पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १८ जानेवारी रोजीचा संभाव्य पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी पुणे प्रशासनाला देण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या नावाचे कलादालन, पालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन तसेच विविध कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार होते. मात्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा कहर अद्याप सुरूच आहे. राज्यात शनिवारी नव्या 41 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने विविध निर्बंध लागू केले आहेत. तरीही रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाही.