सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा देणाऱ्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी, असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिला. दरम्यान, आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्किरे यांनी शिरोळ व जयसिंगपूरमध्ये बसून खासदार राजू शेट्टी व विशाल पाटील यांच्याशी चर्चा करुन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.
सांगलीच्या जागेवरुन सांगलीसह जयसिंगपूर व शिरोळमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या नेत्यांच्या खा.राजू शेट्टींकडे फेऱ्या सुरू आहेत. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, भारती विद्यापीठाचे अध्यक्ष, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह नेत्यांनी खासदार शेट्टी यांची भेट घेऊन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशाल पाटील यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात शड्डू मारण्याची तयारी केली आहे. मात्र त्यांना आता स्वाभिमानीकडून ऑफर देण्यास आली आहे. मात्र विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत आहेत.
स्व. वसंतदादा पाटील यांनी कॉंग्रेसला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यामुळे तुम्ही कॉंग्रेसपासून बाजूला जाऊ नये. अपक्ष म्हणून लढू नये असा सल्ला सतेज पाटील यांनी विशाल पाटील यांना दिल्याचे सांगितले. पण विशाल पाटील ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.