हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली असून उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांची ईडी कोठडी १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक विधान केले आहे. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र पुढे येत नाहीत असे आंबेडकर यांनी म्हंटल.
अनिल देशमुख यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असे आंबेडकर म्हणाले. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र पुढे येत नाहीत, असा दावा करतानाच राज्यपालांनी याचा विचार करावा असेही ते म्हणाले.
दरम्यान, त्यांनी नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपावरही भाष्य केले. नवाब मलिक यांनी जर अंडरवर्ल्डशी संबंधीत लोकांकडून जमीन घेतली हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती होत तर मग ते मुख्यमंत्री असताना मलिक यांच्यावर कारवाई का केली नाही? आपल्यावर शेकल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. एक प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण काढलं, असा आरोपही आंबेडकर यांनी केलाय