परभणी प्रतिनिधी । जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान संथ गतीने चालू असुन दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५२.८६ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ पाथरी मतदारसंघात ४९.३५ टक्के तर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ४३.९२ आणि ४३.७४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांचा केंद्रात येण्याचा वेग वाढेल आणि ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या सात गावांच्या मतदानावरील बहिष्कार अजूनही कायम दिसून येत आहे. तालुक्यातील लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लोहिग्राम या गावांचा रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार असल्यामुळे या सात गावातील एकूण पाच मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजे पर्यंत एकही मतदान झालेले नव्हते. तेथील एकही नागरिक मतदान केंद्राकडे फिरकला नसल्याची माहीती मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे संबधित पाच मतदान केंद्रावर कुठलाही उमेदवार प्रतिनिधी देखील उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी मतदारांना मतदान करण्यासाठी चिखल तुडवित मतदान केंद्रावर जावे लागले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पि. शिवशंकर यांनी ‘सायंकाळी मोठ्या संख्येने जिल्हातील मतदारांनी मतदान करावं’ असं आवाहन केले आहे. तसेच पाथरी तालूक्यातील गौंडगाव येथे प्रशासनाकडून व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने दिव्यांग मतदारांना केंद्रात जाण्यास अडचणी आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.