हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचे फॉर्मुले ठरण्यास सुरुवात झाली आहे. यात शिवसेना ठाकरे गटासोबत वंचितने युती केल्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप करताना या पक्षाचा देखील विचार करावा लागणार आहे. यात प्रकाश आंबेडकर यांनी देखील आघाडीला जागा वाटपाचा फॉर्मुला दिला आहे. मात्र अद्याप आघाडीने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक मोठी ऑफर दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, “प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी बरखास्त करून आमच्यासोबत यावे. मी त्यांना माझ्या पक्षाचं अध्यक्षपद देतो. तसेच त्यांना माझं केंद्रीय मंत्रीपदही देतो” असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांनाही ऑफर दिली आहे. त्यामुळे आता यावर प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “प्रकाश आंबडेकर सक्षम नेते आहेत. वंचितने कुठे जावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते महायुतीसोबत येणार नाहीत. पण ते महाविकास आघाडीत जाणार आहेत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे. त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे”
दरम्यान, “2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आम्हाला 4 जागा मिळतील. इंडिया आघाडीला फारसे यश मिळणार नाही. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी ते मोदी यांना हरवू शकत नाही. कारण जनता मोदींच्या बाजूने आहे” असा दावा देखील रामदास आठवले यांनी केला आहे.