Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5790

मजुरांच्या वाहनाला अपघात; २४ जण जागीच ठार

औरैया । आज पहाटे उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आपापल्या घरी निघालेल्या मजुरांच्या ट्रकला दुसऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पहाटे ३:३० वाजता झालेल्या या अपघातात २३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ ते २० जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर मजूर हे राजस्थान येथून आपापल्या घरी जाण्याकरता ट्रकमधून प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या ट्रकला उत्तर प्रदेशातील औरैया येथे अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले बहुतेक मजूर हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील असल्याचे समजत आहे. औरैया चे जिल्हाधिकारी अभिषेक सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. लॉकडाऊन मध्ये हाताला काम नसल्याने अनेक ठिकाणहून मजूर आपआपल्या गावी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. परिणामी त्यांना अशा अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारतीय क्रिकेटर श्रीसंत करणार मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटर श्रीसंत गेल्या काही काळापासून चित्रपट सृष्टीत आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीसंतने HELO अॅपवर लाईव्ह येत आपण मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार असल्याचे सांगितले.

शुक्रवारी HELO अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये श्रीसंतने सांगितले की आतापर्यंत मी जे कीही रोल्स केलेत त्यातील हा सर्वोत्तम रोल असणार आहे. या मराठी चित्रपटाटे नाव मुंबईचा वडापाव असल्याचेदेखील श्रीसंतने सांगितले. या चित्रपटाची शुटींग पुणे आणि नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे.

श्रीसंतच्या या चित्रपटात मल्याळम आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध कलाकारही दिसण्याची शक्यता आहे. क्रिकेट कारकीर्द थांबल्यानंतर २०१७ मध्ये श्रीसंत ‘अक्सर 2’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच श्रीसंतने लोकप्रिय ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.

लोकांना दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा देवस्थानातील सोने व्याजाने घेणे योग्य – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी देवस्थानातील सोने कर्जरूपात घ्यावे असे अपील केले होते. मात्र चव्हाण यांच्या या विधानानंतर समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी चव्हाण यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून लोकांना दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा देवस्थानातील सोने व्याजावर घेऊन देशासमोरील संकटावर मात करणे कधीही योग्य असल्याचे विधान केले आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य आहे. सर्वधर्मीय देवस्थान मधील सोने 1 ते 2 टक्के व्याजाने सरकारने घ्यावे. कारण सध्या देश संकटात आहे. अशा वेळेला दारू विकून किंवा जनतेला दारू पाजून महसूल उभा करण्यापेक्षा हा पर्याय कधीही योग्यच राहील असे म्हणत देसाई यांनी आपली याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या अभ्यासू मागणीनंतर काही लोकांनी त्यांच्यावर धर्माच्या विरोधात अशा पद्धतीने टीका केली आहे. त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की “पृथ्वीराज चव्हाण यांचे डोके ठिकाणावर आहे तुमचे डोके ठिकाणावर ठेवून टीका करा, देवस्थान ही कोणाच्याच बापाची खाजगी मिळत नाही ओ. यात देवाला अर्पण केलेले पैसे, सोने जे काही असते ते भक्तांनी मनोभावे अर्पण केलेले असते आणि त्याचा उपयोग जर देश संकटात असेल तेव्हा झाला तर नक्कीच देवालाही आनंद होईल असाही देसाई यांनी यावेळी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आदिती तटकरेंचा वर्क मोड ऑन

रायगड प्रतिनिधी । श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे या कोरोना संकटाच्या काळात वर्क मोड ऑन करून काम करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार म्हणून ओळख असणाऱ्या तटकरे यांनी आज सुधागड तालुक्यातील वावळोली आश्रमशाळा येथील १०० खाटांची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. यावेळी कोवीड केअर सेंटर येथील किचनची पाहणी केली. तेथील स्वच्छता, सॅनिटायझेशन बाबत व उत्तम दर्जाचा आहार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. डाॅक्टरांच्या सुरक्षिततेसाठी अतिरीक्त PPE किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांच्याकरीता राहण्याची सोय करण्यात आली आहे. रूग्णांच्या आरोग्य तपासणी करीता स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे.

दम्यान, सुधागड तालुक्यात १०० खाटांची व्यवस्था असलेले वावळोली आश्रमशाळा येथे कोविड केअर सेंटर स्थापित करण्यात आले आहे.या कोविड केअर सेंटरला अद्ययावत ठेवावे,अशा सुचना तटकरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. या ठिकाणी दोन ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. कोवीड केअर सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने करण्याच्या सुचनादेखील संबंधितांना दिल्या. प्रसंगी सुधागड तालुक्याशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला असेही तटकरे यांनी सांगितले.

लाॅकडाउनमध्ये भाडेकरुला भाडे मागणे पडले महागात; घरमालकावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देश ५० दिवस लॉकडाऊनमध्ये आहे. लोकांसमोर अन्न आणि पाण्याची समस्या उभी आहे. असे असूनही, जमीनदारांच्या वतीने भाडेकरूंचा छळ केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांनी एका घरमालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीमध्ये एका भाडेकरूच्या तक्रारीवरून शाहदारा पोलिसांनी घरमालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन दरम्यान जबरदस्तीने भाडे देण्यास भाग पाडल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. सरकारने सध्या सुरु लॉकडाऊन दरम्यान भाडे वसूल न करण्याबाबतची मार्गदर्शक सुचना जाहीर केली होती. या घरमालकाविरुद्ध आयपीसीच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी दिल्ली-गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातील अनेक प्रवासी कामगार जमले. आता येथून ते पायीच आपल्या गावी प्रवास करणार आहेत. या कामगारांपैकी एकाने सांगितले की माझे घर हरदोईमध्ये आहे … मी घरभाडे न दिल्याने, घरमालकाने मला घरातून बाहेर काढले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात दिवसभरत सापडले १ हजार ५७६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या २९ हजार १०० वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ३४,पुण्यात ६,अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये२, धुळयात २,पनवेलमध्ये १,जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १७,६७१ (६५५)
ठाणे: १८९ (३)
ठाणे मनपा: १३०२ (११)
नवी मुंबई मनपा: ११७७ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४४४ (६)
उल्हासनगर मनपा: ८६
भिवंडी निजामपूर मनपा: ४१ (२)
मीरा भाईंदर मनपा: २६० (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: ३२१ (११)
रायगड: २१२ (२)
पनवेल मनपा: १८० (१०)
ठाणे मंडळ एकूण: २१,९२५ (७१८)

नाशिक: ९९
नाशिक मनपा: ६३
मालेगाव मनपा: ६६३ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ६४ (५)
जळगाव: १९० (२३)
जळगाव मनपा: ५६ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १२३८ (७४)

पुणे: १८५ (५)
पुणे मनपा: ३१४१ (१७२)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३५६ (२०)
सातारा: १२६ (२)
पुणे मंडळ एकूण: ३९७२ (२०४)

कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३७
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८६ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १६२ (५)

औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६८३ (२०)
जालना: २१
हिंगोली: ६६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ८७१ (२१)

लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ६
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९६ (५)

अकोला: १९ (१)
अकोला मनपा: २०७ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: ९२ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
अकोला मंडळ एकूण: ४५२ (२८)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३३२ (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३४३ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)
एकूण: २९ हजार १०० (१०६८)

फेसबुक पोस्ट ब्लाॅक करणार्‍यांच्या यादीत पाकिस्तान अव्वल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने नुकतेच एका अहवालात असा खुलासा केला आहे की जगभरातील सरकारच्या विनंतीवरून गेल्या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत तब्बल १५,८२६ पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या आहेत. रशिया, पाकिस्तान आणि मेक्सिको या देशांमध्ये सर्वाधिक पोस्ट ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत.

फेसबुकच्या मते, १ जुलै ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान रशियाच्या विनंतीवरून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर २,९०० पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या. या यादीत पाकिस्तान हा देश दुसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरून २,२७० पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या.

फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील अशाच पोस्ट ब्लॉक केल्या गेल्या ज्यामध्ये त्या त्या देशांच्या स्थानिक कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की पाकिस्तान टेली कम्यूनिकेशन अथॉरिटीच्या आदेशानुसार २,२७० पोस्ट माध्यमांमध्ये पोहोचण्यापासून रोखण्यात आले आहे. इतकेच नाही तर फेसबुकने २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांतही सुमारे ५,६९० पोस्ट्स ब्लॉक केल्या होत्या, परंतु या पोस्ट्सबाबत अजूनपर्यंत कोणताही खुलासा झालेला नाही. फेसबुकने म्हटले आहे की पीटीएच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी कायद्याच्या उल्लंघनाच्या श्रेणीत येणाऱ्या या पोस्टना लोकांपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

पोलिओ लस मोहिम रोखण्यासाठी, न्यायालयीन किंवा धार्मिकदृष्ट्या अपमानकारक माहिती किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रतिष्ठेच्या विरुद्ध असलेली माहिती सरकारच्या विनंतीवरून ब्लॉक केली जाते. फेसबुकच्या मते, जानेवारी २०१९ ते जून २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षीच्या शेवटच्या सहा महिन्यांत फेसबुक टूल्स आणि पेजवर प्रवेश रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंत्यांची संख्या कमी झाली आहे.

यामध्ये यूझर्सच्या डेटामध्ये प्रवेश करण्याच्या विनंत्या वाढल्या आहेत. अहवालानुसार, मागील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, यूझर्सच्या डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी १८४९ विनंत्या मिळाल्या आणि गेल्या सहा महिन्यांत २००० हून अधिक विनंत्या प्राप्त झाल्या. हा डेटा संपूर्णपणे पाकिस्तानचा आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची संख्या ही ३५,७८८ पर्यंत वाढली आहे आणि मृतांचा आकडा हा सातशेच्या पुढे गेला आहे. डिजिटल मीडिया एक्टिविस्ट फरहान हुसेन यांनी या विषयावर म्हटलं आहे की पोस्ट ब्लॉक करण्यामुळे फेसबुक किंवा इन्स्टाग्राम वापरकर्ते आता अधिक सावध झाले असल्याचे दिसून येत आहे.फरहान म्हणाले की, फेसबुक यूझर्सच्या डेटामध्ये प्रवेश करण्याची विनंतीत वाढ होणे ही चिंतेचा विषय आहे. मात्र पीटीएने अद्याप फेसबुकच्या या अहवालावर कोणतीही प्रतिकिया दिलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमेरिका चीनसोबतचे सर्व व्यापारी संबंध थांबवणार; ट्रम्प म्हणतात जिनपिंग यांच्याशी बोलायचीही इच्छा नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी चीनवर पुन्हा एकदा आगपाखड करताना म्हंटले की,’अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी यापुढे बोलण्याची आपली इच्छा नाही. कोरोनो व्हायरसच्या साथीशी चीनचा संबंध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून असे दिसते की ते चीनशी असलेले आपले व्यावसायिक संबंध पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आहेत.

कोरोना साथीच्या विषयावरून वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात सध्या तणाव निर्माण झालेला आहे. हे दोन्ही देश एकमेकांचे मोठे व्यावसायिक भागीदार आहेत परंतु अलीकडच्या काळात तसेच २०१९ च्या उत्तरार्धात, चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे या दोघांच्या नात्यात कटुता आली आहे. ट्रम्प यांनी फॉक्स बिझिनेसशी बोलताना सांगितले की, ‘माझे जीन पिंग बरोबर चांगले संबंध आहेत, परंतु मला आता त्यांच्याशी बोलायचे नाहीये. मी चीनमुळे खूप निराश झालो आहे. ‘

यावर अमेरिका काय करू शकते असे विचारले असता ट्रम्प यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही, परंतु धमकीवजा समज देताना ते म्हणाले, “आम्ही बर्‍याच गोष्टी करू शकतो. आम्ही आपले व्यावसायिक संबंध संपूर्णपणे संपवू शकतो. ‘ ट्रम्प यांनी विचारले, ‘आम्ही असे केले तर काय होईल? जर आपण त्यांच्याशी असलेला आपला संबंधच कमी केला तर जवळपास ५०० अब्ज डॉलर्स आपण वाचवू शकतो. ‘

परंतु ट्रम्प यांनी फॉक्स बिझिनेसवर चीनविषयी आणखीनच आक्रमक भूमिका घेत सांगितले की ‘त्यांना कोरोनाचा प्रसार थांबवता आला असता. ते चीनमध्ये थांबवू शकले असते, परंतु तसे झाले नाही. ते म्हणाले, “जगातील आणि आपल्या देशातील सर्व लोकांच्या मृत्यूचे जे झाले हे फारच वाईट आहे.”

या साथीच्या रोगाने अमेरिका-चीनमधील पूर्वीचे युद्ध आणखीच गंभीर वळणावर आलेले आहेत. ट्रम्प यांनी व्यवसायिक कराराच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस चीनशी चर्चा करण्याच्या मुद्यावर ट्रम्प यांनी या करारावर पुनर्विचार करण्याविषयी सुचवले.

गेल्या शुक्रवारी, चीनी पत्रकारांनी वॉशिंग्टनच्या पत्रकारांशी फोनवर चर्चा केली आणि दोन्ही बाजूंनी या कराराचा पहिला टप्पा राबविण्याविषयी सहमती दर्शविली. परंतु अमेरिकन अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, चीनी हॅकर्स उपचार आणि कोरोनो व्हायरस लसींचा डेटा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि यामध्ये चिनी सरकारशी संबंधित काही गटही सहभागी आहेत.

कोरोनाच्या प्रयोगशाळेतील उगमाविषयीच्या पुराव्याबाबत विचारले असता ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला सांगितले, ‘आमच्याकडे याविषयी बरीच माहिती गोळा झालेली आहे आणि ती चांगली नाही आहे. पण तरीही, ते प्रयोगशाळेतून आले काय किंवा वटवाघळाद्वारे आले काय – हे सर्व चीनमधून आले आणि त्यांनी ते थांबवले पाहिजे होते. ‘ विशेष म्हणजे चीनवरील बंदीची चर्चा ही जगभरात होत असून यासह अनेक देशांनी याबाबत नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

साताऱ्यात आज दिवसभरात ४ नवे कोरोनाग्रस्त; एकूण संख्या १२८ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण चार नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. सकाळी सातारा जिल्हा कारागृहातील एक कैदी कोरोना बाधित सापडल्यानंतर आता जिल्ह्यातील अन्य तिघांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अमोद गडीकर यांनी दिली आहे.

सातारा येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेले दोन निकट सहवासीत आणि ११ तारखेला मुंबई वरून प्रवास करून आलेला कोरोना केअर सेंटर मध्ये ठेवलेला कोरेगाव तालुक्यातील युवक कोरोना बाधित निघाला आहे. आज साताऱ्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात साताऱा शहरातील दोघांचे तर कोरेगाव येथील मुंबईहून आलेल्या युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १२८ वर गेली असून आज कराड येथील एकूण १५ कोरोना रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत कोरोना मुक्त होवून घरी गेलेल्यांची संख्या ६० आहे. तर कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मान्सून केरळमध्ये २८ मे रोजी पोहोचणार तर महाराष्ट्रात कधी ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात यावर्षी मान्सून कदाचित वेळेआधीच दाखल होऊ शकेल. स्कायमेट या खासगी कंपनीने मान्सून आणि हवामानाबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी मान्सून हा १ जूनऐवजी २८ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. या एजन्सीच्या म्हणण्यानुसार यावेळी मान्सून त्याच्या निर्धारित वेळेच्या ४ ते ५ दिवस आधीच अंदमानच्या समुद्रात येऊ शकेल.

देशाच्या अधिकृत हवामान कार्यालयाच्या आयएमडीने अंदमान समुद्रात मान्सून २२ मेपर्यंत येण्याची शक्यताही वर्तविली आहे, परंतु केरळला तो पोहोचण्याची तारीख ही १ जूनपर्यंत कोणताही बदल न करता करण्यात आली आहे. स्कायमेट यांनी दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा नैऋत्य मान्सून २८ मे रोजी केरळ किनारपट्टीवर पाऊल ठेवू शकेल.

स्कायमेट पुढे म्हणाले की, मान्सूनचा प्रवाह हा गेल्या शनिवारी-रविवारी अंदमान समुद्राच्या दिशेने वर चढताना दिसला आहे, जो २२ मे च्या सामान्य तारखेच्या सुमारे ४ दिवस आधीच आलेला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने असेही म्हटले आहे की यंदा पावसाळ्यासाठी हंगामी परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसते. यावर्षी अंदमान समुद्रातील हवामान ब्युरोने २० मे ते २२ मे दरम्यान नॉर्मल ऑनसेट डेटमध्ये बदल केला आहे. मात्र, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख ही १ जून कायम ठेवण्यात आली आहे. पहिल्या मान्सूनच्या घोषणेत आयएमडीने म्हटले आहे की, यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून देशात सामान्य राहील, त्याची सरासरी सुमारे १०० टक्के असेल, जे ८८ सेंटीमीटर असेल. विशेष म्हणजे अंदमान निकोबारमध्ये मान्सून साधारणत: २० मे नंतर येतो, त्यानंतर केरळला पोहोचण्यासाठी त्याला अजून १०-१२ दिवस लागतात.

आयएमडीच्या अहवालानुसार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत मान्सून सामान्य तारखांच्या तुलनेत ३ ते ७ दिवस उशीरा येईल. दिल्लीसाठी मान्सूनची सुरुवात २३ जून ते २७ जून दरम्यान असेल. त्याचप्रमाणे मुंबई आणि कोलकाता येथे १० ते ११ जून तर चेन्नईमध्ये १ ते ४ जून या कालावधीत येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.