हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी स्वतः याबाबत एक ट्विट करत या गोष्टीला पुष्टी दिली आहे. “मोदींनी ट्विट करत म्हटलं की, “या रविवारी मी आपले सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, आणि युट्युब बंद करण्याचा विचार करत आहे, मी आपल्या सर्वांना याबाबत लवकरच माहिती देणार आहे.”विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर जगात सर्वात जास्त फॉलोअर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या ट्विटचा स्क्रीन शॉट काढून मोदींवर कटाक्ष टाकत ट्विट केलं आहे.
“द्वेष सोडा, सोशल मीडिया अकाउंट नाही” असं खोचक आशयाचं ट्विट राहुल यांनी केलं आहे.
दरम्यान, 2014 साली पंतप्रधान पदाचा पदभार सांभाळल्यानंतर एकही पत्रकार परिषद न घेणारे मोदी आपल्या समर्थकांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. मात्र, आता मोदींनी सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याबाबतचा निर्णय का घेतला असावा याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान मोदी वर्ष 2009 पासून ट्वीटरवर सक्रिय असून 5 मे 2009 ला त्यांनी आपलं फेसबुक अकाउंट उघडलं होत.