हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावे 19 बंगले आहेत, असा आरोप केला. त्यानंतर 19 बंगले कुठे आहेत, ते दाखवा, असे आव्हान राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले होते. या प्रकरणी कोर्लई गावच्या सरपंचानी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबतीत केलेले आरोप हे खोटे आहेत, असे सरपंचानी म्हंटले आहे.
कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रश्मी ठाकरे याच्यावर किरीट सोमय्या यांनी 19 बंगले बांधले असल्याचा आरोप केला आहे. वास्तविक रश्मी ठाकरे यांनी 19 बंगले बांधलेलेच नाहीत. तर 18 घरे बांधली होती. तीही अन्वय नाईक यांनी रिसॉर्ट तयार करण्याच्या उद्धेशाने घरे बांधली होती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारल्याने ती पाडली.
त्या ठिकाणी झाडांची लागवड करून त्याची 2014 ला विक्री केली. 2013-14 मध्ये नाईक यांनी स्वतः ती घरे पाडली आहेत. 2014 ला रश्मी ठाकरे यांनी ती जमीन मनीषा वायकर यांना विकली. तर रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची कधीही माफी मागितलेली नाही, असे स्पष्टीकरण मिसाळ यांनी दिले आहे.