कोरोना भारतातील कोट्यवधी लोकं झटक्यात संपवू शकतो..!! हे टाळायचं असेल तर..??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक, वॉशिंग्टनचे संचालक आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक रामानंद लक्ष्मीनारायण यांची करण थापर यांनी WIRE या चॅनेलवर घेतलेली ही मुलाखत. याचं शब्दांकन केलंय जयश्री देसाई यांनी.

कोरोना व्हायरसची परिस्थिती सध्या भारतात किती धोकादायक आहे, सरकार कशापद्धतीने याला सामोरे जात आहे याबरोबरच सामान्य नागरिकांनी स्वतःला वाचविण्यासाठी काय करायला हवं यासंदर्भात ही विस्तृत मुलाखत आहे. 

परिस्थिती – भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जाहीर केलेल्या आकडयानुसार १३० केसेस या ऍक्टिव्ह कोरोनाग्रस्त सापडल्या आहेत. ज्यामध्ये  १४ बरे झालेले रुग्ण आणि ३ मृत रुग्णांना पकडले गेले नाही. बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की भारताच्या लोकसंख्येच्या मानाने हा आकडा खूप कमी आहे. एक एक्स्पर्ट म्हणून तुम्ही या आकड्यावर विश्वास ठेवता? असा प्रश्न रामानंद यांना विचारला असता त्यांनी सरकारचे संकेतस्थळ तुम्हाला खात्री झालेल्या रुग्णांची संख्या देते. आणि या व्याख्येनुसार पाहायला गेल्यास हा आकडा अगदी योग्य आहे. मात्र अशा अनेक केसेस असू शकतात ज्यांची टेस्ट न झाल्यामुळे त्या माहित नसतील. साथीच्या रोगांचा कोणताही एक्स्पर्ट तुम्हाला हे नक्कीच सांगू शकेल. बऱ्याच देशांमध्ये रुग्णांचे आकडे अजूनही वाढत आहेत. यु.केचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्यांनी हे मान्य केले आहे, कदाचित त्यांच्याकडे १०,००० च्या आसपास रुग्ण असण्याची शक्यता आहे पण फक्त १००० च्या आसपास चाचण्या झाल्या असल्याने रुग्णांची संख्या अद्याप सांगता येत नाही. याचे मुख्य कारण अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या चाचण्या आहेत असं रामानंद लक्ष्मीनारायण म्हणाले. 

काय चुकतंय – संपूर्ण जगभर आज हीच परिस्थिती आहे. यु. एस, यु.के आणि भारतातील परिस्थिती सारखीच आहे. पण तुलनेने भारताने अद्यापही पुरेश्या चाचण्या केल्या नाहीत. जर आपण यु. केचे उदाहरण भारताला लागू केले तर त्यांच्यापेक्षा १२ पट जास्त लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात त्यांच्या सरासरीनुसार १५०० रुग्ण असण्याची सुरक्षित समज असेल. कारण यु.केच्या ६० दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात जर १०,००० रुग्ण असतील तर आपण त्यांच्यापेक्षा २० पट जास्त लोकसंख्या असलेले राष्ट्र आहोत. आपण हे समजून चालणे खूप उत्तम आहे की, कदाचित आपल्याकडे जास्त संक्रमित रुग्ण संख्या असू शकेल पण त्यांची चाचणी झाली नसेल. आपल्याकडे कदाचित १० ते १५ हजार केसेस असू शकतील ज्या आपल्याला माहित नाहीत. भारताचा आकार बघता १० हजार केसेस शोधणं हे इतकं सोपं नाही. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारत सरकार नक्कीच चांगली पावले उचलत आहे. सर्व राष्ट्रांमधील भारत हे पहिले राष्ट्र असेल ज्याने आपल्या सीमा बंद केल्या. देशाबाहेर असणाऱ्या भारतीयाना लवकरात लवकर परत बोलावण्यासाठी संपर्क चालू केले. केवळ पुरेशा प्रमाणात चाचण्या सोडता इतर बरेच उपाय अमलात आणले जात आहेत.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा – https://science.thewire.in/health/interview-india-could-be-next-coronavirus-hotspot-worst-case-up-to-60-could-be-infected/

सत्य स्वीकारताना अडचण? तपासण्या कमी प्रमाणात का? – सध्या भारतात केवळ इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च लॅबमध्ये तपासण्या केल्या जात आहेत. म्हणजे कालपर्यंत तरी केल्या जात होत्या. भारतात मोठ्या प्रमाणात खाजगी दवाखाने आहेत, ज्यांच्या क्षमतेचा  सरकारला अद्याप उपयोग करून घेता आला नाही. ICMR च्या म्हणण्यानुसार १७ मार्चला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत त्यांनी ११,५०० रुग्णांना तपासले आहे. ते जवळपास १००० लोकांना एका आठवड्यात तपासत आहेत. ही  संख्या १३० करोड लोकसंख्येसाठी पुरेशी आहे असं ते म्हणत असतील तर ही थोडी अपुरी माहिती आहे. ११,५०० हे आजच्या तारखेपर्यंत तपासले गेलेले  संशयित आहेत. दररोज १२०० ते १६०० लोकांच्या चाचण्या होत आहेत. आठवड्याला १००० ही संख्या त्या लोकांची आहे ज्यांच्यामध्ये ही लक्षणे दिसत नाहीत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या दोन शक्यता आहेत. तुम्ही  कोरोना विषाणूचे संक्रमण असणाऱ्या देशात प्रवास केला असेल किंवा तुमचा कोरोना विषाणूचे संक्रमण झालेल्या व्यक्तीशी संपर्क आला असेल तर तुम्हालाही या विषाणूची बाधा होऊ शकते. पण या दोन्ही शक्यतांमध्ये तुम्ही बसत नसाल आणि तुम्हाला कोरोना विषाणूच्या संक्रमणाची लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही तपासणी केली पाहिजे.

तपासणी गरजेचीच – तुलनेने पाहता थायलंड दहा लाख लोकांच्या मागे १४० लोकांच्या चाचण्या करते आहे. अगदी व्हिएतनाम सारखा देश ४० लोकांची चाचणी करतो आहे. भारत मात्र त्यांच्या चतुर्थांश प्रमाणात तपासणी करतो आहे. जी थायलंडच्या तुलनेत खूप कमी आहे. मग फ्रांस, इटली, दक्षिण कोरिया यांच्या तुलनेत आपण खूपच कमी  आहोत. जिथे दर दहा लाख लोकांच्या मागे १००० लोकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. 

भारत अपवाद नाही – डॉ जनरल टेड रॉस जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक दूरदर्शनवर सर्व राष्ट्रांना उद्देशून म्हणाले, प्रत्येक संशयिताची तपासणी करा. मात्र  ICMR चे प्रमुख डॉ भार्गव यांनी त्यांना उत्तर देत,  हे विधान भारतासाठी लागू होत नसून युरोपसाठी लागू होत असल्याचे सांगितलं. हे विधान भारतासाठी अयोग्य असल्याचं ते म्हणतायत, पण असं शक्य नाही. आपण जर योग्य प्रमाणात तपासणी केली नाही तर आपण सांगूच शकणार नाही की  कुणाला वाचविले पाहिजे, कुणाला वेगळे ठेवले पाहिजे. केवळ सार्वजनिक दुराव्यावर आणि वैयक्तिक अंतरावर अवलंबून राहिलो तर या साथीच्या रोगासाठी हे योग्य ठरणार नाही. सोशल डिस्टंसिन्ग ही काही लोकांसाठी चैन आहे. ज्या लोकांना सकाळी उठून बसने कामाला जावे लागत असेल, दिवसभर काम करावे लागते आणि कुटुंबासाठी रात्री घरी अन्न न्यावे लागते अशा लोकांसाठी  सोशल डिस्टंसिन्ग हा उपाय नाही. काही अल्प लोकांना सोडले तर इतर लोकसंख्येला ते शक्य नाही. डॉ भार्गव आणि इतर सगळे माझे सहकारी आहेत आणि मी त्यांच्या हेतूबद्दल काहीच शंका घेत नाही. पण जागतिक पातळीवर विचार केला असता यु.एससारख्या देशाकडे सुद्धा पुरेशी तपासणी किट्स नाहीत. कुणालाच हे एवढे मोठे संकट अपेक्षित नव्हते. मी याला आत्मसंतुष्टपणा म्हणणार नाही, पण मी या विधानाशी मात्र मी सहमत नाही. 

रुग्ण शोधण्यातील गफलत – त्यांचे वैज्ञानिक मत आहे की, त्यांना हा विषाणू संपर्कजन्य असल्याचा काही पुरावा सापडला नाही. त्यांचे वैज्ञानिक मत हे ११,५०० तपासण्यांपुरते मर्यादित आहे, किंवा यु.के सारखा देश त्यांच्याकडे जास्त केसेस असल्याचे मान्य करत असताना प्रमाणात १२ पट मोठा भारत देश हे टाळतो आहे असे नाही. समजा मी जर केवळ पांढरा शर्ट घातलेल्या लोकांना कोरोना आहे समजून तपासणी केली तर मला नक्की संक्रमित लोक शोधता येणार नाहीत. किंवा पांढरा शर्ट घातलेल्या सगळ्यांनाच तो असेल किंवा तुम्ही पांढरा शर्ट घातला तर तुम्हाला हा विषाणू आहे असं म्हणता येत नाही.

सरकार गंभीर झालंय – हे खूप मनोरंजक आहे की, त्यांच्याकडे कोणता पुरावाच नाही की हा संपर्कजन्य आजार आहे की नाही. त्यांनी त्यात काही संशोधनच केले नाही. आणि जर तुम्ही काही संशोधन केलं नाही तर तुम्हाला काही सापडेलच कसं ? केवळ डॉ. भार्गव नाही तर संपूर्ण यंत्रणेतील लोक आत्मसंतुष्ट आहेत का? किंवा खोटी आश्वासने देत आहेत का? असे विचारले असता लक्ष्मीनारायण म्हणाले, “असे अजिबात नाही, ते खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. यांच्याबद्दल रोज बोललं जातं. त्यांना पूर्णतः माहित आहे की ते कशाला सामोरे जात आहेत. त्यांना माहित आहे की आपण एका गंभीर परिस्थितीशी लढतो आहोत. पण त्यांना लोकांना घाबरवायचे नसेल हाही एक मुद्दा आहे. संपूर्ण देश बंद करण्यात आला आहे. शाळा दुकाने, सार्वजनिक कार्यक्रम सगळे थांबविण्यात आले आहेत. जर एवढे सगळे होत असेल तर केवळ १२० केसेससाठी नक्कीच हे केलं जात नाही असं मला वाटतं. या विषाणूची गंभीरता लक्षात आल्यामुळेच ही पाऊले उचलण्यात आली आहेत.
हे आत्मसंतुष्ट असणे नाही तर सावधगिरी आहे. तुलनेने भारतापेक्षा लहान असणाऱ्या बहरीन देशामध्ये ६,००० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. जी दर दहा लाखांसाठी १०० इतकी आहे. साऊथ कोरियासारख्या देशात २ लाख ५० हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. पण भारतात केवळ ११,५०० ही फार मोठी तफावत आहे. याचीच चिंता वाटते. कारण आपण हा विषाणू पसरवत आहोत. जर लोकांनी तपासणी केली नाही आणि संक्रमित व्यक्तीना समजलेच नाही की त्यांना या विषाणूची बाधा झाली आहे तर ते नकळत हा विषाणू सर्वत्र पसरवतील. अजूनही असे लोक तो पसरवतच आहेत. या अशा वातावरणात सार्वजनिक संवाद एक समस्या बनली आहे. काही ठिकाणी योग्य संवाद होतो तर काही ठिकाणी नाही.”

दुसऱ्यांच्या चुकांतून काय शिकणार? – खूप जणांकडून चुका झाल्या आहेत. युकेसारख्या देशाने चुका केल्या आहेत. सर्वच राष्ट्रे या विषाणूच्या संदर्भात नवनवीन गोष्टी शिकत आहेत. आपण सगळेच शिकत आहोत. जर तुम्ही नागरिकांना योग्य माहिती दिली नाही. योग्य संख्या सांगितली नाही तर तुम्ही सोशल डिस्टंसिन्ग सारख्या गोष्टींसाठी प्रतिसादाची अपेक्षाच त्यांच्याकडून करू शकत नाही. एका पातळीवर लोक विचारायला सुरुवात करतात की हे सगळं का केलं जात आहे? सरकार आव्हानाखाली काम करते आहे. कुणीच या समस्येसाठी तयार नव्हते. कदाचित त्यांच्याकडे तपासणी किट नाहीत, सरकारकडून सार्वजनिक संवादाच्या धोरणांवर काम केले जात आहे. म्हणूनच यु.के आणि युएसचा मुद्दा मांडावा लागला. कारण ही एक जागतिक समस्या आहे. साऊथ कोरिया ज्यांनी असामान्य पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात या समस्येला लवकर तोंड दिले, हा अपवाद वगळता इतर देशांनी कमी प्रमाणात लक्ष दिलं आहे. आपल्याकडे एवढी यंत्रणा नाही की आपण चीन सारखी सगळी शहरे बंद करू. 

लोक घाबरु नयेत म्हणून खोटा दिलासा – प्रा. गंगा केतकर आणि निवेदिता गुप्ता (ICMR ) यांना ते का तपासण्या करत नाहीत असं विचारलं असता, त्यांनी त्यांना चुकीच्या तपासण्या करायच्या नाहीत असं सांगितलं. ज्यामुळे एक खोटा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, जर जास्त पॉझिटीव्ह तपासण्या केल्या तर भारतामध्ये तेवढे आयसोलेशन बेड नाहीत. यावर लक्ष्मीनारायण म्हणाले, “एक वैज्ञानिक म्हणून मी या मुद्दयाशी असहमत आहे. असं कधी होतं की तपासण्या केल्या आहेत, त्या पॉसिटीव्ह आहेत सांगूनही लोक वेगळे राहत नाहीत? आपण त्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे. अशावेळी सार्वजनिक संवाद असायला पाहिजे. परिस्थीचीची गंभीरता माहित असेल तर लोक विरोधात जात नाहीत. 

भारतातील तपासणी – भारत सध्या जी तपासणी करते आहे त्याला रियल टाईम PCR  म्हटलं जातं. तुमच्याकडे थोड्याफार प्रमाणात विषाणूचा RNA असेल तर ही तपासणी केली जाते. येणा-जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नाही कारण ही एक विशिष्ट तपासणी आहे. मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसत नसतील तर ही  तपासणी करता येत नाही. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती, जिला श्वास घ्यायला त्रास होतो, ताप, खोकला आहे अशा सगळ्यांनी तपासणी केली पाहिजे. याचा अर्थ असाही आहे की ही लक्षणे नसणाऱ्या लोकांच्या तपासण्या करण्याची गरज नाही. जरी ते विषाणू संक्रमित देशातून आले असले तरी त्यांना तपासणी करण्याची गरज नाही. मात्र एक छोटी चाचणी करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये त्यांचा ताप तपासणे, त्यांना इतर लक्षणांबद्दल विचारणे यांचा समावेश होतो. भारत चाचण्या खूप करत आहे पण तपासणी नाही. 

भारतातील लोक आणि तपासणी – दुसऱ्या प्रकारात असे लोक आहेत जे दुसऱ्या देशातून आले नाहीत आणि विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातही नाहीत. पण त्यांना जर लक्षणे दिसत असतील तर तपासण्या केल्या पाहिजेत. आपल्या सर्वांना  माहित असले पाहिजे की कोरोनाशिवाय असे आणखी संक्रमणाचे प्रकार आहेत ज्यांची बाधा झालेली असू शकते. त्यासाठी आपल्याला माहित असले पाहिजे की खोकला, ताप हे कोरोनामुळे आहे की दुसऱ्या कोणत्या आजारामुळे. प्रत्येक जण ज्याला खोकला, ताप आणि सर्दी तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तपासणी केलीच पाहिजे.

आपल्याला जर ही तपासणी एखाद्या छोट्या किंवा मोठ्या शहरात करायची म्हटलं तर दिवसात १०,००० तपासण्या होऊ शकतात. आणि हे भारताच्या क्षमतेत आहे. भारत हे करू शकतो. ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा व्यक्तींसाठी  तपासणीचा विभाग करण्यात आला आहे. हा विभाग RTPCR  तपासणीमध्ये येत नाही. पण या विभागासाठी आम्ही लवकरच एक तपासणी करणार आहोत जिला सिरॉलॉजिकल तपासणी म्हणतात. ज्या लोकांमध्ये थोड्या प्रमाणात संक्रमण आहे आणि ते त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार करत आहेत अशा लोकांवर तपासण्या केल्या तर आपल्याला कळेल कोण संक्रमित आहे आणि कोण नाही.

दोन कारणे आहेत ज्यामुळे या तपासण्या केल्या पाहिजेत. एक तर ज्याला विषाणू संक्रमण झाले आहे. त्याच्यापासून दूर राहता येईल आणि दुसरे संपूर्ण समाजात किती केसेस आहेत हे तपासण्यासाठी. लक्षणे असणाऱ्या लोकांची तपासणी आपण पहिल्या कारणासाठी करीत आहोत आणि नसणाऱ्या लोकांची दुसऱ्या कारणासाठी. ICMR च्या झालेल्या पत्रकार परिषदेत  १२१ सरकारी निदान केंद्रे उभी राहतील आणि ५१ खाजगी प्रयोगशाळा पुरविल्या जातील असे सांगितले आहे. जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा मोठ्या प्रमाणात खाजगी प्रयोगशाळेच्या ठिकाणी तपासण्या होतात आणि सरकार हे करू शकतं. मला सरकारच्या हेतूबद्दल अजिबात शंका नाही, पण आता जास्त तपासण्या करण्याची वेळ अली आहे. आपण संपर्कजन्य  रोगाच्या टप्प्यावर २-३ आठवड्यापूर्वीच पोहोचलो आहोत. 

१) जर तुम्ही बाहेरच्या देशातून आला आहात आणि विषाणूची लागण झाली आहे.
२) तुम्ही अशा माणसाच्या संपर्कात आला आहात ज्याला विषाणूची लागण आहे. आणि तिसरा टप्पा
३) तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून तरी लागण झाली आहे आणि तुम्ही त्याचा माग काढू शकत नाही.

सगळ्याच देशांमध्ये हे झाले आहे. युनायटेड स्टेट्समध्ये हे ४ आठवड्यापूर्वी झाले आहे. आपण भारतीय कुणी विशिष्ट व्यक्ती नाही आहोत. आपण म्हणतो आपण नमस्कार करतो, स्वच्छ आहोत पण या ग्रहावर असा कुणीच नाही ज्याच्याकडे या विषाणूसाठी प्रतिकारशक्ती आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की आपण कुणीतरी विशेष आहोत तर आता ती कल्पना दूर करण्याची वेळ आली आहे. सरकारने घेतलेल्या कारवाईकडे लक्ष दिल्यास समजून येईल की त्यांनी सगळी ठिकाणं बंद केली आहेत. बाहेरच्या देशातून येणारी विमाने बंद केली आहेत. 

देशाची आरोग्यव्यवस्था – आपण कुणाच्या बाबतीत जास्त काळजी करतो तर ज्या लोकांना तीव्र प्रमाणात त्रास होत असतो जसं कीज्यांना व्हेंटिलेटरची गरज असते, ज्यांना श्वास घेण्यासाठी आधाराची गरज असते अशा केसेसना आपण दवाखान्यात नेतो. आपल्याकडे जास्त प्रमाणात दवाखाने नाहीत. आपल्याकडे ७० हजार ते १ लाख ICU बेड्स आहेत. कदाचित खूप कमी व्हेंटिलेटर आहेत. आपला देश चीनसारखासुद्धा नाही जो गरज पडल्यास खूप जास्त प्रमाणात साधनसामग्री बनवेल. हा साथीचा रोग शिखरावर पोहचेल तेव्हा यु.केमध्ये जवळपास ५० लाख आणि अमेरिकेत ३० ते ४० लाख केसेस आढळतील. भारतातही हा आकडा कदाचित ४० ते ८० लाख दशलक्ष केसेस पर्यंत जाऊ शकतो. त्या तुलनेत आपल्याकडे फक्त ७०,००० हॉस्पिटल बेड्स आहेत. म्हणजेच आपल्याकडे पेशंट ऍडमिट करायलासुद्धा जागा नसणार आहे. व्हेन्टिलेटर्स, डॉक्टर्स, औषध अशा सुविधांची कमतरताही मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.

चीन, आपण आणि वृद्ध लोक – अशा काळात आपले डॉक्टर्स हे संरक्षणाच्या पहिल्या रांगेत आहेत. औषधांच्या बाबतीत प्रगत असल्यामुळे वुहानमध्ये मृत्युदर २% आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आपण प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवल्या पाहिजेत. भारताकडे विषाणू संक्रमित करण्याची क्षमता आहे. अजून हे नक्की नाही की  विषाणू उन्हात मरतो की नाही. या विषाणूकडे इतर शीतज्वरापेक्षा २० पट जास्त ताकद आहे. त्यामुळे भारत पुढचा हॉटस्पॉट बनू शकतो. त्यामुळे लोकांनी अंतर ठेवणे खूप गरजेचे आहे. पण हे फक्त कठीण नाही तर अवघड आहे. चीनमध्ये लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी जबरदस्ती केली जाते, जे आपल्याकडे होत नाही. इथल्या लोकांना किटाणू मारायची थिअरी माहित नाही. डॉ देवी शेट्टी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये  म्हणाले आहेत की, भारतातील १०% लोकसंख्येपर्यंत हा विषाणू जाऊ  शकतो. पण यु.एस आणि यु.के सारख्या देशांनी सांगितले आहे कि हा विषाणू २०% लोकसंख्येपर्यंत जाईल. आपला देश याला अपवाद नाही. कोरोना विषाणूची लागण झालेला माणूस मरतोच असं अजिबात नाही. लोक यातून बरे होत आहेत, जे ६५ वर्षाच्या पुढील लोक आहेत, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा २% लोकांच्या मृत्यूची शंका नक्कीच आहे.

अर्धा भारत आजाराला बळी पडेल? – अमेरिकेत ४० ते ६०% पर्यंत संक्रमण होऊ शकते. आणि जर त्यानुसार भारताचा विचार केला तर अगदी वरच्या पातळीचा आकडा पकडता आपल्याकडे साधारण ७० कोटी लोक संक्रमित होऊ शकतात. तीव्र संक्रमण कमी प्रमाणात असेल आणि मृत्युदरही खूपच कमी असेल. मृत्यू पडणाऱ्या व्यक्तीचं सरासरी आयुर्मान ६० वर्षांच्या आसपास आहे. १९१८ मध्ये जो विषाणू पसरला होता त्यामध्ये साधारण ३० लाख लोक मृत्युमुखी पडले होते. ज्यामध्ये भारताची एक तृतीयांश लोकसंख्या होती. जे शिपाई पहिल्या महायुद्धावरून आले होते ते हा विषाणू घेऊन आले होते. हा रोग पसरला कारण त्यावेळी माहिती पुरविणारे कोणते माध्यम नव्हते. आता सोशल मीडिया ही  माहिती देण्यासाठी मदत करेल. जी संरक्षण म्हणून काम करेल. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या काळात ही  माध्यमे योग्य माहिती पोहोचवायला आपल्याला मदत करतील.

काळजी घेणं जास्त गरजेचं – अलास्का मधील आणखी एक उदाहरण आहे. एक पोस्टमन एक विषाणू घेऊन आला होता, ज्याच्यामुळे संपूर्ण गाव संक्रमित झाले पण सोशल मीडियामुळे त्यांना आता माहित झाले आहे. पण यामुळे काही अनावश्यक माहितीही जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यांनी लगेच काळजी घेतली पाहिजे. घरीच बसून राहिले पाहिजे. खोकताना तोंड झाकले पाहिजे. यु.एसमध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच कोपर तोंडाला लावून खोकण्याची सवय असते. आपण हाताने खोकल्यावर बऱ्याचदा चेहऱ्यावर हात लावतो. एखाद्याशी हात मिळवतो. त्यामुळे या सवयी बदलल्या पाहिजेत. दिवसातून चार वेळा हात आणि तोंड धुतलं पाहिजे. शक्य असल्यास बाहेरून आल्यावर अंघोळ केली पाहिजे. तुम्ही मास्क वापरू नका, मास्क फक्त आरोग्य क्षेत्रात गरजेचे असतात आणि सध्या मास्कची कमतरताही भासत आहे.

विषाणू जगण्यासाठी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असतो. त्यामुळे आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रव थेंबातुन तो दुसऱ्या शरीरात जातो. तेव्हा तुम्ही थोडासा मेंदू वापरून जिथे काही लक्षणे असतील तिथून दूर राहणचं जास्त योग्य. एखाद्या घरात संशयित बंद करून बसला असेल तर त्याला जेवण देऊ शकता. हा विषाणू इतका घातक नाही त्यामुळे तुम्ही योग्य अंतर ठेवून संपर्क ठेवू शकता. हा इबोला सारखा रोग नाही. जेवण झाल्यावर त्याचे ताट साफ करणे सुरक्षित आहे, त्यांचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता, फक्त तुम्ही सतत तुमच्या चेहऱ्याला हात लावत नसाल तर आणि सतत हात धुवत असाल तरच हे शक्य होईल.

सद्यस्थितीत हातमोजे घालणे गरजेचे नाही. जे संशयित आहेत त्यांनी २ आठवडे तरी वेगळे राहा. काही लक्षणे नसतील तरी एक आठवडा वेगळे राहा. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास झाला, कमी प्रमाणात ताप असला किंवा कोरडा खोकला आणि श्वासोच्छ्वासाची समस्या असल्यास नक्की तपासणी करून घ्या. 
प्रत्येकांमध्ये ही सगळी लक्षणे नसतात. काहींमध्ये केवळ एक-दोनही असू शकतात. व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावर गोमूत्र आणि गायीचे शेण हे यावर उपाय आहे असं म्हटलं जातंय. पण याचा काही वैज्ञानिक पुरावा नाही. होमिओपॅथी एक पर्यायी औषध आहे पण तोही प्रभावी असेल याची शक्यता नाही. आयुर्वेदिक औषधांचा संदर्भ असला तरी त्याचा पुरावा उपलब्ध नाही. गरम पाणी पिणे, लिंबुयुक्त जेवण करणे हे आपल्या समाधानासाठी नक्कीच फायदेशीर आहे. 

प्रयत्न – काही देशांमध्ये वेगवेगळी औषधं वापरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सियाटलमध्ये एक मॉडर्ना थेरोपेटिक्स नावाची लस तयार केली जात आहे. जिची मानवी चाचणी देखील केली जात आहे. ही लस एका जेनेटिक कोडची जेनेटिक कॉपी आहे. ही लस यशस्वी होण्याच्या काही शक्यता आहेत. पण उपचारापेक्षा त्याचा गंभीर परिणाम दिसून येणार असेल तर हे टाळलेलच बरं. विषाणू कमी लोकांना मारेल पण लस त्याच्यापेक्षा जास्त लोकांना मारक ठरू शकते. आपण काळजी घेतली पाहिजे आपण सगळेच आशावादी आहोत ही नाहीतर दुसरी एखादी लस काम करेल. खरं तर हा विषाणू आपल्याबरोबर बराच कालावधी राहणार आहे. त्यामुळे लस नक्कीच येईल. साधारण १२ ते १८ महिन्यात येईल. येत्या २-३ महिन्यात आपण खूप आव्हानांना सामोरे जाणार आहोत. हे जेव्हा वाढेल तेव्हा आपला कॉमन सेन्सच आपल्याला वाचवेल. उत्तम सेन्स आणि आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणे हाच यावर उपाय आहे. आरोग्य क्षेत्राचा भाग म्हणून सरकारने भविष्यात काय केले पाहिजे याचा सल्ला आपण द्यायला नको. जर आपल्याकडे उत्तम आरोग्यसुविधा, डॉक्टर आणि नर्सेस असतील तर अशा समस्यांना तोंड द्यायला आपण सक्षम असू.

वर्तमानाकडून भविष्याकडे – आपल्याकडे आरोग्य क्षेत्राला फार अनुदान नाही. आणि आताही आपण खूप कमकुवत सुविधांसहित काम करत आहोत. या क्षेत्रातील संशोधन आणि इतर कामासाठी सरकारने पुरेपूर अनुदान दिले पाहिजे. तरच आपण अशा आपत्तीवेळी चांगले तोंड देऊ शकतो. आरोग्यक्षेत्रासाठी जी.डी.पीच्या १.४-१.५ टक्केच रक्कम खर्च होते, जी खूप कमी आहे. ही टक्केवारी किमान २ ते ३ टक्क्यांनी वाढयला हवी. असं झालं तरच आपण इतर प्रगत देशांसारखं लोकांच्या सेवेत जोमाने काम करु शकू.