मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारतीय हद्दीत चीनने कोणत्याही प्रकारची घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चीनकडून गैरफायदा घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केले नाही, हा पंतप्रधान मोदींचा दावा साफ खोटा आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे वाटाघाटींमध्ये भारताची भूमिका दुर्बल झाली आहे. मात्र, यामुळे पंतप्रधान मोदी चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
यापूर्वी परराष्ट्र मंत्र्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेच्या परिसरात भारतीय हद्दीत चिनी सैनिकांकडून बांधकाम करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही घुसखोरी झालीच नसल्याचे म्हटले. त्यामुळे भारताकडून आधी करण्यात आलेल्या वक्तव्यांना कोणताही अर्थ उरला नाही.
माजी लष्करप्रमुख डी.एस. हुड्डा यांच्या दाव्यानुसार, उपग्रहांद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची वाहने आणि तोफखाना स्पष्ट दिसत आहेत. या भागात तब्बल १० हजार चिनी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच कालच समोर आलेल्या माहितीनुसार, फिंगर ४ आणि फिंगर ८ भागात चीनकडून नवे बांधकाम करण्यात आले आहे. मग तरीही पंतप्रधानांनी चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही, असे का म्हटले? या वक्तव्यासाठी चीनने भारतीय पंतप्रधानांचे कौतुक केले. मोदी चीनमध्ये लोकप्रिय झाले आहेत. यामुळे वाटाघाटीतील भारताची भूमिका दुर्बल झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”