Wednesday, June 7, 2023

‘कोण मी… नाही हो मलिंगाच आहे खरा किंग ऑफ यॉर्कर’- जसप्रीत बुमराह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजां बरोबरच गोलंदाजांची कामगिरी देखील खूप महत्त्वाची ठरली आहे. मुंबईला २०१९ च्या अंतिम सामन्यात तर जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा या दोघांनी शेवटच्या टप्प्यात तारलं. त्या दोघांच्या गोलंदाजीमुळेच मुंबईला चौथ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावता आली. हे दोन गोलंदाज कायम आपल्या भेदक माऱ्याने आपल्या संघासाठी मॅच विनर ठरत असतात. याच दरम्यान भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने लसिथ मलिंगाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह या दोघांच्या गोलंदाजीची वैशिष्ट्य म्हणजे यॉर्कर चेंडू टाकणे हे आहे. तर मग या दोघांपैकी यॉर्कर टाकण्यात सर्वोत्तम कोण? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडतो आणि या दोघांपैकी यॉर्कर किंग कोण? असाही सवाल सामान्यपणे विचारला जातो. मात्र या प्रश्नाचे उत्तर बुमराहने स्वत:च देऊन टाकले आहे. “मलिंगा हाच सर्वात उत्तम यॉर्कर टाकणारा गोलंदाज आहे. आपल्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत तो अगदी त्याच वेगाने आणि अचूकपणे यॉर्करचा मारा करतो आहे. म्हणून तोच खरा यॉर्कर किंग आहे. तसेच इतक्या वर्षापासून यॉर्करच मलिंगाचे बलस्थान आहे”, असेही बुमराहने सांगितले आहे.

दरम्यान, एका मुलाखतीत बुमराहने मुंबई संघाशी मलिंगाचे नाते कसे आहे याबाबतीतही सांगितले. तो म्हणाला की “अनेकांना वाटतते की लसिथ मलिंगाने मला यॉर्कर चेंडू कसा टाकायचा ते शिकवलं. पण हे बोलणे चुकीचं आहे. त्याने मला मैदानावरील कोणत्याही गोष्टी शिकवल्या नाहीत. मी त्याच्याकडून काही शिकलो असेल तर ते म्हणजे गोलंदाजी करतानाची विचार करण्याची पद्धत… वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गोलंदाजाने कशाप्रकारे विचार करावा,आणि जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतील तर गोलंदाजाने कसे स्वतःला शांत ठेवायचे,अमुक एका फलंदाजासाठी ‘प्लॅन’ कसा आखायांचा, अशा अनेक गोष्टी मी त्याच्याकडून समजून घेतल्या”, असे बुमराहने आपल्या मुलाखतीत सांगितलं.

तो म्हणाला की,“ माझ्या लहानपणी आम्ही रबरी चेंडूने खेळायचो. त्याला सीमसारखे डिझाईन असायचे. त्यामुळे ते चेंडू स्विंग व्हायचे. आम्ही जेथे खेळायचो तेथे सीम मुव्हमेंट, विविध टप्प्यावर गोलंदाजी किंवा यष्टीरक्षण अशा गोष्टी नसायच्या. फक्त चेंडू फलंदाजाच्या अंगावर टाकायचा किंवा पायावर गोलंदाजी करून त्याला बाद करणे हाच आमचा उद्देश असायचा. जर तुम्हाला फलंदाजाला बाद करायचे असेल, तर यॉर्कर चेंडू टाका असा साधा नियम आम्ही लहानपणापासूनच शिकलो आणि अजूनही त्याच एका गोष्टीमुळे मला गोलंदाजीत यश मिळतंय”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.