधून त्यांना अन्न पुरवताय, मजुरांचे प्रश्न मार्गी लावताय, ९१ वर्षांचे बाबा आढाव पुण्यात कष्टकरी कुटुंबांच्या प्रश्नांना जातीने तोंड देताय, माझे स्वतःचे वडील ६२ वर्षांचे असूनही एकही सुटी न घेता बँकेत अविरत सेवा देताय. अशी अजून कितीतरी उदाहरणं असतील. यांच्यात एवढं दहा हत्तींचं बळ आलंय आणि युवा वर्ग मात्र स्वतःची सामाजिक जबाबदारी झटकून स्वतःतच मश्गुल राहतोय! हे चित्र खूप दुर्दैवी आहे. अस्वस्थ आणि दुखी करणारं आहे. किमान माझ्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींकडून तरी मला अशा अपेक्षा नव्हत्या.

खरंतर ही कळकळ म्हणजे ‘तुम्ही काम न करणारे कसे कुचकामी आहात’ हे दाखवण्यासाठी नक्कीच नाहीये, किमान माझातरी तसा हेतू नाहीये. परंतु एक मात्र खरंच सांगते की या लेखाच्या निमित्ताने एक समाजशील माणूस म्हणून तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण नक्की करावं, तुमची स्वतःची एक भूमिका ठरवावी आणि सद्यपरिस्थितीत वेगवेगळ्या कारणांनी ओघळणारे अश्रू पुसून समाजमनाला थोडंतरी हसवावं!
स्वानुभवातून एकच सांगेल दोस्तांनो की आज जो गोरगरीब समाज एकवेळ मिळेल ते खाऊन उपाशी झोपतोय, मजूरवर्ग बेवारशासारखा रस्त्यावर मरतोय या सर्वांना आज आपल्या आधाराची प्रचंड गरज आहे. आपल्यातली सहवेदना जागृत करून होरपळून निघणाऱ्या या वर्गाला “सगळं काही ठीक होईल, आम्ही तुमच्यासोबत आहोत.” एवढाच विश्वास देण्याची गरज आहे. तुमच्यातला चार भिंतीतला सामाजिक कार्यकर्ता जोवर बाहेर पडून फिल्डवर काम करत नाही तोपर्यंत तुम्ही घडण्याचे दरवाजे बंद राहतील. मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही युवा वर्गाला तुमच्यातला राम दाखवण्याची संधी नक्कीच आहे!

– प्रणाली सिसोदिया, जळगाव
(लेखिका ‘वर्धिष्णू’ या जळगाव शहरातील कचरावेचक मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेसोबत कार्यरत आहेत.)
मोबाईल – 97674 88337
ईमेल – [email protected]

अमेरिकेत आणखी एका ब्लॅक ‘फ्लॉयडचा गेला बळी, सुरक्षा कर्मचार्‍यांनी पेपर स्प्रेची फवारणी केल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी न्यूयॉर्क शहरातील फेडरल जेलमध्ये अधिकाऱ्यांनी पेपर स्प्रे (मिरपूड)ची फवारणी केल्याने एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. ब्यूरो ऑफ प्रिजनने ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की, जेलमध्ये अधिकाऱ्यांनी एका ३५ वर्षीय कैदी असलेला कृष्णवर्णीय जमाल फ्लॉयड याच्यावर पेपर स्प्रेची फवारणी केली. त्याने ब्रूकलिनच्या मेट्रोपॉलिटन रीस्ट्रंट सेंटरमध्ये त्याच्या सेलमध्ये बॅरिकेड लावून धातूच्या वस्तूने तुरुंगच्या दाराची खिडकी तोडली होती.

एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “तो स्वत:साठी आणि इतरांसाठी अपायकारक झाला होता. त्यामुळे त्याच्यवर पेपर स्प्रे मारून त्याला जेलमधून बाहेर काढले गेले. मात्र, पेपर स्प्रेच्या फवारणीने त्याची प्रकृती खालावू लागली आणि त्यानंतरच त्याचा मृत्यू झाला. फ्लॉइडच्या आईने सांगितले की,’त्यांच्या मुलाला दम्याचा आणि मधुमेहाचा त्रास होता आणि तुरूंगातील अधिकाऱ्यांना त्याच्या या आजाराची माहिती होती.

मागील आठवड्यातच पोलिस कोठडीत एका काळ्या अमेरिकन नागरिकाचा,जॉर्ज फ्लॉइडच्या झालेल्या मृत्यूमुळे अमेरिकेसह जगभरात निदर्शने होत आहेत. येथील देशातील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हिंसक निदर्शनांना देशांतर्गत दहशतवाद असे म्हटले आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूमुळे ही हिंसक निदर्शनांची आग अमेरिकेतील सुमारे १४० शहरांमध्ये पोहचली. गेल्या अनेक दशकांतील या देशातील हि सर्वात वाईट अराजकता मानली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तानमध्ये आयएसआयच्या हस्तकांनी भारतीय डिप्लोमॅट गौरव अहलुवालिया यांच्या गाडीचा पाठलाग केला, व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय डिप्लोमॅट गौरव अहलुवालिया यांना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत. गौरव अहलुवालिया यांच्या घराबाहेर आयएसआयने मोठ्या संख्येने मोटारी आणि बाईकवर लोकांना एकत्र केले, गौरव यांनी घर सोडताच अनेकांनी त्यांचा पाठलाग केला.

 

अलीकडेच भारताने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांना पाकिस्तानात परत पाठवले आहे. या दोन गुप्तहेरांनी रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांकडून भारतीय सैन्याच्या तुकड्यांच्या हालचालीचा सविस्तर तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दिल्ली पोलिसांनी आबिद हुसेन आणि मोहम्मद ताहिर या दोन अधिकाऱ्यांना मध्य दिल्लीतील करोल बाग येथून अटक केली होती. ते पैशाच्या मोबदल्यात भारतीय नागरिकांकडून भारताच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे घेत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान असे आढळले की हुसेन याने अनेक बनावट ओळखपत्रांचा वापर करत होता. तसेच लोकांना संघटना आणि विभागातील लोकांना पैशाचे आमिष दाखवीत असे. भारतीय रेल्वेमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी त्याने स्वत: ला मीडियामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा भाऊ असल्याचे सांगितले. अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी (दिल्ली पोलिस) अनिल मित्तल यांनी सांगितले की आपला भाऊ भारतीय रेल्वेवर बातम्यांचा अहवाल देत आहे ज्यासाठी त्याला रेल्वेगाड्यांच्या हालचालीविषयी माहिती हवी आहे असे सांगून विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने या दोन्ही अधिका-यांना २४ तासांच्या आत देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.’

सूत्रांनी सांगितले की हे अधिकारी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्हिसा शाखेत काम करायचा आणि चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केले की ते पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय साठी काम करत होते. ही कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी हे दोन अधिकारी त्या व्यक्तीला भारतीय चलन आणि आयफोन देत असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की सुरुवातीला त्याने स्वत:ची भारतीय नागरिक म्हणून ओळख करून दिली आणि आपले बनावट आधार कार्डदेखील दाखविले. २०१६ मध्ये दिल्ली पोलिसांनी भारतात एका हेरगिरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता ज्यामध्ये पाकिस्तानी हाय कमिशनचा कर्मचारी महमूद अख्तर यांचा समावेश होता. बीएसएफच्या भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असल्याची माहिती मिळविण्यात त्यांचा सहभाग होता. या हेरगिरीसाठी भारताने त्याला देशातून हाकलून दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्य सरकारला ९ हजार कोटींचे कर्ज काढण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात संचारबंदी आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे हा संपूर्ण महिना राज्याचे उत्पन्न ९०% नी घसरले आहे. राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. चव्हाण यांनी राज्यातील उत्पन्नाची एकूण स्थिती वर्णन करीत सध्या कर्ज काढण्याची आवश्यकता असलयाचे म्हंटले आहे. तसेच याच कारणामुळे त्यांनी सरकारला नवे अंदाजपत्रक करण्याची मागणी केली होती असेही म्हंटले आहे. राज्याचे उत्पन्न घसरले असले तरी खर्च त्या प्रमाणात  झालेला नसल्याने पुढे असणाऱ्या आर्थिक स्थितीचा सामना कसा करणार? हा प्रश्न आहे. असेही ते म्हणाले.

राज्याच्या एकूण उपन्नाच्या ५५% भाग हा वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज या तीन बाबींवर खर्च होतो. सध्या व्याजाला मुदत दिली असली तरी वेतनाचा खर्च आहेच. २०२०-२१ च्या अंदाजपत्रकानुसार राज्याचे एकूण उत्पन्न ज्यामध्ये कराचे, कराव्यतिरिक्त महसूल असे एकूण उत्पन्न  ४ लाख ३४ कोटीचे आहे. या उत्पन्नाच्या १ लाख १७ हजार कोटी वेतनावर, ३८ हजार कोटी निवृत्ती वेतनावर, ३५ हजार कोटी व्याजावर खर्च होतात. महिन्याला साधारण ९ साडेनऊ हजार कोटी  वेतनासाठी आणि  ३ सव्वातीन हजार कोटी रु. निवृत्ती वेतनासाठी खर्च होतात. सध्या उत्पन्न अत्यंत कमी आहे. आणि ही तूट भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही. असे चव्हाण म्हणाले.

वित्त आयोगाच्या नियमाप्रमाणे जो कर थेट केंद्र सरकार घेते त्याचा ४२% भाग राज्य सरकारला मिळतो  मात्र सध्या केंद्र सरकारचेही उत्पन्न घटले आहे. आणि केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये राज्य सरकारला राज्याच्या सकल उत्पन्नाच्या ३% कर्ज घेता येत होते ते आता ५% पर्यंत कर्ज वाढविण्यात आले आहे असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष केवळ नवीन अर्धा टक्के कर्ज काढता येत आहे.त्यामुळे आता राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशासमोर आणि राज्यासमोर बिकट आर्थिक स्थिती आहे. मात्र यावर मार्ग काढत केंद्र सरकारने नवीन अंदाजपत्रकावर मतदान घ्यावे असे चव्हाण म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, हॉटेल सुरु पण ‘या’ सूचनांचे पालन करावेच लागेल

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी कामकाजाबाबत एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गर्भवती महिला, 65 वर्षांवरील लोक आणि ज्यांना आधीच गंभीर आजार आहेत अशा लोकांनी कामावर जाणे टाळले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. सोबतच कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, सफाई, सॅनिटायझेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये थुंकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे त्यात नमूद केले आहे.

 

कार्यालयांसाठी (ऑफिस) मार्गदर्शक सूचना

– कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर डिस्पेंसर असणे आवश्यक आहे. थर्मल स्क्रीनिंग देखील करण्यात यावी.
– कोरोनाव्हायरसची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींनाच ऑफिसमध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी.
– कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचार्‍यांना त्यांच्या सुपरवायझरला माहिती द्यावी लागेल. कंटेनमेंट झोन डिनोटीफाई न केल्याशिवाय त्याला कार्यालयात येण्याची परवानगी दिली जाऊ नये.
– चालकांनी सामाजिक अंतर आणि कोरोना संबंधी जारी केलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. कार्यालयीन अधिकारी, वाहतूक सेवा प्रदाता यांनी कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे ड्रायव्हर्स वाहन चालवणार नाहीत याची काळजी घ्यावी.
– कारच्या आत, त्याचे दरवाजे, स्टीअरिंग, चाव्या पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. याची काळजी घेण्यात यावी.
– गर्भवती महिला, ज्येष्ठ कर्मचारी, आधापासून आजारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. या कर्मचाऱ्यांना लोकांच्या संपर्कात येण्यासारखे काम देऊ नये. शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी.
– केवळ फेस मास्क परिधान केलेल्यांना ऑफिसमध्ये येण्याची परवानगी द्यावी. ऑफिसमध्येही संपूर्ण वेळ फेस मास्क घालणे बंधनकारक आहे.
– कार्यालयात अभ्यागतांची सामान्य नोंद, तात्पुरते पास रद्द करावे. अधिकृत माहितीच्या मंजुरीसह आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे ही माहिती मिळाल्यानंतरच अभ्यागतास ऑफिसमध्ये परवानगी देण्यात यावी. त्यांची पूर्ण स्क्रीनिंग करावी.
– बैठकी शक्य तितक्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कराव्यात.
– कोरोनाव्हायरस संसर्गापासून बचाव करण्यासाठी पोस्टर्स, होर्डिंग्ज कार्यालयांमध्ये लावावेत.

धार्मिक स्थळांसाठी मार्गदर्शक सूचना

– धार्मिक स्थळी एकाचवेळी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र जमा होऊ नये. सर्वांनी एकमेकांपासून किमान सहा फूट अंतर राखावे लागेल.
– धार्मिक स्थळाच्या प्रवेशद्वारावर हात सॅनिटायझ करण्याची व्यवस्था असावी. सर्व भाविकांची थर्मल स्क्रीनिंग आवश्यक आहे.
– लक्षणे नसणाऱ्या भाविकांनाच धार्मिक स्थळात प्रवेश द्यावा. कोणाला खोकला, सर्दी, ताप असल्यास अशांना प्रवेश देऊ नये.
– फेस मास्क घातलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा.
– कोविड -19 शी संबंधित माहिती असलेली पोस्टर्स, बॅनर धार्मिक स्थळाच्या आवारात लावाव्या लागतील. व्हिडिओ देखील प्ले करणे आवश्यक आहे.
– भाविकांना त्यांचे शूज आणि चप्पल त्यांच्या स्वत: च्या गाडीमध्ये ठेवाव्या लागतील. अशी कोणतीही व्यवस्था नसल्यास, आपण स्वत: ला आवारातून दूर निरीक्षणाखाली ठेवावे लागेल.

रेस्तरॉसाठी मार्गदर्शक सूचना

– कंटेनमेंट झोनमधील रेस्तरॉ बंदच राहतील. कंटेनमेंट झोनबाहेरील रेस्तरॉ उघडण्यास परवानगी.
– रेस्तरॉमध्ये खाण्यापेक्षा होम डिलीव्हरीला प्रोत्साहन द्यावे. डिलिव्हरी ब्वॉयने घराच्या दाराजवळ पॅकेट ठेवावे, हँडओव्हर करू नका.
– होम डिलिव्हरीवर जाण्यापूर्वी सर्व कर्मचार्‍यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावी.
– रेस्तरॉच्या गेटवर हँड सॅनिटायझेशन आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी.
– केवळ लक्षणे नसलेल्या कर्मचारी आणि ग्राहकांना रेस्तरॉमध्ये प्रवेश द्यावा.
– कर्मचाऱ्यांना मास्क लावल्यानंतर आतमध्ये प्रवेश द्यावा आणि संपूर्ण वेळ त्यांनी मास्कमध्येच राहावे.
– कोरोना रोखण्यासाठी संबंधित पोस्टर्स आणि जाहिराती लावाव्यात.
– रेस्तरॉत सोशल डिस्टेन्सिंगची काळजी घेत कर्मचाऱ्यांना बोलवावे.
– रेस्तरॉ परिसर, पार्किंग आणि आसपासच्या भागात सोशल डिस्टेन्सिंगची काळजी घेण्यात यावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कोरोनाव्हायरसच्या आपल्या अनुभवाबद्दल प्रिन्स चार्ल्स म्हणाले-”हिंमत हरु नका,लढा द्या”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे. या कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसागणिक वाढतच चालले आहे. अशा या प्राणघातक विषाणूच्या संसर्गाला आतापर्यंत सर्वसामान्यां बरोबरच अनेक सेलिब्रिटी देखील बळी पडलेले आहेत. अशा सेलिब्रेटींपैकी एक असलेले ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. लंडन मध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची चाचणी केली गेली जी पॉझिटिव्ह आलेली होती. त्यानंतर काही दिवसांच्या उपचारानंतर ते यातून बरेही झाले. तर नुकतेच त्यांनी आपल्याला आलेल्या या अनुभवाबद्दल सांगितले आहे.

ते म्हणाले कि, ‘कोरोना विषाणूची लागण मलाही झाली होती. मात्र या आजारातून आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो आहे. कोरोनाचा संसर्ग मलाही झाला होता. मात्र माझ्यामध्ये या रोगाची सौम्य लक्षणं दिसत होती. आता मी यातून पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि मला याचा निश्चितच आनंद होतो आहे असं प्रिन्स चार्ल्स यांनी सांगितलं आहे.

७१ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांना मार्च महिन्यातच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. स्कॉटलँड इस्टेट या ठिकाणी त्यांनी आयसोलेशनमध्ये ठेवले होते. कोरोनाबाबतचा आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, माझ्यामध्ये कोरोनाची काही सौम्य प्रमाणात लक्षणं जाणवली होती. मात्र योग्यवेळी घेतलेल्या उपचारामुळे कोरोनातून मी यातून पूर्णपणर बरा झालो याचा मला आनंद वाटतो आहे. स्काय न्यूजशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या जगभरात कोरोनाची साथ सुरु आहे. लोकं कोणत्या संकटातून जात असतील याची मला कल्पना आली आहे. तेव्हा हिंमत हरु नका, कोरोनाशी लढा द्या,असंही प्रिन्स चार्ल्स यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

२ हजार हत्तींची हत्या केलेल्या विरप्पनची मुलगी भाजपात?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ मध्ये झालेल्या हत्तीणीच्या हत्येने सर्वत्र संतप्त वातावरण आहे. भाजपा केरळमध्ये झालेल्या या हत्येचा निषेध करत आहे. त्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करत आहे. मात्र केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीनही राज्यात दहशत पसरवणारा आणि तब्बल २००० हत्तींची हत्या करणाऱ्या वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत तिने पक्षप्रवेश केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांनी प्रेरित होऊन आपण या पक्षात प्रवेश घेतल्याचे तिने सांगितले. विद्या राणी ही कुप्रसिद्ध डाकू वीरप्पन याची मोठी मुलगी आहे.

हत्तीच्या दातांची आणि चंदनाची तस्करी करणारा कुप्रसिद्ध डाकू अशी वीरप्पन ची ओळख होती. तो अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता आणि कोणताही विचार न करता कुणाचीही हत्या करायचा अशी त्याची ओळख होती. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात १० हजार टन चंदनाची तस्करी केली होती. तसेच २००० हजाराहून अधिक हत्तीची हत्या केली आहे. त्याच्या या तस्करीच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांना तो मारून टाकत असे. त्याने बहुतेक वनाधिकारी आणि पोलिसांच्या हत्या केल्या आहेत. दाक्षिणात्य अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करून त्याने सरकारकडून २० कोटी रुपये घेतले होते. त्याने जवळपास १०५ दिवस त्यांना स्वतःच्या कैदेत ठेवले होते.

ज्या व्यक्तीने २००० हत्तीची हत्या केली त्याची मुलगी पक्षात असताना भाजपाच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारचा एक संदेश सध्या व्हाट्सअप वर व्हायरल होतो आहे. दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांची विद्या राणी यांनी भेट घेतली होती त्यावेळी राधाकृष्णन यांनी पक्षप्रवेशाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. वीरप्पनला लोकांची सेवाच करायची होती, मात्र त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा होता असे त्या म्हणाल्या. विद्या राणी या पेशाने वकील आहेत. तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. कोणत्याही जाती-धर्माची पर्वा न करता शिक्षणाद्वारे लोकांना उन्नत करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मागील एक वर्षांपासून एक शिक्षण संस्था चालवीत आहेत.  असे असले तरी भाजपावर सध्या टीकेचा चांगलाच भडीमार सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात तारलं. त्या दोघांच्या गोलंदाजीमुळेच मुंबईला चौथ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावता आली. हे दोन गोलंदाज कायम आपल्या भेदक माऱ्याने आपल्या संघासाठी मॅच विनर ठरत असतात. याच दरम्यान भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लसिथ मलिंगाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह या दोघांच्या गोलंदाजीची वैशिष्ट्य म्हणजे यॉर्कर चेंडू टाकणे हे आहे. तर मग या दोघांपैकी यॉर्कर टाकण्यात सर्वोत्तम कोण? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडतो आणि या दोघांपैकी यॉर्कर किंग कोण? असाही सवाल सामान्यपणे विचारला जातो. मात्र या प्रश्नाचे उत्तर बुमराहने स्वत:च देऊन टाकले आहे. “मलिंगा हाच सर्वात उत्तम यॉर्कर टाकणारा गोलंदाज आहे. आपल्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत तो अगदी त्याच वेगाने आणि अचूकपणे यॉर्करचा मारा करतो आहे. म्हणून तोच खरा यॉर्कर किंग आहे. तसेच इतक्या वर्षापासून यॉर्करच मलिंगाचे बलस्थान आहे”, असेही बुमराहने सांगितले आहे.

दरम्यान, एका मुलाखतीत बुमराहने मुंबई संघाशी मलिंगाचे नाते कसे आहे याबाबतीतही सांगितले. तो म्हणाला की “अनेकांना वाटतते की लसिथ मलिंगाने मला यॉर्कर चेंडू कसा टाकायचा ते शिकवलं. पण हे बोलणे चुकीचं आहे. त्याने मला मैदानावरील कोणत्याही गोष्टी शिकवल्या नाहीत. मी त्याच्याकडून काही शिकलो असेल तर ते म्हणजे गोलंदाजी करतानाची विचार करण्याची पद्धत… वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गोलंदाजाने कशाप्रकारे विचार करावा,आणि जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतील तर गोलंदाजाने कसे स्वतःला शांत ठेवायचे,अमुक एका फलंदाजासाठी ‘प्लॅन’ कसा आखायांचा, अशा अनेक गोष्टी मी त्याच्याकडून समजून घेतल्या”, असे बुमराहने आपल्या मुलाखतीत सांगितलं.

तो म्हणाला की,“ माझ्या लहानपणी आम्ही रबरी चेंडूने खेळायचो. त्याला सीमसारखे डिझाईन असायचे. त्यामुळे ते चेंडू स्विंग व्हायचे. आम्ही जेथे खेळायचो तेथे सीम मुव्हमेंट, विविध टप्प्यावर गोलंदाजी किंवा यष्टीरक्षण अशा गोष्टी नसायच्या. फक्त चेंडू फलंदाजाच्या अंगावर टाकायचा किंवा पायावर गोलंदाजी करून त्याला बाद करणे हाच आमचा उद्देश असायचा. जर तुम्हाला फलंदाजाला बाद करायचे असेल, तर यॉर्कर चेंडू टाका असा साधा नियम आम्ही लहानपणापासूनच शिकलो आणि अजूनही त्याच एका गोष्टीमुळे मला गोलंदाजीत यश मिळतंय”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

.. म्हणून केंद्र सरकारने पुढील वर्षापर्यंत नव्या योजनांना लावला ब्रेक; अर्थ मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली । कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशात दीर्घकालीन लॉकडाउन राबवावा लागला. मात्र यामुळे देशातील अर्थचक्र थांबले आणि कर महसुलात मोठी घसरण झाली. त्यामुळे काटकसरीचा अवलंब करत केंद्र सरकारने पुढील वर्षापर्यंत नव्या योजनांना ब्रेक लावला आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत केंद्र सरकारकडून कोणतीही नवी योजना मंजूर केली जाणार नसल्याचं आज अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले.

चालू आर्थिक वर्षात ज्या योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्या ३१ मार्च २०२१ पर्यंत किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत. यात मंत्रालये आणि विभागणी तत्वतः मंजुरी दिलेल्या योजनांचा देखील समावेश आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडे विविध मंत्रालयांचे शेकडो नव्या योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्राप्त झाले आहेत, मात्र तिजोरीत खडखडाट जाणवू लागल्याने आणि नजीकच्या काळात कर महसुलात मोठी घट होण्याच्या अंदाजाने अर्थ खात्याने या प्रस्तावांना तूर्त परवानगी नाकारलेली आहे. त्यादृष्टीने आज शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने पुढील वर्षापर्यंत नव्या योजना मंजुर केल्या जाणार नसल्याची मोठी घोषणा केली. अर्थमंत्रालयाच्या या निर्णयामुळं देशाचा विकासाचा गाडा मंदावण्याची शक्यता आहे.

नव्या योजनांना ब्रेक लावला असला तरी सध्या ज्या योजना सुरु आहेत त्यांना कोणताही धक्का लावला जाणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज आणि इतर विशेष पॅकेजला निधी पडू देणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय विविध मंत्रालयाकडे जो निधी उपलब्ध आहे त्याचा योग्य प्रकारे विनियोग करावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”