हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. दरम्यान आज मुंबईत राज्यातील मंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीत राज्यपातळीवर निर्बंध आणि नियमावली जारी करण्याबाबत चर्चा केली जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहेत.
मुंबईत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीस सुरुवात झाली आहे. या बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत मिनी लॉकडाऊन लावण्या संदर्भात चर्चा केली जात आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
देशात ओमिक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचे संकट वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. आता पश्चिम बंगाल, हरियाणामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही 50 टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत. बंगालमध्ये मिनी लॉकडाउन करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.
शनिवार, रविवार कडकडीत बंद राहणार
आज होत असलेल्या बैठकीत राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. मात्र, शनिवार आणि रविवार कठोर निर्बंध असणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद करण्याची शक्यता आहे. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहण्याची शक्यता आहे.
काय सुरु, काय बंद असण्याची शक्यता –
– रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत रात्रीची संचारबंदी,
– गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार
– मॉल, बार, रेस्टॉरंट वेळात बदल करण्याचा निर्णय,
– सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार
– राज्यातील चित्रपटगृहे 50 टक्के परवानगीने
– 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
– अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांची उपस्थिती
– राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहणार
– शाळा महाविद्यालये बंद
– दुकाने सकाळी दहा ते रात्री 10 या वेळेत सुरु राहतील
– रेस्टॉरंट्स, बार 50 टक्के क्षमतेने सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार