कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
नवारस्ता (ता. पाटण) येथील डोंगरालगत अवैधरीत्या सुरू असलेल्या दगड खाणी (क्रशर) वर पाटणचे तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी बुधवारी अचानक कारवाई करून दोन्ही खाणी सिल केल्या आहेत. या ठिकाणी स्फोटकांचा मोठा साठा पाटण पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकजणास ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली. पाटण महसूल व पोलिसांनी अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 3) हरगुडेवाडी नाडोली, (ता. पाटण) येथील डोंगरालगत असलेल्या अवैद्य दगड खाणीवर कारवाई करण्यासाठी तहसिलदार योगेश्वर टोंपे त्या ठिकाणी गेले असता त्यांना अस्ताव्यस्त पडलेले स्फोटकांचे बॉक्स आढळून आले. त्यांनी याची माहिती पाटण पोलिसांना कळविल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सरकारी पंचांच्या उपस्थित पंचनामा करून प्रत्येकी 25 किलो वजनाचे एकूण 66 बॉक्स म्हणजेच 1650 किलोग्रॅम स्फोटके, 69 डिटोनेटर व स्फोट घडवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण किंमत 1 लाख 99 हजार 590 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक चौखंडे करत आहेत.
गुन्ह्यात जप्त मुद्देमाल हा यशवंत एंटरप्राइजेसचे सुर्यकांत यादव यांचा असल्याची माहिती मिळाली आहे. गुन्ह्यातील स्फोटके हाताळण्याची जबाबदारी असणारे सतीश सूर्यकांत करजगर (वय 47, वर्षे रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यास ताब्यात घेण्यात आले आहे. तर सूर्यकांत यादव (रा. पुसेसावळी, ता. खटाव) व सुनील लक्ष्मण माथने (रा. नाडे, ता. पाटण) यांचा पोलीस शोध घेत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’