ममता बॅनर्जी गोव्यात काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात, त्याचा फायदा कोणाला ?? राऊत रोखठोकच बोलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुक रंगतदार होणार आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना असताना त्यात शिवसेना, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी उडी घेत नवे आव्हान उभे केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून आप आणि तृणमूल काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी गोव्यात काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात, त्याचा फायदा कोणाला ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण सुरू आहे. या पैशांचे धनी तृणमूल नसून दुसरेच कोणी तरी असावेत, असेही सांगणारे अनेक जण भेटले असे राऊत म्हणाले. गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका भाजपची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार? असा थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे.

गोव्यातली निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, पण तृणमूल काँग्रेस व ‘आप’सारख्या पक्षांनी काँग्रेसच्या वाटेत काटे पेरून भाजपाला मदत केली आहे. तृणमूल आणि आपसारख्या पक्षांनी गोव्याच्या मतदारांना फक्त सोन्याने मढवायचेच बाकी ठेवले. अशा आश्वासनांची खैरात उडवली आहे.आप आणि तृणमूलचे लक्ष ख्रिश्चन मतांवर आहे. पण ख्रिश्चनांची मते काँग्रेसच्या पारडय़ात पडतील. असेही राऊत म्हणाले.