हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुसऱ्यांना आपल्या समर्थक आमदारांसह पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर वर जाऊन भेट घेतली. सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं. ,मात्र या भेटीचे कारण पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. पक्ष एकसंघ रहावा अशी विनंती आम्ही साहेबांना केली असल्याची माहिती पटेल यांनी दिली, परंतु शरद पवारांच्या मनात काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आज दुपारी अजित पवार यांच्यासह त्यांचे ३० पेक्षा जास्त आमदार शरद पवारांच्या भेटीला गेले. यावेळी तब्बल तासभर चर्चा झाली. त्यामुळे काका- पुतण्या मध्ये पॅच अप होणार का अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल कि, अजित पवार यांच्यासह इतर सर्व आमदार शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ रहावा अशी विनंती आम्ही साहेबांना केली आहे. परंतु त्यांच्या मनात काय सुरु आहे ही मी सांगू शकणार नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान शरद पवार यांच्यासोबत अजित पवार यांच्यासह इतर आमदारांची बैठक पार पडल्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या बैठकीमागील नेमके कारण काय होते हे देखील स्पष्ट झालेले नाही. शरद पवार यांनी यापूर्वीच आपण आपल्या पुरोगामी विचारावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं होते. त्यामुळे आता पुढील काळात राजकिय वर्तुळात काय घडेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.