पॅरिस । मोठ्या प्रमाणावर हॅकिंग आणि हेरगिरी (Spying) केल्याचा आरोप झाल्यानंतर पेगासस स्पायवेअर (Pegasus) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. दरम्यान, पेगासस स्पायवेअर हॅकिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फ्रान्सने एक समिती स्थापन केली आहे. खरं तर, Forbidden Stories आणि Amnesty international या फ्रेंच संघटनांनी एकत्रितपणे हे उघड केले आहे की, जगभरातील सरकारे इस्रायली कंपनी NSO च्या स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून पत्रकार, विधिज्ञ, राजकारणी आणि अगदी राजकारण्यांच्या नातेवाईकांची हेरगिरी करीत आहेत. या तपासणीला ‘पेगासस प्रोजेक्ट’ असे नाव देण्यात आले आहे. हेरगिरी केलेल्या या लिस्टमध्ये 50 हजार लोकांची नावे आहेत. पहिली लिस्ट पत्रकारांची आहे ज्यामध्ये 40 भारतीय नावे आहेत.
भारत सरकारने काय म्हटले?
रविवारी आलेल्या रिपोर्टनंतर सोमवारी भारतीय संसदेपासून संपूर्ण जगापर्यंत या विषयावर खळबळ उडाली आहे. भारत सरकारने ‘पेगासस प्रोजेक्ट’ चे आरोप फेटाळले आहेत. सरकारने म्हटले आहे की, सरकारी पाळत ठेवण्याच्या या आरोपाला ठोस आधार नाही. भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत एक सशक्त लोकशाही आहे, जो आपल्या सर्व नागरिकांच्या गोपनीयतेचा हक्क मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. ही वचनबद्धता पुढे ठेवत त्याने वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, 2019 आणि आयटी नियम, 2021 हे प्रत्येकाचा वैयक्तिक डेटा संरक्षित करण्यासाठी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युझर्सना सक्षम बनविण्यासाठी लागू केले आहे.”
सरकारने असे म्हटले आहे की,” यापूर्वी भारत सरकारने WhatsApp वर पेगाससचा वापर केल्याचे असेच दावे केले गेले होते. त्या रिपोर्टमध्ये काहीही तथ्य नव्हते आणि त्याला भारतीय सर्वोच्च न्यायालयात WhatsApp सह सर्वच पक्षांनी नकार दिला होता.”
पेगासस अशाप्रकारे फोन हॅक करतो
पेगासस एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर. याद्वारे कोणताही फोन हॅक होऊ शकतो. हॅकिंगनंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक, मेसेजेस आणि कॉल यासह सर्व माहिती हॅकरकडे जाते.
2016 मध्ये पेगासस पहिल्यांदा चर्चेत आला
पेगासस पहिल्यांदा 2016 मध्ये चर्चेत आला होता. त्यानंतर UAE चे ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट अहमद मन्सूर यांना एका अज्ञात क्रमांकावरून अनेक SMS आले. यात अनेक लिंक्स पाठविण्यात आले होते. जेव्हा अहमद यांना या मेसेजबद्दल शंका वाटली तेव्हा त्यांनी सायबर तज्ञांकडून ते तपासून घेतले. त्यावेळी असे कळले की, जर अहमदने मेसेजमध्ये पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले असते तर पेगासस त्याच्या फोनमध्ये डाउनलोड झाला असता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा