औरंगाबाद – शहरातील पाणी टंचाईची तिव्रती कमी करण्यासाठी किमान दोन दिवस आड पाणी देण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरात येणाऱ्या पाण्यात वीस एमएलडीने वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. पण मार्च महिना अर्धा संपला तरी यासंदर्भात काम सुरू झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात देखील नागरिकांनी पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
शहराच्या काही भागात पाचव्या दिवशी तर काही काही भागात सहाव्या ते सातव्या दिवसी पाणी पुरवठा केला जातो. विशेषतः सिडको-हडको भागात पाणी टंचाईची ओरड आहे. त्यामुळे महिलांनी पालकमंत्री श्री. देसाई यांची भेट घेऊन दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यावर देसाई यांनी महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला उपाय-योजना करण्याचे आदेश दिले होते. काही दुरूस्त्या केल्यास शहरात येणाऱ्या पाण्यात किमान वीस एमएलडीने वाढ होईल, असे पालकमंत्र्यांना जीवन प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले होते.
डिसेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना देसाई यांनी केली होती. पण मार्च महिना उजाडला तरी काम सुरू झालेले नाही. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह यांनी सांगितले की, जोपर्यंत नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सध्या अस्तीत्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून वीस एमएलडी पाणी वाढवावे लागणार आहे. सध्याची पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्यामुळे ठिकठिकाणी पाइप फुटतात. त्यामुळे क्रॉसकनेक्शन करून सात किलोमीटर नवीन पाइपलाइन टाकावी लागणार आहे. पण पाइप तयार झाल्यानंतर हे काम करता येईल, असे त्यांनी नमूद केले.