Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5792

क्रिकेट सुरु झाल्यावर आधी IPL कि टी-२० वर्ल्ड कप? रवी शास्त्री म्हणाले..

मुंबई । कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला होता. २ महिन्यांपेक्षा जास्त काळ क्रीडा स्पर्धा बंद आहेत. मात्र आता क्रिकेट जगतात बीसीसीआय पुन्हा एकदा स्पर्धा सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून आपली पावलं उचलत आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय संघासाठीचा प्राधान्यक्रम निश्चीत केला आहे. टी-२० विश्वचषक खेळण्याऐवजी भारतीय खेळाडूंनी IPL, दोन देशांमधील मालिका खेळण्यावर अधिक भर द्यावा असं मत शास्त्री यांनी व्यक्त टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना केलं आहे.

वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. तर दुसरीकडे टी-२० विश्वचषक आयोजित झालाच तर आयसीसीशी संलग्न बहुतांश देश प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्यास तयारीत नाही. अशा परिस्थितीत रवी शास्त्री यांनी भारतीय खेळाडूंसाठी स्थानिक क्रिकेट, आयपीएल आणि दोन देशांमधील मालिका असा प्राधान्यक्रम तयार केला.

“माझं मत आहे की दोन देशांमधील मालिकेने क्रिकेटची पुन्हा एकदा सुरुवात व्हावी. जर आम्हाला विश्वचषक आणि दोन देशांमधील मालिका असा पर्याय मिळाला तर आम्ही नक्कीच दोन देशांमध्ये मालिक खेळण्याचा पर्याय निवडू. सध्याच्या परिस्थितीत १५ संघ प्रवास करुन एका देशात येण्यापेक्षा दोन देशांनी एक किंवा दोन मैदानांमध्ये क्रिकेट मालिका खेळणं कधीही चांगलं.” असं शास्त्री यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, जर विश्वचषक आणि आयपीएल यापैकी एक पर्याय निवडायचा असल्यास नक्कीच आधी आयपीएलचा विचार झाला पाहिजे. ज्यावेळी क्रिकेट पुन्हा एकदा सुरु करण्याची वेळ येईल त्यावेळी आपण पहिलं प्राधान्य आयपीएलला द्यायला हवं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि आयपीएलमध्ये बराच फरक आहे. आयपीएल आपण नियजोन करुन एक किंवा दोन शहरांमधील मैदानात खेळवू शकतो. आयसीसीने क्रिकेट स्पर्धा सुरु करताना या गोष्टीचा विचार करायला हवा असं शास्त्री यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

ऑनलाईन मद्य खरेदी करत असाल तर सावधान; नोंदणीसाठीच्या अनाधिकृत लिंकद्वारे फसवणुक होण्याची शक्यता

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाईन शॉप समोर मद्यप्रेमींची गर्दी होऊ नये म्हणून आजपासून ऑनलाईन मद्यखरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाइन लिंक देण्यात आली आहे .आता या लिंकवरून नोंदणी करताच सशुल्क मद्य घरपोच मिळणार आहे. पण नोंदणी करताना मद्य प्रेमींनो सावधान ! तुम्ही ज्या लिंकवर नोंदणी करत आहात ती फेक असू शकते व तुम्ही फसवले जाऊ शकता. त्यामुळे अधिकृत लिंक वर जाऊन नोंदणी करणे शहाणपणाचे ठरणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी परभणी जिल्ह्यात मद्य खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचे नियमन होण्यासाठी मद्य खरेदी करु इच्छीणा-या नागरीकांची नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान असे आढळून आले आहे की, या लिंकसारखीच फेक लिंक सोशलमिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे परभणी जिल्हा प्रशासनाकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून सर्व नागरीकांनी मद्य खरेदीसाठी अधिकृत लिंक वरुनच अर्ज करावेत. बनावट लिंक वरून माहिती भरल्यास आणि त्याद्वारे नागरीकांची फसवणूक झाल्यास जिल्हा प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकृत लिंक पुढील प्रमाणे आहे. https://forms.gle/sFSw7NrgtYY62kHMA तसेच हीच लिंक परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://parbhani.gov.in/ उपलब्ध आहे. नागरीकांनी अधिकृत प्रणालीचा वापर करावा आणि बनावट लिंक पासून सावध राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

अजित डोवाल यांच्या प्रयत्नांना यश! म्यानमारने २२ जहाल बंडखोरांना केलं भारताच्या स्वाधीन

नवी दिल्ली । म्यानमार लष्कराने ईशान्य भारतातील २२ बंडखोरांना शुक्रवारी दुपारी भारत सरकारच्या स्वाधीन केले. हे सर्व बंडखोर ईशान्य भारतातील मणिपूर आणि आसाम या दोन राज्यांशी संबंधित आहेत. या दोन राज्यातील सुरक्षा यंत्रणा बऱ्याच काळपासून या बंडखोरांच्या मागावर होत्या. विशेष विमानाने या बंडखोरांना भारतात आणण्यात आले असं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

“म्यानमार सरकारने उचललेले हे मोठे पाऊल दोन्ही देशांमधील संबंध दृढ होत असल्याचे लक्षण आहे” असे एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. म्यानमारमधून या बंडखोरांना घेऊन विमानाने उड्डाण केल्यानंतर अधिकाऱ्याने ही माहिती दिली. बंडखोरांना घेऊन येणारे हे विमान सर्वात आधी मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये थांबेल तेथील स्थानिक पोलिसांकडे त्या राज्यातील बंडखोरांना सोपवलं जाईल. त्यानंतर हे विमान आसाममधील गुवाहाटी शहरात उतरणार आणि तेथील स्थानिक पोलिसांकडे उरलेले आसाममधील बंडखोरांना सोपवलं जाईल.

“म्यानमार सरकारने प्रथमच ईशान्य भारतातील बंडखोर गटाच्या नेत्यांना ताब्यात देण्याची भारताची विनंती मान्य केली आहे” असे अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण ऑपरेशन पार पडले. दोन्ही देशांमध्ये इंटेलिजन्स आणि संरक्षण सहकार्य दृढ होत असल्याचे हे लक्षण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराडकरांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आज पुन्हा १५ कोरोनाग्रस्तांना मिळाला डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराड तालुक्याची आता कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. आज तालुक्यात एकूण १५ कोरोनाबाधितांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला असुन दोन दिवसांपासुन कराड तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमधील 12 व कृष्णा हॉस्पिटल मधील 3 जण अशा एकूण15 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना आज रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.

आत्तापर्यंत कराडमधुन एकूण 52 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 1 जणाचा मृत्यू झाला आहे. कराड मध्ये आता 37 कोरोना अक्टिव रुग्ण असुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये सह्याद्रि हॉस्पिटलमधील वनवासमाचीतील 11 व खोडशीतील एक तर कृष्णा हॉस्पिटलमधून वनवासमाची, मलकापूर, कराड येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोना मुक्त झाला आहे. यामळे शुक्रवारी तालुक्यातील एकूण 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांचे डॉक्टर्स, नर्स यांनी टाळ्या वाजवून पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये संचालक दिलीप चव्हाण, हॉस्पिटलचे कामकाज विभाग प्रमुख डॉ. वंकटेश मुळे, सहाय्यक व्यवस्थापक विश्‍वजित डुबल तर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.

कर्‍हाड तालुक्यात आत्तापर्यंत 52 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये कृष्णा रूग्णालयातून 30, उपजिल्हा रूग्णालयातून 4 तर सह्याद्री रूग्णालयातून 18 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत महारूगडेवाडी, तांबवे, हजारमाची, बाबरमाची, चरेगाव, रेठरे बुद्रुक, कापील, कामेरी, कासेगाव, येतगाव, खोडशी, डेरवण, उंब्रज, मलकापूर आगाशिवनगर, वनवासमाची येथील रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या125 झाली असून या पैकी कोरोना मुक्त होवून घरी गेलेल्यांची संख्या ६० आहे. तर कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

POKमध्ये पाकिस्तान तयार करत आहे ‘एअर बेस’; सॅटेलाइट छायाचित्रातून फुटलं बिंग

नवी दिल्ली । पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई तळ उभारण्याचे काम सुरू केले असल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. नुकत्याच घेतलेल्या सॅटेलाइट छायाचित्रातून ही बाब समोर आली असून भारतासाठी चिंतेची बाब आहे. सामरिक रणनीतीच्या दृष्टीनं या हवाई तळाचा वापर भारताविरोधात होण्याची दाट शक्यता आहे. भारताविरोधात युद्ध झाल्यास त्याची पूर्वतयारी म्हणून हा हवाई तळ बनवला जात असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट छायाचित्राची पडताळणीत पाकव्याप्त काश्मीरमधील स्कार्दू भागात हा हवाई तळ बनवला जात असल्याचे ओपन सोर्स इंटेलिजेंस एनॉलिस्ट Detresfa ने दावा केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील स्कार्दूमध्ये पाकिस्तान या हवाई तळाचे विशेष महत्त्व असून भारताची चिंता वाढवणारी बाब आहे. या हवाई तळापासून श्रीनगर आणि लेह फक्त २०० किमी दूर आहेत. या हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर पाकिस्तान हवाई दल अवघ्या पाच मिनिटांत भारतात प्रवेश करू शकतात.

स्कार्दू येथील नवीन हवाई तळावर भूमिगत फ्यूल स्टेशन आणि शस्त्रागार ही उभारण्यात येणार आहे. या हवाई तळावरून पाकिस्तान चीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडोअरची देखरेख करू इच्छितो. स्कार्दूमध्ये आधीपासून नागरिकांच्या सोयीसाठी विमानतळ आहे. मात्र, लष्करासाठी, हवाई दलासाठी हवाई तळ उभं करण्याचे काम सुरू आहे. या हवाई तळाचा वापर चीनचे हवाई दलही करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दारुवर कर आकारणार्‍या दिल्ली सरकारला उच्च न्यायालयाचा दणका !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये दारूची विक्री करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. याच दारूच्या एमआरपीवर ७०% अतिरिक्त कोरोना कर लादण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. मात्र शुक्रवारी दिल्ली हायकोर्टाने हा अतिरिक्त कोरोना कर घेण्याचा आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्ली सरकारवर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. सरन्यायाधीश डी एन पटेल आणि न्यायमूर्ती सी हरिशंकर यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारच्या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्यास नकार दिला.

सध्या कोर्टाने बंदी घालण्यास नकार दिला आहे
हायकोर्टाने असे म्हटले आहे की, सध्या आम्ही ही बंदी घालू शकत नाही आहोत. दिल्ली सरकारच्या उत्तरानंतरच आता यावर न्यायालय काय तो निर्णय घेईल.या वाढीबाबत उत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे. त्यासाठी दिल्ली सरकारला २९ मे पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.या याचिकेत ४ मे रोजी दिल्ली सरकारच्या नोटिफिकेशनला आव्हान देण्यात आले आहे. त्यामध्ये दारूवरील ७०% अतिरिक्त “विशेष कोरोना टॅक्स” आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

३ मे नंतर दिल्लीत उघडली १५० दारूची दुकाने
वास्तविक, केंद्रीय गृह मंत्रालयाने दारू विक्रीस सूट दिल्यानंतर दिल्ली सरकारने ३ मे रोजी दिल्लीत दारू विक्रीची जवळपास १५० दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती, ज्याच्यानंतर दुकानाबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या तसेच सोशल डिस्टंसिंगचाही बोजवारा उडताना दिसून आला .

त्याच्या एकच दिवसानंतर, दिल्ली सरकारने दारूवर ७० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.विशेष म्हणजे, दिल्लीमध्ये दर तासाला सरासरी १९ ते २० लोक कोरोनाच्या संसर्गाला बळी पडत आहेत. गुरुवारी मिळालेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासात एकूण ४७२ नवीन लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला.यापूर्वी ७ मे रोजी सर्वाधिक ४८८ रुग्णांमध्ये संसर्ग झाला होता. आता दिल्लीत कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७०८४ वर पोहोचली असून आतापर्यंत ११५ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक; राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

मुंबई । राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत दोन्ही नेत्यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. याशिवाय या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

साधारणतः २ तासांपर्यंत ही बैठक सुरु होती. सर्व अधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा अहवाल दिला. तसेच या बैठकीत आर्थिक बाबींवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. चौथ्या लॉकडाऊनकडे जाताना राज्याच्या तिजोरीवर जास्त भार पडणार नाही, यासाठी काय उपाययोजन केल्या जाऊ शकतात, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मागील सुमारे ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाउनचा या बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला करत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांची त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली.

राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात आले होते. ६५ हजार उद्योगांना काम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत. तसेच, ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले. परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून, पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच, परप्रांतीय कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली.

या बैठकीत आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. तसेच, लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा पद्धतीने पाळायची यावरही चर्चा झाली. दरम्यान, देशभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना खिळ बसली आहे. याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारं पत्र शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बांगलादेशातून सांगलीमध्ये आले २६ प्रवासी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कुपवाडमधील १७ वर्षीय कोरोनाबाधित तरुणीच्या संपर्कातील 26 जणांचा दुसरा कोरोना चाचणीचा अहवाल गुरूवारी निगेटिव्ह आला. त्यामुळे कुपवाड करांना दिलासा मिळाला. सांगलीमध्ये बांगलादेशातून २६ प्रवासी दाखल झाले असून त्यांना मिरजेतील क्रीडा संकुलात संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गुजरातमधून आलेल्या त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील चौघांंचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी सांगितले.

दुधेभावीत चाळीस वर्षीय व्यक्ती २७ एप्रिल रोजी मुंबई येथून आली होती. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने तपासणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामध्ये संबंधित व्यक्तीची पत्नी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. तसेच कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुपवाडमधील मेहुणीची सतरा वर्षीय तरुणीची कोरोना चाचणी घेतली होती, त्या तरुणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्या तरुणीच्या संपर्कातील जवळचे तिघे तसेच अन्य 26 जणांना संस्था क्वारंटाईन केले होते. त्या सर्वांचे बुधवारी स्वॅब घेण्यात आले होते. या सर्व 26 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आल्याने कुपवाड मधील नागरिकांना दिलासा मिळाला. सरकारने परराज्यात आणि परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत येण्यास मुभा दिली आहे.

मागील काही दिवसापासून परराज्यातील नागरिक देण्यात येत होते. आता विदेशात असलेले भारतीयही परत येऊ लागले आहेत. सांगलीमध्ये बांगलादेशातून तब्बल 26 प्रवासी गुरुवारी दाखल झाले आहेत. राज्य सरकारने विदेशातून येणाऱ्या नागरिकांनाही हॉटेलमध्ये संस्था क्वारंटाईन होण्याची परवानगी दिली आहे, त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्यांना हॉटेलमध्ये राहण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र त्यांनी प्रशासनाच्या संस्था क्वारंटाईनमध्ये राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बांगलादेशातून आलेल्या 26 प्रवाशांना मिरजेतील क्रीडा संकुलामध्ये संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांचा 19 रोजी कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेेेतले जाणार आहेत.

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील मिरज महापालिकेचे तीन दवाखाने सील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेतील महापलिकेचा दवाखाना आणि सांगलीतील महापलिकेचे डायग्नोस्टिक सेंटर तीन दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना बाधित व्यक्ति संपर्कात आल्याने महापलिकेचे दवाखाने बंद केले आहेत. या हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सध्या होमकॉरंटाईन करण्यात आलेले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापरले असल्याने त्यांना कोणताही धोका नसल्याचं महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितलं.

मिरजेतील ६८ वर्षीय कोरोना बाधित महिला तब्येत बिघडल्याने ती महिला महापालिकेच्या फिव्हर क्लिनिक मध्ये दाखवण्यासाठी गेली होती. तिथल्या डॉक्टरांना लक्षणे ठीक नसल्याचे निदर्शनास येताच तिला तपासणीसाठी मिरजेतील कोरोना रुग्णालयात पाठवले असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सदरची महिला हि महापालिकेच्या हॉस्पिटलच्या संपर्कात आल्याने मिरजेतील महापालिकेचा दवाखाना तीन दिवसा साठी सील केला आहे. याठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम सध्या सुरु आहे.

सांगलीतील फौजदार गल्ली येथील महिलेला त्रास होत असल्याने ती महिला चार दिवस महापालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये उपचारासाठी जात होती. मात्र तिची तब्येत ठीक होत नसल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांनी तिला मिरज सिव्हिलला दाखवण्याचा सल्ला दिला. त्या महिलेची मिरज कोरोना रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तीही कोरोनाबाधित निघाल्याने सांगलीतील महापालिकेचे डायग्नोस्टिक सेंटर ३ दिवस बंद केले आहे. सांगली येथील महापालिकेच्या डायगणोस्टीक सेंटर आणि मिरज महापालिका दवाखान्यातील दोन डॉक्टर आणि सहा कर्मचारी यांना होम क्वांरणटाईन केले आहे. अशी माहिती महापलिका उपायुक्त स्मृती पाटिल यांनी दिली आहे.

सोन्या चांदीच्या किंमतीत जबरदस्त तेजी; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढताना दिसल्या आहेत. शुक्रवारी दुपारी,एमसीएक्स एक्सचेंजमधील ५ जून २०२० रोजीचा सोन्याचा वायदा हा २४९ रुपयांनी वाढून ४६,९४८ रुपये प्रति १० ग्रॅम ​झाला. यावेळी सोन्याची सर्वोच्च पातळी ही प्रति १० ग्रॅम ४७,३२७ रुपये झाली. त्याशिवाय एमसीएक्स एक्सचेंजमधील ५ ऑगस्ट २०२० रोजीचा सोन्याचा वायदा शुक्रवारी दुपारी २८३ रुपयांच्या वाढीसह प्रति १० ग्रॅम ४७,१३० रुपयांवर होता. यावेळी सोन्याची सर्वोच्च पातळी ही प्रति १० ग्रॅम ४७,४९१ रुपये झाली.

शुक्रवारी वायदे बाजारात चांदीच्या किंमतींमध्ये देखील प्रचंड वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी दुपारी एमसीएक्सवर चांदीच्या वायद्याचा भाव हा १,३४८ रुपयांच्या वाढीसह ४५,४८३ रुपये प्रतिकिलो होता.

आंतरराष्ट्रीय स्तराविषयी बोलायचे झाल्यास शुक्रवारी दुपारी सोन्याचा वायदा आणि त्याच्या स्पॉट किंमतीमध्येही वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी दुपारी सोन्याच्या जागतिक वायद्याचा भाव हा कॉमेक्सवर ०.२० टक्क्यांनी किंवा ३.५० डॉलरने वाढून प्रति औंस १७४४.४० डॉलरवर होता. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत ही ०.३६ टक्के म्हणजेच ०.१८ डॉलर प्रति औंसच्या तुलनेत १७३६.३८ डॉलरवर पोहोचली.

शुक्रवारी दुपारी आंतरराष्ट्रीय चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी दुपारी चांदीची जागतिक किंमत २.४६ टक्क्यांनी किंवा ०.३९ डॉलरने वाढून प्रति औंस १६.२६ डॉलर झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.