पुणे । २ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची आमच्यासोबत येण्याची इच्छा होती. पण भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला सोडायला नको अशी आम्ही भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही दोन वर्षापुर्वी राष्ट्रवादी सोबत गेलो असतो असं वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या सोबत यायची इच्छा होती. त्यासंदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या. मात्र भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी त्यावेळी सांगितलं की शिवसेना सोडून हे आपल्याला करता येणार नाही. जर शिवसेना सोबत राहून जर राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर घेऊ असंही तेव्हा ठरलं होतं. चर्चा बऱ्याच पुढे गेल्या होत्या मात्र नंतर ते सगळं प्रकरण थंड बस्त्यात गेलं असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
फडणवीस पुढे म्हणाले की, “हे सरकार पाडण्याचा आमचा अजेंडा नाही. पण या सरकारचं काय आणि कसं चालल आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मला नाही वाटत, हे सरकार जास्त काळ टिकेल”, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची परिस्थिती लक्षात घेता, राज्याच्या प्रमुखांनी समन्वय साधला पाहिजे. मात्र हे होताना दिसत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारभारावर फडणवीस यांनी टीका केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”