सांगली | सांगलीसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून तब्बल १८ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. जिज्या उर्फ जितेंद्र महिम्या काळे आणि अनश्या उर्फ अनुशेठ गुरुपद भोसले असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे इतर चार साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, या दोघांकडून एकूण ६ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक तासगाव विभागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला मिळाली की रेकॉर्डवरील जिज्या काळे हा सोन्याचे दागिने पिशवीत घेऊन बाहेर जाणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे कवठेएकंद येथील स्मशानभूमीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिशवी मिळाली, पिशवी मध्ये रोख रक्कम तसेच त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल मिळून आला.
त्याच्याकडे कसून चौकशी करता त्याने सांगितले कि, शांतिनिकेतन ग्राउंड जवळील घर, कोल्हापूर रोडवरील घर, फळमार्केट येथील एका घरात चोरी, शामरावनगर, वसंतनगर, जुना बुधगांव रोड, मल्टिप्लेक्स टॉकी जवळची एक दुकान, इस्लामपूर, कुमठे, इस्लामपूर येथील बहे रोडजवळील एका गोडावून मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून एकूण २ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच बरोबर दुसरीकडे पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अनश्या भोसले हा आरग ऐथे आला असून त्याच्याजवळ चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने आहेत. तो ते विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची मिळाली. भोसले यांच्याकडून घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून ४ लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचे दोनही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी घरफोडी, चोरी यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.