हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आग्रही असली तरी महाविकास आघाडी मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. भाजपकडून कसबा पेठ साठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेलं नाहीत. मात्र या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वाना पडला आहे. याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनाच विचारलं असता त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.
नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, आमची युती ही शिवसेनेसोबत असून आम्ही त्यांना विनंती केली आहे कि दोन्ही जागा तुम्हीच लढा. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेस आधीच हारली आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते हे आम्ही बघू आणि त्यांनंतरच आमची भूमिका स्पष्ट करू. परंतु सेनेचे उमेदवार असतील तर मात्र आमचा पाठिंबा पूर्णपणे आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.
मोठी बातमी!! महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची Entry
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/ibS5gHr8QD#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 5, 2023
दरम्यान, पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी फोनवरून चर्चाही केली. मात्र सध्या तरी महाविकास आघाडी या दोन्ही पोटनिवडणुका लढण्यावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक लढणारच अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.