मुंबई । पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. त्यांना राष्ट्रकार्याची तळमळ आहे. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अशा शब्दात आज शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीस्तुमने उधळण्यात आली आहेत. मात्र त्याचबरोबर साठ वर्षात चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षातही झाल्या असं म्हणत भाजप सरकारच्या झालेल्या चुकांवरही सामानातून बोट ठेवण्यात आलेले आहे.
गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉक डाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉक डाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, पूर्ण बहुमत असल्याने भाजप सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा मात्र अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत असंही सामानातून म्हणण्यात आले आहे. फक्त मागील सहा वर्षांत देश उभा राहिला असे कोणी म्हणत असेल तर ती इतिहासाशी बेईमानी ठरेल असाही अग्रलेखात म्हटले गेले आहे.