सांगली प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या पोरींनो शेतकरी नवरा नको! असं म्हणू नका. शेती तोट्याची आणि बेभरवशाची असली तरी सुध्दा हे आव्हान आपण स्वीकारु आणि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करूया. या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेट्टी यांच्या आवाहनाला वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथील उच्यशिक्षित शिवलीला शिवाजी सुर्यवंशी या तरुणीने प्रतिसाद देत शेतकरी तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत रविवारी साखरपुडाही थाटात उरकून घेतला.
आपण शेतकरी नवरा नको म्हणतो त्यावेळी आपला भाऊ आणि वडील सुद्धा शेतकरी आहेत, हे विसरून चालणार नाही. तेंव्हा तोट्याच्या शेतीपासून पळ काढण्यापेक्षा आव्हानाला भिडूया अस भावनिक आवाहन दोन दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शिवलीला सुर्यवंशी या इंग्रजी विषयातून बी.एड झालेल्या मुलीने कोल्हापूर जिल्ह्यातील सुभाष जाधव या शेतकरी तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साखरपुड्याला येण्याचे आग्रहाचं निमंत्रण स्वीकारत राजु शेट्टी यांनी काळमवाडी येथे साखरपुड्याला जाऊन नवदापत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, प्रकाश देसाई, रवींद्रनाथ दुकाने, रवि माने, विक्रांत कबुरे उपस्थित होते.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.