सांगली प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उभे राहिलेले उमेदवार गोपीचंद पडळकर हे स्वगृही परतणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून गोपीचंद पडळकर भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनेदेखील कंबर कसली आहे. पण लोकसभा निवडणुकीत वंचितकडून सर्वाधिक मतं घेतलेले गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाल्याची चर्चा आहे. पडळकर भाजपमध्ये जातील, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे .
पडळकर वंचितच्या प्रमुख कार्यक्रमांना गैरहजर राहात असल्याने त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना आणखीच बळ मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेणारा आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला गोपीचंद पडळकरांसारखा नेता पक्षापासून दूर होत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीची डोकेदुखी वाढली आहे .दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील दुफळी बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सन्मानजनक जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत युती तुटल्याची घोषणा केली होती.