औरंगाबाद – औरंगाबाद शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून खुणांच्या घटनेत मोठ्या प्रमाणांवर वाढ झाली आहे. आता तर शहरात पोलिसांचे कुटुंब देखील सुरक्षित नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण म्हणजे पोलिस दलातील नारायण घुगे यांचा मुलगा योगेश घुगे (22, रा. शिवनेरी कॉलनी) याचा गुंडांच्या टोळक्याने निर्घृण खून केल्याची घटना काल पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गुंडांच्या टोळ्या सोबतचे भांडण मृताच्या आईने कसेबसे शनिवारी सायंकाळी मिटवले होते. मात्र, तरीही टोळक्याने मध्यरात्री घात केला या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशचा परिसरातील हिस्टरीसीटर सचिन गायकवाड याच्यासोबत वाद होता. शनिवारी सायंकाळी सचिनने मित्रांना सोबत आणत योगेशला घराच्या जवळ मारहाण केली. तेव्हा योगेश च्या आईने सचिनच्या पाया पडून त्यांच्या तावडीतून सोडविले. हा वाद तेव्हा मिटला होता. मात्र, योगेशला मित्रांनी बोलावल्यामुळे मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तो घराबाहेर पडला. पहाटे तीन वाजता आईला एक फोन आला. त्याने योगेश आंबेडकर नगरातील स्मशानभूमीजवळ बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती दिली. योगेशच्या आईने व नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याची माहिती आईनेच सिडको पोलिसांना दिली.
मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी घाटी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. योगेशच्या आईच्या तक्रारीवरून सचिन गायकवाड यांच्यासह इतर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिडको पोलिसांनी सचिनसह इतरांना ताब्यातही घेतले आहे.




