हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाशी जशी एक लढाई देशातील नागरिकांना घरात बसून लढायची आहे, तशीच एक लढाई काही जणांना घरा बाहेर पडून लढायची आहे. आणि ही घराबाहेरची लढाई लढणारे शिपाई आहेत अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, पोलीस, वैद्यकीय सेवा देणारी रुग्णालय. दरम्यान, यात सर्वात आधी कोरोनाला थेट भिडणारे आहेत ते म्हणजे डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी वर्ग लॅब टेक्निशियन. मात्र, देशावरील संकटाला दूर सारण्यासाठी जीवाचा धोका पत्करून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या लोकांना समाजानेच बहिष्कृत करायला सुरुवात केली आहे. काही कर्मचाऱ्यांना घर मालक घर खाली करण्यास सांगत आहेत. तर काही लोक त्यांच्या जवळ यायलाही घाबरत आहेत. मात्र हे कर्मचारी कामावर हजर राहतच आहेत. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील डॉक्टर नायडू संसर्गजन्य रोगांच्या रुग्णालयात कामावर असलेल्या नर्स छाया यांच्याशी फोनवर बातचीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ५ मिनिटे नर्स छाया यांच्याशी बोलणे केले. पंतप्रधान कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने नर्स छाया यांना फोन केला आणि पंतप्रधान आपल्याशी बोलू इच्छितात असा निरोप दिला. त्यानंतर हा कॉल पंतप्रधानांकडे ट्रान्स्फर केला जातो. आणि पंतप्रधान नर्स छाया यांच्याशी चक्क मराठी भाषेत बोलले.
पंतप्रधान मोदींचा नर्स छाया यांच्याशी झालेला संवाद
पंतप्रधान: हॅलो!
नर्स छाया: हॅलो, नमस्ते सर!
पंतप्रधान: नमस्ते सिस्टर छाया. कशा आहात आपण?
नर्स छाया: मी ठीक आहे, सर.
पंतप्रधान: तुम्ही तुमची काळजी व्यवस्थित घेत आहात ना?
नर्स छाया: जी, सर.
यानंतर पंतप्रधान हिंदी भाषेत बोलतात
पंतप्रधान: तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना तुम्ही करत असलेल्या सेवेच्या कामाबाबत सुरक्षेची खात्री कशी देता? तुमचे कुटुंबीय चिंतेत असतील.
नर्स छाया: जी सर. चिंता तर आहेच त्यांना. मात्र, काम तर करावेच लागते. सेवा द्यावीच लागते. तर.. होत असते थोडे. असे काही नाही.
पंतप्रधान: जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते घाबरलेले असणार?
नर्स छाया: हो. घाबरलेले असतात. दाखल करून घेतले तर घाबरतात. मात्र आम्ही काय करतो सर… आम्ही जाऊन त्यांच्याशी बोलतो. काही होणार नाही. तुमचा रिपोर्ट चांगला येणार. पॉझिटीव्ह आला तरी घाबरण्याची काही गोष्ट नाही. या हॉस्पिटलमध्ये ७ रुग्ण ठीक झाले आहेत. आता ९ रुग्ण आहेत. त्यांची तब्येतही चांगली आहे. तर घाबरण्याची गरज नाही. आम्ही जाऊन त्यांना औषधे देतो. त्यांच्याशी बोलतो. त्यांना चांगले वाटते. त्यांच्या मनात भीती असते, मात्र आम्ही त्यांची भीती काढून टाकण्याता आम्ही प्रयत्न करतो.
पंतप्रधान: रुग्णांचे नातेवाईक नाराजी व्यक्त करत असतील… कारण सर्वांनाच चिंता लागली आहे…
नर्स छाया: रुग्णांच्या नातेवाईकांना आत येऊ देत नाही, सर. आमचे कर्मचारी आणि रुग्णच फक्त आत येतात. संपूर्ण हॉस्पिटल क्वारंटाइनमध्ये आहे.
पंतप्रधान: तुम्ही इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत आहात. करोनाच्या आजारासाठी संपूर्ण रुग्णालय समर्पित केले आहे तुम्ही. संपूर्ण देशभरातील आरोग्य सेवेशी संबधित लोकांना सिस्टर छाया यांचा काय संदेश आहे?
नर्स छाया: घाबरू नका. घाबरून जायचं नाही, काम करायचं आहे. आणि करोनाचा आजार तर पळवून लावायचा आहे आणि देशाला विजय मिळवून द्यायचा आहे. हेच आमचे ब्रीदवाक्य असायला हवे.
पंतप्रधान: सिस्टर, माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही ज्या हिमतीने काम करता.आणि तुमच्यासारखेच देशातील लाखो आरोग्य कर्मचारी जे लोकांची सेवा करत आहेत, मी तुमचे अभिनंदन करतो. मला तुमच्याशी बोलून खूप चांगले वाटले. धन्यवाद!
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.