चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी लाखो रुपयांचा दारूसाठा बुलडोझर चालवत नष्ट केला. मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईत हा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. तो नष्ट करण्यासाठी पोलिसांनी या दारूसाठ्यावर थेट बुलडोझर चालवला.
अवैध दारु बाळगणाऱ्यांसह, विक्रेत्यांवर गोंडपिपरी पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम राबविली आहे. यात मागील ३ वर्षाच्या कार्यकाळात एकूण २३४ दारूबंदीच्या गुन्ह्यातील ६७ लाख २७ हजार रुपये किमतीचा दारुसाठा गोळा झाला होता. मंगळवारी गोंडपिपरी शहरालगत असलेल्या शवविच्छेदन केंद्राच्या रोडवर हा जमा असलेला दारुसाठा बुलडोझर चालवत नष्ट करण्यात आला. यावेळी गोंडपिपरीचे ठाणेदार संदिप धोबे यांचेसह उत्पादक शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस.एन.आक्केवार यांच्या उपस्थितीत पोलिस हवालदार सत्यवा न सुरपाम,प्रफुल कांबडे, खुशाल गौरकर आदी पोलिसकर्मचाऱ्या समक्ष या दारूसाठ्यावर रोड रोलर चालविण्यात आला.या प्रसंगी पंच म्हणून कैलास नैताम,शैलेश झाडे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून आहे. मात्र जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका तेलंगणा राज्य लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी याभागातून जिल्ह्यात होते . याव्यतिरिक्त इतर मार्गाने सुद्धा गोंडपिपरी तालुक्यात दारूचा पुरवठा सुरू होता. अशा परिस्थितीत तालुक्यात पोलिस विभागाकडून अनेक कारवाया घडून येतात.