Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5871

उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात; कोण, काय म्हणाले?

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधुंची हत्या प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. प्रियांका गांधी यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनीही या प्रकरणाचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला. ट्विटरच्या माध्यमातून या सर्वानी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साधूंच्या हत्येनंतर प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट केलं. ”एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांत उत्तर प्रदेशात १०० जणांची हत्या झाली. तीन दिवसांपूर्वी एटामध्ये पचौरी कुटुंबाच्या ५ जणांचे मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळले. त्यांच्यासोबत काय घडलं? हे कुणालाही ठावूक नाही. आज बुलंदशहरात एका मंदिरात झोपलेल्या साधुंची क्रूर हत्या करण्यात आली. अशा गुन्ह्यांची चौकशी व्हायला हवी. तसंच या घटनेचं कुणाकडूनही राजकारण होता कामा नये. निष्पक्ष चौकशी करून सत्य सर्वांसमोर मांडण्याची गरज आहे. ही सरकारची जबाबदारी आहे”असं ट्विट प्रियांका गांधी यांनी केलं.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि, ”’उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मंदिर परिसरात दोन साधुंच्या निर्घृण हत्या निंदनीय आणि दुखद आहेत. या प्रकारच्या हत्यांचं राजकारण होता कामा नये, यामागच्या हिंसक मनोवृत्तीच्या मूळ कारणं शोधून काढण्याची आवश्यकता आहे.” तर इकडे महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे.

राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि, ”उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निघृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच,” असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पालघरप्रमाणे यूपीतील साधूंच्या हत्येचं राजकारण करू नका! संजय राऊतांचा भाजपला टोला

मुंबई । उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश कोरोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा उपरोधिक टोला राऊत यांनी ट्विटवरून भाजपला लगावला आहे.

आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहलं आहे, ”उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निघृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच,” असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

पालघरमधील गडचिंचले या गावात चोर आल्याची अफवा उठल्याने जमावाने दोन साधू आणि आणि एका ड्रायव्हरची हत्या केली होती. या घटनेला धार्मिक रंग देत त्यावरून भाजपने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून याबाबतची माहिती घेतली होती. आता उत्तर प्रदेशातच दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने राऊत यांनी ट्विट करत भाजपला कात्रीत धरत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.

मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.

महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.

तंदुर चहा, एकदा पिऊन तर पहा..!

Tandoor Chaha तंदुर चहा
Tandoor Chaha तंदुर चहा

Hello Recipe| तंदुर चिकन ऐकलं होतं पण तंदुर चहा? हा काय बरं प्रकार आहे. हे समजुन घेण्यासाठी तुम्ही हा चहा एकदा पिऊनच पहा. तंदुर चहा बनवायला तसा फार अवघड नाही. आपण नेहमीचा चहा जसा बनवतो अगदी तसाच तंदुर चहा ही बनवायचा आहे. मात्र तंदुर चा फ्लेवर देण्यासाठी आपल्याला मातीचे कप आणि कोळसाचे तुकडे लागणार आहेत.

साहित्य –

१) कोळसाचे तुकडे

२) मातीचे कप

३)दुध

३)चहा पत्ती

४) साखर

कृती –

सर्वप्रथम पाणी, प्रमाणानुसार दुध, गरजेनुसार साखर आणि चहा पत्ती टाकून नेहमीप्रमाणे गॅसवर चहा बनवायला ठेवावा. त्यानंतर ३-४ कोळश्याचे टुकडे शेगडीवर गरम करुन घ्यावेत. नंतर गरम झालेल्या कोळसांवर मातीचे कप गरम करायला ठेवावेत. त्यानंतर पॅन किंवा भांड घ्यावून ते थोडेसे गरम करावे. गरम भाड्यात मातीचे कप ठेवून त्यात तयार झालेला चहा ओतावा. मातीच्या गरम कपातील चहा पुन्हा दुसर्या कपात ओतावा. बस्स. झाला गरमागरम तंदुरी चहा रेडी..

हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेला निधी परत द्या, भाजप आमदाराची अजब मागणी

उत्तर प्रदेश । संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनामुळे देशाला अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे. कोरोनाशी लढताना संसाधन अपुरी पडत असताना अनेकजणांनी आर्थिक मदत सरकारला देऊ केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील भाजप आमदार श्याम प्रकाश यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेला निधी परत म्हणून थेट जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे.

आमदार प्रकाश यांनी आपल्या आमदार निधीमधून २५ लाखांचा निधी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिला होता. या निधीमधून करोनाविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य साहित्य तसेच इतर मदत साहित्य घेण्यात येणार होते. मात्र, हरदोई जिल्हा प्रशासनाने करोनासंदर्भातील खरेदी करताना भ्रष्टाचार केल्याने मला माझे पैसे परत हवे आहेत असं प्रकाश यांनी जिल्हा प्रशासनाला लिहलेल्या म्हटलं आहे. हरदोईमधील मुख्य विकास अधिकाऱ्यांनी मी केलेल्या आर्थिक मदतीचा कुठे आणि कसा वापर केला जाईल यासंदर्भात कोणतीच माहिती मला दिलेली नाही असंही प्रकाश यांनी म्हटलं आहे. तसेच प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमधून हरदोई येथील कोरोनासंदर्भातील वैद्यकीय सामानाच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे प्रकाश यांनी म्हटलं आहे.

आमदार निधीमधून मिळालेल्या मदतनिधी मध्येही भ्रष्टाचार आणि कमिशन घेतले जात असल्याचे आपल्याला समजले असल्याचे प्रकाश यांनी म्हटलं आहे. “मी दिलेल्या निधीचा कसा वापर केला जाणार आहे यासंदर्भात चौकशी करण्यात आली असता मला कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळेच मी आता मुख्य विकास अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी दिलेले मदतनिधी त्याच कामासाठी वापरला जात आहे की नाही हे जाणून घेणे माझी जबाबदारी आहे. तसेच असं नसेल झालं तर हा निधी पुन्हा माझ्या खात्यावर वळता केल्यास मी त्याचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करेल,” असं प्रकाश यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने आमदारांना देण्यात येणारा विकास निधीवर एक वर्षांसाठी बंदी घातली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Breaking | निती आयोगाच्या अधिकार्‍याला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणू कहर दिवसेंदिवस वाढतच आहे.आतापर्यंत याचा संसर्ग झालेल्यांची संख्या २९ हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्ली स्टेटस पॉलिसी कमिशन (एनआयटीआययोग) च्या ऑफिस मध्येही एक प्रकरण सापडले आहे. येथे एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यानंतर दोन दिवसांसाठी ही इमारत सील केली गेली आहे. त्याचबरोबर कर्मचार्‍यांना व सहकार्‍यांना क्वारंटाइन ठेवण्यास सांगितले आहे.

एनआयटीआय आयोगाचे उपसचिव (प्रशासन) अजितकुमार यांनी सांगितले की, संचालक दर्जाचा हा अधिकारी कोरोना संक्रमित झाला आहे. पूर्णपणे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यासाठी या इमारतीस दोन दिवसांसाठी सील केले जात आहे. यासह आवश्यक त्या प्रोटोकॉलचेही पालन केले जात आहे. दोन दिवस एनआयटीआय आयोगाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्थिक बाबींमध्ये सरकारला सहाय्य्य करतील.

यापूर्वी सोमवारी कोविड -१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक कर्मचारी संक्रमित असल्याचे आढळले होते, त्यानंतर दोन सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार त्यांनाही होम क्वारंटाइन साठी पाठविण्यात आले होते. आता हा संक्रमित कर्मचारी कोणाच्या संपर्कात आला होता याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर राष्ट्रपती भवन आणि लोकसभा सचिवालयातही कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत.

 

सध्या देशात किती रुग्ण आहेत?
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण २९,४३५ वर पोचले आहे. त्यामध्ये २१६३२ सक्रिय प्रकरणे आहेत. कोरोना मुळे आतापर्यंत देशात ९३४ जणांचा बळी गेला आहे, तर एकूण ६८६८ रुग्ण बरे झाले आहेत आणि ते घरी परत आले आहेत ही दिलासा देणारी बाब आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाची १५४३ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ८५९०आहे तर दुसरीकडे, देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे १९० रुग्ण आढळून आले आणि त्याशीत येथील संक्रमणाचा आकडा हा ३१०८ वर पोहोचला आहे.

८० जिल्ह्यात नवीन प्रकरणे नाहीत
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, गेल्या ७ दिवसात ८० जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळले नाहीत. अशी ४७ जिल्हे आहेत ज्यामध्ये गेल्या १४ दिवसांत कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच; आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना विषाणुने पुणे मुंबई शहरांसोबत आता ग्रामिण भागातही चांगलेच पाय रोवले आहेत. आज कराड तालुक्यात कोरोनाचे नवीन ५ रुग्ण पोझिटिव्ह सापडले असून यामुळे सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. आज मंगळवारी सापडलेले रुग्ण आगाशिवनगर आणि वनवसमाची येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सध्या कोरोनाचे ३० कोरोना बाधित रुग्ण आहेत. सातारा जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात असल्याने सध्या कराड शहर आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यानी येथील अनेक भागांत कलम १४४ लागू केले असून संपुर्ण संचारबंदी जारी केली आहे.

दरम्यान, शनिवारी कराड तालुक्यात एकाच दिवशी १२ जणांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी आणखी २ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. आता आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे. आज फलटण येथेही एक कोरोनारुग्ण सापडला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

धक्कादायक! पालघरनंतर उत्तर प्रदेशातही दोन साधूंची हत्या, मंदिरात झोपलेल्या अवस्थेत धारदार हत्यारानं हत्या

उत्तर प्रदेश । महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधुंची जमावाकडून झालेल्या हत्येची घटना ताजी असतांना उत्तर प्रदेशातही दोन साधुंची हत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बुलंदशहराच्या अनुपशहर भागात मंदिरात झोपलेल्या अवस्थेत २ साधुंची धारदार हत्यारानं हत्या करण्यात आली. ही हत्या गावातीलच एका नशेच्या आहारी गेलेल्या मुरारी नावाच्या तरुणानं केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केलीय. साधुंच्या हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

अनुपशहरच्या पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधु जगदीश (५५ वर्ष) आणि शेर सिंह (३५ वर्ष) राहत होते. सोमवारी सकाळी काही भाविक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित झाल्यानंतर दोघं साधूंचे मृतदेह त्यांना आढळून आले. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनाठी धाडले. सोमवारी रात्री उशिरा त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. लोकांमध्ये वाढता रोष वाहून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही परिस्थितीची माहिती घेतली.

दरम्यान, १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात दोन साधुंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. अफवा पसरवणारे काही मॅसेजही यासाठी जबाबदार होते. यावेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून या प्रकरणाबाबत चर्चा करून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही केली होती. तर महाराष्ट्रातील सरकारनं या घटनेला धार्मिक रंग न देण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. मात्र, पालघरमधील घटनेवरून समाज माध्यम, राज्यापासून ते केंद्रापर्यंत विरोधक आणि माध्यमांतील चर्चेमुळं राजकारण चांगलाच तापलं होत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

थंडी वाजतेय? अंग आणि डोेके दुखतंय? हि आहेत कोरोनाची नवीन लक्षणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोना विषाणूची लक्षणे शोधण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत. कोरोना विषाणूच्या या शोकांतिकेदरम्यानच,अमेरिकेच्या सर्वोच्च वैद्यकीय निरीक्षकांनी आता या साथीच्या नवीन लक्षणांबद्दल माहिती दिली आहे. जगभरातील प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवणाऱ्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे किंवा सीडीसीने कोरोनाच्या नवीन लक्षणांविषयी माहिती दिली आहे.

सीडीसीने आपल्या वेबसाइटद्वारे जगाला कोरोनाच्या नवीन लक्षणांबद्दल माहिती दिली आहे.हे कोरोनाच्या सौम्य लक्षणांपासून गंभीर आजारापर्यंत सर्व काही दर्शवते.ही सर्व लक्षणे व्हायरसच्या संसर्गाच्या दोन ते १४ दिवसांच्या आत दिसू लागतात.सीडीसीच्या मते, नवीन लक्षणांमध्ये सर्दी, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि चव किंवा गंध कमी होणे यांचा समावेश आहे.जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही या सर्व नवीन लक्षणांना आपल्या यादीमध्ये समाविष्ट केलेले नाही.

डब्ल्यूएचओने आतापर्यंत नोंदविलेल्या कोविड -१९ च्या लक्षणांमध्ये ताप, कोरडा खोकला, थकवा, शरीरावर वेदना, पाणचट नाक, घसा खवखवणे आणि अतिसार यांचा समावेश आहे.सीडीसी आणि डब्ल्यूएचओ या दोन्ही वेबसाइटवर आधीच नमूद केलेल्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, श्वास लागणे यांचा समावेश आहे.

डब्ल्यूएचओ म्हणतो की काही लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे परंतु त्यांच्यात अगदी सौम्य लक्षणे दिसत आहेत.डब्ल्यूएचओ म्हणतो, बहुतेक लोक (अंदाजे ८० टक्के) रूग्णालयात उपचार न घेता या आजारापासून बरे होतात. कोविड -१९ने संक्रमितांपैकी दर पाच पैकी १ गंभीर आजारी पडतो आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदय आणि फुफ्फुसांच्या समस्या, मधुमेह किंवा कर्करोगाने ग्रस्त अशा लोकांमध्ये या विषाणूचा धोकादायक परिणाम दिसून येतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ‘त्या’ गाठोड्यात नक्की लपलंय तरी काय? सरकार कंजूषपणा तर करत नाहीये ना?

Nirmala Sitaraman

लढा कोरोनाशी । सी.पी. चंद्रशेखर

कोरोना विषाणूच्या साथीचे गरीब जनतेवर होणारे दुष्परिणाम थोपवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २६ मार्च रोजी, (म्हणजे बरंच उशीरा) जाहीर केलेल्या (प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना नामक) मदतीच्या गाठोड्याचे काही विरोधी पक्ष नेत्यांनी “चांगलं पहिलं पाऊल” म्हणून स्वागत करून सरकारसोबत एकता दर्शविली आहे. पण या गाठोड्यात लपलंय तरी काय, हे जरा नीट निरखून पाहिलं तर पहिलं पाऊल म्हणून देखील ते अपुरंच नाही तर केविलवाणं आहे.

या गाठोड्याचे ढोबळ मानाने पाच भाग आहेत.
पहिला – ज्यांना बाजारात जाणंच शक्य नाही, किंवा पैसे नाहीत, अशा लोकांना जीवनावश्यक अन्न पोहोचवणे.
दुसरा – गरीब जनतेच्या काही निवडक लोकांना पटकन रोख मदत देणं.
तिसरा – छोटा धंदा किंवा स्वयं-रोजगार करणाऱ्यांना काम करण्याची सोय करणं, किंवा कर्ज पुरवणं, जेणेकरून पुढील काळात पुन्हा व्यवसाय चालू करता येईल.
चौथा – राज्य सरकारांना आर्थिक मदत करणं – कारण राज्य सरकारची यंत्रणाच मोक्याच्या ठिकाणी विषाणू पसरण्यापासून थांबवायला काम करत आहे. आणि
पाचवा – जे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी जीव धोक्यात टाकून खिंड लढवत आहेत, त्यांना आधार देणं.

पहिल्या भागांतर्गत, केंद्र सरकारने जाहीर केलंय की राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जवळपास ८० कोटी लाभार्थींना, पुढील तीन महिने, दरमहा, दरडोई ५ किलो तांदूळ/गहू, आणि प्रत्येक कुटुंबाला एक किलो डाळ देणार. रेशन व्यवस्थेतून पैसे देऊन मिळणाऱ्या धान्यापेक्षा हे भिन्न. त्याशिवाय उज्वला योजनेत येणाऱ्यांना दरमहा एक गॅस-टाकी मोफत.

दुसऱ्या भागात, गरीब ज्येष्ठ नागरिक, निराधार, विधवा, अपंग यांना १००० रुपये दिले जाणार, त्याशिवाय महिलांच्या जन-धन खात्यात ५०० रु ते २०० रु भरले जाणार. तसेच ८.७ कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत तीन हप्त्यांत देऊ केलेल्या निधीचा पहिला हप्ता २००० रु. हा १ एप्रिलपर्यंत दिला जाणार. एंप्लॉईज प्रोविडंट फंड (इपीएफ) योजनेत येणाऱ्या संघटित क्षेत्रातील कामगारांना तीन महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम, किंवा फंडात दिलेल्या वाट्याचे ७५ टक्के (यातील किमान) एडव्हांस घेता येईल. त्याशिवाय, तीन महिन्यांसाठी, १०० पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या कंपन्यांच्या कामगार आणि मालक, दोघांच्या वतीने इपीएफचा हप्ता सरकार भरणार. मनरेगा योजने अंतर्गत दररोजचं वेतन २० रु. वाढवून १८२ रु वरून २०२ रु करण्याची घोषणा केली आहे.

तिसरा भाग- बचतगटांना / स्वयंरोजगार गटांना (काहीही गहाण न ठेवता) मिळणा-या कर्जाची रक्कम १० लाख रु. वरून २० लाख रु. असेल असं जाहीर केलं आहे
चौथ्या भागातील घोषणा – राज्य सरकारांना बांधकाम मजूर कल्याण निधी (रु. ३१,००० कोटी) मधून सर्वात निराधार बांधकाम मजूरांना मदत करण्यासाठी वापरता येतील आणि ज्या जिल्ह्यांत खाणी आहेत तिथे जिल्हास्तरीय खनिज निधीतून आरोग्य सुविधांसाठी खर्च करता येईल.
पाचवा, सर्व वैद्यकीय कर्मचारी यांच्या मेहनतीची व त्यांनी उचललेल्या जोखीमेची कदर करून प्रत्येकाला ५० लाख रु. जीवन बीमा देण्यात येत आहे. परंतु, चार गोष्टींमुळे या पॅकेजचा प्रभाव कमी ठरू शकतो. पहिलं म्हणजे हे गाठोडं सध्याच्या परिस्थितीमध्ये जितकी गरज आहे त्यापेक्षा कमी मदत पुरवतं, आणि जितकं देणं शक्य आहे त्यापेक्षाही कमी देतं. दुसरं म्हणजे घोषणा केलेल्या अनेक योजना संचारबंदीमुळे अंमलातच आणल्या जाऊ शकत नाही, त्यामुळे सर्वात जास्त गरज असतानाच त्या योजनांचा लोकांना फायदा मिळणार नाही.

तिसरं म्हणजे घोषणा केलेले अनेक घटक हे नवीन योजना नाहीत, तर वेगळ्या नावाखाली आधीपासून अस्तित्वात असलेल्या यजनांनाच आहेत. आणि शेवटी, संकटाला प्रत्यक्ष तोंड देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सरकार विषाणूपासून संरक्षण कसं देणार याबद्दल काहीच घोषणा नाही. संचारबंदीमुळे विषाणूच्या प्रसाराची गती फक्त कमी झाली आहे, अजूनही प्रादुर्भावाचा स्फोट होणं शक्य आहे. तर संचारबंदीमुळे मिळालेल्या वेळेचं सोनं करून, देशभरात कोरोना तपासणी, निदान व उपचाराच्या सोयी-सुविधा झपाट्याने वाढवण्याची गरज आहे – परंतु अशा कोणत्याही नियोजनाची घोषणा नाही. यामुळे आरोग्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि मानवी जीवनावर आलेल्या या अभूतपूर्व संकटाला सरकारने अर्धवट व तोकडे उत्तर दिले आहे. संचारबंदी लागू केली की मग ठिगळं लावल्यासारखी थोडीफार कारवाई केली की या संकटाचा सामना करता येईल अशी सरकारची समजूत आहे असं वाटतं.

या महामारीमुळे तयार होणारं आर्थिक संकट हे तीव्र आहे, कारण बाजारातील मागणी आणि पुरवठा, दोघांवर दुष्परिणाम होणार आहेत. जनता घरात बंद, आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प आहेत आणि असंघटित व रोजंदारीच्याच नाही तर काही संघटित क्षेत्रातील कामगारांची, शेतकऱ्यांची व छोट्या व मध्यम व्यवसायीकांची कमाई बंद आहे. स्थलांतरीत कामगार व हातावर पोट असणाऱ्या करोडो लोकांची कमाई बंद झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूही विकत घेता येत नाहीत. अनेक लोक असे आहेत ज्यांची इतकी वाईट अवस्था नसली, तरी साठवलेल्या पैशावर घर चालवत असल्यामुळे त्यांनाही काटकसर करायला लागत आहे.

अर्थव्यवस्थेला अचानक ब्रेक लावल्यामुळे अनेक वस्तूंचं उत्पादन बंद झालंय आणि साठे संपत आहेत. इतर काही वस्तूंची साठेबाजी चालू असल्यामुळे गरजूनां मिळत नाहीत. तर काही वस्तू साठा आणि पुरवठा दोन्ही असूनही वाहतूक नसल्यामुळे मिळत नाहीत. त्यामुळे मागणी तर कमी झालीच आहे. पण ज्यांच्याकडे बाजारातून विकत घेण्याची ऐपत आहे, अशांनाही पुरवठा नसल्यामुळे अनेक गोष्टींचा तुटवडा सहन करावा लागणार.

अशा विचित्र संकटाला, ज्याची तीव्रता अजून पूर्णपणे मोजली गेली नाही, त्याला तोंड देण्यासाठी सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणि सुविधांची तरतूद करायला हवी होती. सामान्य परिस्थितीमध्ये सरकारचं काहीही धोरण असो, त्याचा विचार न करता तरतूद व्हायला हवी होती. सरकार हात राखून तरतूद का करत आहे, हे सांगत नाहीये. सार्वजनिक शिधावाटप (रेशन) व्यवस्थेमार्फत जवळपास ८० कोटी लोकांना मिळणाऱ्या गहू-तांदुळाचं प्रमाण दरमहा ५ किलो वरून १० किलो वर नेलं आहे आणि जवळपास १६ कोटी कुटुंबांना दरमाहा एक किलो डाळी दिल्या जाणार आहेत. हा घोषित योजनेचा एक महत्वाचा घटक आहे. पण हे वाटप फक्त ठराविक शिधापत्र धारकांना होणार आहे. स्थलांतरित कामगार यातून कार्ड नसल्यामुळे तर आधीच वगळले गेले आहेत. असे कित्येक लोक आहेत ज्यांचं सामान्य परिस्थितीतलं उत्पन्न हे कार्ड मिळण्याइतपत कमी नाही. पण सध्याच्या परिस्थितीत कमाई बंद होऊन त्यांची दैना झाली आहे. ज्यांना मदतीची गरज आहे पण ठराविक कार्डाची (जसं की पिवळं रेशन कार्ड) अट घातल्यामुळे ते रेशन वाटपातून वगळले जाणार. अशा लोकांना सामील करण्यासाठी, सार्वत्रिक शिधावाटपाची सोय व्हायला हवी होती.

सरकार प्रत्येक लाभार्थींना मोफत १० किलो धान्य का देऊ शकत नाही? याचं काही कारण नाही. तीन महिने मोफत १० किलो धान्य पुरवठा करण्यासाठी २.५ कोटी टन साठ्याची गरज आहे. सध्या सरकारकडे याच्यापेक्षा मोठा साठा आहे. त्यातला काही किडका असला तरी यंदा रबीचं पीक चांगलं आलं आहे आणि त्यामुळे सरकारने मोठ्या प्रमाणात गहू खरेदी करण्याची अपेक्षा केली जात आहे. याचा अर्थ, भारतीय अन्न महामंडळाकडे (Food Corporation of India) १ एप्रिल रोजी गहू-तांदूळांचा १.६ कोटी टन अतिरिक्त साठा शिधावाटपाकरता तयार अवस्थेत असू शकतो आणि त्याशिवाय ५० लाख टन दूरगामी साठा – म्हणजे एकूण २.१ कोटी‌ टन. या महिन्यात सरकारच्या साठ्यामध्ये ५ कोटी, ८५ लाख टन धान्य आहे. याचा अर्थ, तीन महिने मोफत पुरवठा करून उरेल इतकं धान्य आहे.

इतकी साधनं असताना सामान्य व्यक्ती आणि कुटुंबांना चांगल्या प्रमाणात मोफत धान्य देणंही शक्य आहे. याशिवाय, अधिक पुढाकार घेऊन निराधारांसाठी, बेघरांसाठी, आणि स्थलांतरित मजूरांसाठी तयार जेवणाची व्यवस्था करता येईल. पण ही संधी सरकारने जणू सोडून दिली आहे. उपासमारीच्या भीतीने स्थलांतरित मजूर पायी गावी परतणाऱ्या, बस स्थानकांवर वाहतुकीच्या आशेत गर्दी करणाऱ्या कष्टकऱ्यांची दृश्ये आपल्याला प्रसारमाध्यमांतून दिसतच आहेत. या अपयशाचं सरकारच्या दृष्टीने सर्वात सोयीस्कर स्पष्टीकरण म्हणजे हेच की इतक्या मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी व वाटपासाठीचा खर्च सध्या सरकारला परवडणार नाही. कारण त्यामुळे देशाचा वित्तीय तुटवडा (fiscal deficit) वाढेल. पण हे कारण देणं सध्याच्या अभूतपूर्व संकटात मुळीच योग्य नाही.

गाठोड्यातील इतर तरतूदी या शिधावाटपात केलेल्या कंजुषीपेक्षाही जास्त लाजिरवाण्या आहेत. आपात्कालीन परिस्थितीमध्ये, लोकांची उपजिविका थांबली असताना, त्यांना किमान स्वतःची काळजी घेण्याइतपत पैसे थेट पुरवणे हा सरळ उपाय आहे. दिल्लीसारख्या शहरामध्ये अकुशल कामगारांचं सरकारमान्य किमान वेतन जवळपास रु. १५००० आहे. अशा वेळेस कामगारांना किमान याच्या अर्धी रक्कम मिळायला हवी. वास्तविक यापेक्षा थोडी जास्तच, कारण सामानांच्या कमतरतेमुळे किमती वाढत आहेत. अस्थाई कमाई असणाऱ्या लोकांसाठी सरकारच्या जितक्या योजना आहेत, त्यात नोंद असलेल्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीस दरमहा रु. ७५०० ही एक योग्य मागणी आहे. परंतु प्रत्यक्ष मिळालं काय तर गरीबांना एकदा, एकरकमी रु १००० आणि जन-धन खातं असलेल्या महिलांना रु ५००. याला दिखावेगिरीपेक्षा अधिक काय म्हणावं? बचत गटांना वाढीव कर्ज – हे तर आकाशातले मनोरे आहेत. जीवनावश्यक सेवा सोडून सर्व औद्योगिक कारभार बंद असताना, आणि संचारबंदी संपल्यावरही मंदी चालू राहण्याची अपेक्षा असताना, गरीब महिलांचे बचत गट व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणार, ही अपेक्षा फोल आहे.

कोरोना साथीला आटोक्यात आणण्याची आणि त्याचे वैद्यकीय व आर्थिक परिणाम थोपवण्याची मुख्य जबाबदारी राज्य सरकारांवर आली आहे. देशभरातील राज्य सरकारांना तपासणी, उपचार आणि विलगीकरणाच्या योजना अंमलात आणण्यासाठी वाढीव निधीची अत्यंत गरज आहे. कर्ज काढून, वित्तिय तुटवडा नियंत्रण नियमांनी (FRBM Norms) घातलेली बंधनं तोडून खर्च करण्याची गरज आहे. या बंधनांना काढण्याची आणि वाढीव निधी पुरवण्याची मागणी ते केंद्र सरकारकडून करत आहेत. श्रीमती अर्थमंत्री महोदयांनी मोठ्या मनानी राज्य सरकारांना बांधकाम मजूर कल्याण निधी आणि जिल्हास्तरीय खनिज निधीतून पैसे घेण्याची परवानगी दिली आहे. पण हे निधी तर पहिल्यापासूनच राज्य सरकारांसाठी आहेत आणि किमान बांधकाम मजूर निधीतून खर्च करण्यासाठी राज्यांना केंद्राच्या परवानगीची बहुतेक गरज नाही. अशा प्रकारे राज्य सरकारांच्या गरजा पुरवण्यापासून केंद्र सरकार पाय काढून घेत आहे. संकटावर मात करण्याऐवजी खर्च कसा कमीत कमी करावा हाच हेतू दिसतो.

केरळ राज्यात देशाची ३ % लोकसंख्या आहे आणि कोरोनाचा प्रसार (सुरुवातीला) सर्वात जास्त प्रमाण असलेल्या राज्यांपैकी केरळ आहे. पण केरळने या संकटाविरुद्ध अतापर्यंत सर्व आघाड्यांवर चांगली कामगिरी बजावली आहे आणि यापुढे संकटाला तोंड देण्यासाठी जी योजना बनवली आहे तिला रु २०,००० कोटीची गरज आहे. ही रक्कम केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशभरासाठी घोषित केलेल्या रु १.७ लाख कोटीच्या तब्बल १२ % आहे. केरळ सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या संकटाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची तफावत यात दिसत आहे. याचा अर्थ केंद्र सरकारची केरळला कमीच मदत होणार आहे. केरळपेक्षा गरीब आणि कमी पुढाकार घेतलेल्या राज्यांना तर त्यापेक्षा कमी मदत मिळणार.

देशभरात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित पोशाख आणि यंत्रांच्या कमतरतेशी झुंज देत आहेत, त्यांचं काम जास्त कठीण झालंय, विषाणूची लागण होण्याची हानी वाढली आहे. अशा वेळेला सरकारच्या पॅकेजने त्यांच्या सुरक्षेची, आरोग्याची आणि उपचार-व्यवस्थेची गरज भागवायला हवी होती. त्याऐवजी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केवळ (लागण झाल्यावर) असलेला विमा दिला गेला आहे.

कोरोना विषाणूमुळे आलेलं संकट हे महाभीषण आहे, कारण भारताची आरोग्य व्यवस्था केविलवाण्या अवस्थेत आहे आणि लोकसंख्येचा खूप मोठा गट अत्यंत गरीब व असुरक्षित आहे. पण इतकंच कारण नाही. विषाणू संकटामुळे बाजारात एका बाजूला मागणी घसरली आहे तर दुसऱ्या बाजूला अावश्यक उत्पादनाला व पुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी केंद्र सरकारने एक बहु-आयामी योजना बनवायला हवी, जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन अबाधित ठेवण्यासाठी संसाधनांचं योग्य वाटप असलं पाहिजे, वाहतूक आणि शिधावाटपाची हमी देणारी योजना पाहिजे, या सर्वाचं व्यवस्थापन युद्धपातळीवर झालं पाहिजे आणि राज्य आणि केंद्राचं, व राज्या-राज्यांत ताळमेळ करण्यासाठी संपर्क योजना असावी. राज्य सरकारं काम करायला तयार आहेत; कारण आग त्यांच्या दाराशी आहे. परंतु शोकांतिका ही आहे, की केंद्र सरकारला संचारबंदी पलिकडे काही करण्यात रस दिसत नाही आणि तयारीही दिसत नाही.

मूळ लेख – http://janataweekly.org/a-niggardly-response-to-an-extraordinary-crisis/
(सी.पी. चंद्रशेखर हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्र आणि योजना विभागात प्राध्यापक आहेत.
भाषांतर – निश्चय, इंजिनिअर आणि
लोकायत संघटनेचे कार्यकर्ते आहेत.)
त्यांचा संपर्क क्रमांक – 8806966933