वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या कराची शहराजवळ प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. PK८३०३ हे पाकिस्तानी विमान लाहोरहुन कराचीला निघाले होते. दुपारी १ वाजता हे विमान लाहोरहून निघाले होते. मात्र कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याआधीच हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विमान कोसळले असता धुराचे लोट सर्वदूर पसरल्याचे दिसून आले.
कराची विमानतळापासून जवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात मॉडेल कॉलनी येथे हे विमान कोसळले आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून काही प्रमाणात भौतिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या विमानात एकूण ९९ लोक होते यामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद होते. नेमकी जीवितहानी किती झाली आहे हे अद्याप समजले नाही. आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले आहे. परिसरातील गाड्या जळाल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. पाःकिस्तानातील सैन्याचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. घटनास्थळी अर्बन सर्च अँड रेस्क्यू टीमही पाठविण्यात आली आहे.
Karachi: A Pakistan International Airlines (PIA) flight carrying close to 100 people from Lahore to Karachi crashes near a residential colony near Karachi airport pic.twitter.com/elZsBdrYle
— ANI (@ANI) May 22, 2020
दरम्यान पाकिस्तानातील कराची हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे तसेच जिना आतंरराष्ट्रीय विमानतळ हे नेहमी गजबलेले असते. कोरोनाच्या संक्रमणामुळे पाकिस्तानात संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी उठवल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. एअरक्राफ्ट क्रश रेकॉर्ड या संस्थेच्या माहितीनुसार आतापर्यंत पाकिस्तान मध्ये ८० विमान दुर्घटना झाल्या आहेत. २८ जुलै २०१० आणि २० एप्रिल २०१२ च्या अपघातानंतरचा हा मोठा अपघात असल्याची माहिती या संस्थेने दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.