जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील हनुमानगड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलाने बुधवारी रात्री आपल्या आई-वडिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करीत झोपेतच त्यांची हत्या केली. तसेच त्याने आपल्या लहान भावाच्या डोक्यावरही वार केले. यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी लहान भावाचा श्वासोच्छवास सुरू होता. यानंतर लहान भावाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर आई-वडिलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे तसेच रक्ताने माखलेली कुऱ्हाडदेखील जप्त केली आहे. मृत शीशपाल पत्नी इंद्रा आणि आपल्या दोन मुलांसोबत याठिकाणी राहत होता. 12 बिगे शेतात हे दाम्पत्य शेती करीत होते. मात्र त्यांच्या 15 वर्षांच्या मुलाला लहान वयातच नशा करण्याची सवय लागली होती. त्याच्या या सवयीमुळे त्रस्त होऊन या दांपत्याने त्याला नशा मुक्ती केंद्रात पाठवलं. घटनेच्या दिवशी आई-वडील खाटेवर झोपले होते. भाऊ दुसऱ्या खोलीत होता.
यावेळी आरोपी अल्पवयीन मुलगा कुऱ्हाड घेऊन आला आणि झोपलेल्या आईवडिलांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. आरडाओरडा ऐकून छोटा भाऊ धावत आला. तर त्याच्याही डोक्यावर आरोपीने कुऱ्हाडीने वार केले. यानंतर लहान भाऊ बेशुद्ध झाला. या घटनेत त्याच्या आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने जवळ राहणाऱ्या लोकांना त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचं सांगितलं. तेव्हा लोकसुद्धा हैराण झाले. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आई-वडिलांनी आपल्याला नशा मुक्ती केंद्रात पाठविल्याच्या रागातून मुलाने हि हत्या केल्यामुळे सगळेच हादरले आहेत.