Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5718

सर्वसामान्यांना झटका! गॅस सिलेंडर महागलं

नवी दिल्ली । देशात सध्याच्या घडीला लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण केल्यानंतर आता देशात तीन टप्प्यांमधील अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनलॉक प्रक्रियेच्या याच टप्प्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्याअंतर्गत बऱ्याच गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती वापरातील एलपीजी सिलेंडरच्या दरांत वाढ केली आहे. HPCL, BPCL, IOC या तेल कंपन्यांकडून विना अनुदानित एलपीजी अर्थात घरगुती वापरातील सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये ११.५० रुपयांनी वाढली आहे. परिणामी आता हे दर प्रति सिलेंडर ५९३ रुपयांवर पोहोचला आहे.

कोलकात्यामध्ये सिलेंडरच्या दरात तब्बल ३१.५० रुपयांनी वाढ झाली आहे. ज्या आधारे आता हे दर ६१० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईमध्ये हे दर ११.५० रुपयांनी वाढले आहेत. ज्यामुळं आता मुंबईकरांना एका विनाअनुदानित सिलेंडरसाठी ५९०. ५० रुपये मोजावे लागणार आहेत. देशभरात सध्याच्या घडीला चेन्नईमध्ये ही वाढ सर्वाधिक प्रमाणात झाली असल्याचं कळत आहे. चेन्नईत एलपीजीचे दर ६०६.५० रुपयांवर पोहोचले असून, यामध्ये ३७ रुपयांची दरवाढ समाविष्ट आहे. दर महिन्याला तेल कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या आढाव्याच्या आधारे एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर निर्धारित केले जातात. त्याच धर्तीवर ही दरवाढ समोर आली आहे. किंबहुना सध्याच्या घडीला झालेल्या या दरवाढीचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पंतप्रधान मोदी सक्षम नेतृत्व, त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत; पण… – सामना

मुंबई । पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अशा शब्दात आज शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळण्यात आली आहेत. मात्र त्याचबरोबर साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या असं म्हणत भाजप सरकारच्या झालेल्या चुकांवरही सामानातून बोट ठेवण्यात आलेले आहे.

गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, पूर्ण बहुमत असल्याने भाजप सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत असंही सामानातून म्हणण्यात आले आहे. फक्त मागील सहा वर्षांत देश उभा राहिला असे कोणी म्हणत असेल तर ती इतिहासाशी बेईमानी ठरेल असाही अग्रलेखात म्हटले गेले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या बदलीची चर्चा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे देशात मागील दोन महिन्यांपासून संचारबंदी लागू आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या कामावर पंतप्रधान मोदी खुश नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सीतारामन यांची बदली होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

लॉकडाउनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कमी पडत असल्याचे उद्योगजगतात बोलले जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांची बदली करून नवीन चेहऱ्याला अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवू शकतात अशी चर्च आहे. प्रख्यात बँकर के व्ही कामत यांच्या कडे अर्थमंत्री पद सोपवले जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे. कामत हे आयसीआयसीआय चे माजी चेअरमन आहेत.

दरम्यान, कामतांनी एनडीबी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र अशा प्रकारच्या चर्चा या अगोदरही अनेकदा झाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी अर्थमंत्री सीतारामन यांना हटवून नवीन चेहऱ्याला संधी देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बॉलिवूडला कोरोनाचा धक्का; संगीतकार वाजिद खान यांचे मुंबईत निधन

मुंबई । बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये लोकप्रिय असणाऱ्या संगीतकार साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. आठवडाभरापूर्वीच वाजिद यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आज प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले.

रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूला एका चांगल्या संगीतकाराला गमवावं लागले आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

करोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रा, सोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं ‘हिट कॉम्बिनेशन’ होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.

‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘वीर’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘पार्टनर’ यासह सलमानच्या विविध चित्रपटांची गाणीही वाजिद यांनी गायली होती. साजिद-वाजिद जोडीने ‘एक था टायगर’, ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘दबंग ३’, ‘पार्टनर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रावडी राठोड’, ‘हाउसफुल २’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown 5.0 | राज्यात ‘या” गोष्टी बंदच राहणार

मुंबई । राज्य सरकारने लॉकडाऊन ५ची घोषणा करताना कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रात अनेक गोष्टी शिथिल केल्या आहेत. मात्र करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही गोष्टींवर संपूर्ण राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मॉल्स, मेट्रो रेल्वे, शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे बंद राहणार आहेत. केंद्राने परवानगी दिली असली तरी धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसं आज जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

या गोष्टी राहणार बंद
– शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण केंद्रे आदी बंद राहतील
– आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद राहील. महाराष्ट्र सरकारच्या परवानगी असेल तर सुरू होईल.
– मेट्रो रेल्वे बंद राहील
– सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, बार, सभागृहे, विधानसभा सभागृह आदी बंद राहणार आहे
– सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमास बंदी राहणार आहे
– धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे बंद राहतील
– सलून, स्पा, ब्युटी पार्लरही बंद राहणार आहे
– शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर सेवा बंद राहतील

Unlock 1.0 | पुणे शहरात काय सुरु राहणार? काय बंद राहणार? 

पुणे । देशात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात संचारबंदीचे बरचसे नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने  होणार आहेत. पुणे शहर हे  देशातील १३ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरांपैकी असल्यामुळे येथील कंटेनमेंट झोनमध्ये काटेकोरपणे संचारबंदीचे पालन केले जाणार असले तरी इतर परिसरात संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यांच्याबरोबर काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक ही सुरु होण्याची शक्यता आहे. पीएमसी आणि रिक्षा सुरु होतील असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.

एकाच ठिकाणी ५ रुग्ण असतील तर तेथील इमारत किंवा बैठी घरे ही  कंटेन्मेंट झोनमध्ये जातील. पुण्यातील काही भागात फारसे रुग्ण आढळले नाहीत त्यामुळे अशा परिसरात सर्व कामकाज सुरळीत सुरु होतील. यामध्ये औंध, बाणेर-बालेवाडी, कोथरूड, पाषाण, सिंहगड या भागांचा समावेश आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या १०० मीटरच्या परिसराला कंटेन्मेंट झोनमध्ये गणलं जाईल पण पूर्वीच्या कंटेन्मेंट झोनमधील रुग्ण कमी झाले असतील तर तेथील नियम शिथिल केले जातील अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संचारबंदी वाढविली असली तरी कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतरत्र नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्य शासनाला निर्णय घेण्यास स्वातंत्र्य दिले असल्यामुळे कंटेन्मेंट झोनबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल अशी माहिती दिली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये काटेकोर निर्बंध असल्याने तेथील रहिवाशाना किमान जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी प्रशासन अशी दुकाने पूर्णवेळ उघडण्याची परवानगी देऊ शकते.

कोरोनाचा लिपस्टिक कंपन्यांना फटका; ‘या’ कारणामुळे महिलांनी सोडले लिपस्टिक लावणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे मेकअप होय. आपले सौन्दर्य खुलविण्यासोबत व्यक्तिमत्व प्रभावी दिसण्यासाठीही मुली मेकअप करतात. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो असेही मुली सांगतात. मेकअप मध्ये सर्वात जास्त मुली लिपस्टिक ला प्राधान्य देत असतात. प्रसंगानुरूप लिपस्टिकच्या शेड वापरतात. पण कोरोनामुळे आता लिपस्टिक वापरूनही काही उपयोग नाही कारण फेसमास्क मुळे ती दिसणार नाही. याचा परिणाम लिपस्टिक ची मागणी कमी झाली आहे.

आता मुलींनी डोळ्यांच्या मेकअप ला जास्त प्राधान्य दिले असून या सामाजिक अलगाव च्या काळात मोठ्या प्रमाणात डोळ्यांच्या मेकअप शी संबंधित कॉस्मेटिक्स ला मागणी आहे. लॉरियल इंडियाच्या संचालक कविता आंग्रे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलें, “मुली जेव्हा एखादे प्रेझेन्टेशन असते तेव्हा लिपस्टिक लावण्यावर भर देतात. वर्क फ्रॉम होमी करताना मुली याला जास्त प्राधान्य देत नाहीत. आम्ही आता त्यांना डोळ्यांच्या मेकअप कडे वळविले आहे.” तर नायका या ब्रॅण्डच्या एका व्यक्तींनी भारतात डोळ्यांच्या मेकअप च्या कॉस्मेटिक्स ची मागणी वाढल्याचे सांगितले आहे.

तसे पाहता मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिकीकरण थांबत नाही. त्यामुळे तो वेगवेगळे मार्ग शोधत असतो. लिप्स्टिकचे दिवसही लवकरच येतील असा विश्वास कॉस्मेटिक्स कंपनीच्या लोकांना आहे. याबरोबरच  कोरोनाच्या संसर्गामुळे हायजिनवर ही भर दिला जात आहे त्यामुळे कॉस्मेटिक्स तज्ज्ञ यावर लक्ष केंद्रित करत आहेत. आता संचारबंदीनंतर बाहेर पडल्यावर विविध प्रकारे डोळ्यांचा मेकअप केलेल्या तरुणी पाहायला मिळतील हे नक्की.

Unlock 1.0 | म्हणून सरकारकडून लॉकडाउन ऐवजी अनलॉक शब्दाचा वापर; सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार ‘हा’ परिणाम

Narendra Modi
Narendra Modi

वृत्तसंस्था । ३१ मे ची संचारबंदी संपल्यानंतर पुन्हा संचारबंदी होणार की उठवली जाणार असे अनेक प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरे मिळाली असून आता ३० जूनपर्यंत ही संचारबंदी वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून याचा अनलॉक १.० असा उल्लेख करण्यात आला आहे. काही नियम शिथिल करण्यात आले असून कंटेन्मेंट झोनमधील नियम अद्याप शिथिल केले गेले नाहीत. पण हळूहळू हेही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. आणि यामुळेच सरकारकडून याला लॉकडाउनच्या ऐवजी अनलॉक असे म्हणण्यात आले आहे. सध्या कंटेन्मेंट झोनबाहेर पूर्णतः सूट असणार आहे. राज्यातील गतिविधी टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक सभागृहही उघडले जाण्याची शक्यता आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आतापर्यन्त सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी होती. या संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार असून कंटेन्मेंट झोनमध्ये आता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. १ जूननंतर सर्व सूचना जरी केल्या जाणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थाही सुरु करण्याबाबत सरकार विचार करत आहे. ८ जूनपासून अनेक राज्यातील धार्मिक स्थळे उघडली जाणार आहेत. बऱ्याच राज्यांमधून मॉल सुरु करण्याची मागणी होती. मॉल हि टप्प्याटप्प्याने सुरु केले जाणार आहेत. या संचारबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये उघडले जाण्याची शक्यता आहे. ८ जूनपासून काही राज्यांनी मागणी केल्याप्रमाणे हॉटेल, रेस्टारंट सुरु केले जातील. या सर्व काळात मात्र सार्वजनिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यात  परिस्थिती पाहून त्यांना मान्यता देण्यात येणार आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावरील बंदी हटवली आहे. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही जाता येणार आहे. त्यासाठी आता परवानगीची आवश्यकता लागणार नाही आहे. या संचारबंदीचे जास्तीत जास्त अधिकार हे राज्य सरकारकडे राखून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादे राज्य या परवानगी नाकारू शकते. पण सामाजिक अलगावचे नियम हे सर्वाना बंधनकारक असणार आहेत. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडता येणार नाही आणि भौतिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे.

रोहित पवार म्हणाले, कोरोना युद्धात लढणारा एक योद्धा आमच्याही कुटुंबात 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्या सोशल मीडियावर नेहमी कार्यरत असतात. कोरोनासंदर्भात अनेक घटनांबद्दल तसेच इतरही गोष्टींबद्दल ते बोलत असतात. त्यांनी आज आपल्या ट्विटर अकॉउंट वरून आज अशीच एक माहिती सांगितली आहे. पवार यांनी कोरोनाच्या युद्धात लढणारा एक योद्धा आमच्याही कुटुंबात असल्याचे ट्विट केले आहे. सर्वाना माहित आहे पवार यांचे सासर पुणे आहे. त्यांची मेव्हणी पुण्यात एका रुग्णालयात योद्धा म्हणून कोरोनाविरोधात लढते आहे.

त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून आपल्या मेव्हणीचा फोटो शेअर करून सांगितले आहे. या आमच्या कुटुंबातील कोरोना योद्धा आहेत. त्यांना भेटून त्यांनी आज त्यांचा सत्कार केला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हंटले आहे, “कोरोनाशी लढणारा एक योद्धा आमच्याही कुटुंबात आहे तो म्हणजे माझ्या सौ.कुंती यांची बहीण डॉ.शिल्पा मगर. नवले हॉस्पिटलमध्ये त्या कोरोना पेशंटची सेवा करतायेत. आज आवर्जून त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला.”

 

यावेळी राज्यातील इतर कोरोना योद्धांचाही आम्हाला अभिमान आहे. असा उल्लेख करताना ते म्हणाले, “राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे.” पवार यांचे सासरे सतीश मगर हे पुण्यातील बिल्डर आहेत तर त्यांची मेव्हणी नवले हॉस्पिटल मध्ये सेवा बजावत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

भटक्या कुत्र्यांना बिस्कीट घाऊ घालत असलेल्या चिनी महिलेला दिल्लीत बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रेटर नोएडामधील अनिवासी भारतीय राहत असलेल्या सोसायटीमध्ये एका चिनी महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मात्र, ही चिनी महिला सोसायटीतील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालत होती. त्यावेळी हा ६० वर्षीय पुरुष आणि एक चिनी महिला यांच्यात कुत्र्यांना बिस्किटे खायला घालण्यावरून वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने या चिनी महिलेला काठीने मारहाण केली.

 

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीड़ित चिनी महिला आणि आरोपी व्यक्ती नोएडाच्या एटीएस पॅराडीझो सोसायटीत राहतात. आरोपी प्रॉपर्टीचे काम करतो तर हि महिला झी कंपनीत काम करते ज्याचे मुख्यालय चीनमध्ये आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २५ मे रोजी आरोपी सोसायटीबाहेर आपल्या पाळीव कुत्र्यासह फिरत असताना ही महिला भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालत होती. त्यावेळी हि घटना घडली. अधिकारी म्हणाले, ” भटकी कुत्री आणि पाळीव कुत्री यांच्यात भांडण झाले. यावर या व्यक्तीने त्या महिलेला सांगितले की,’ जर तिला दररोज या भटक्या कुत्र्यांना खायला घालायचे असेल तर तिने त्यांना दत्तक घ्यावे.

अधिकारी म्हणाले, ‘या बाईंनी त्याला हा सल्ला का दिला असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी या व्यक्तीने तिला काठीने मारले. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, “त्या महिलेनेदिलेल्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आरोपी अमरपालसिंग याला शुक्रवारी एटीएस गोलचकरजवळ अटक करण्यात आली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. चिनी नागरिकाने ट्विटरवर या घटनेचा उल्लेख केला होता. तिच्या या ट्विटला जिल्हा पोलिसांनी प्रतिसाद देत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.