भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने सोमय्यांवर हल्ला; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते. यावेळी शिवसैनिकांकडून सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “सोमय्या यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारने छळवाद मांडला आहे. भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने हल्ला केला,” अशी टीका दरेकर यांनी केली.

प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल किरीट सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. अनिल परब म्हणतात हे होणारच होते. 100 ते 150 शिवसैनिकांनी हा कट पार पडला. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. झेड सिक्युरिटीच्या कवचात असलेल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला लज्जास्पद आहे.

यावेळी दरेकर यांनी राज्य सरकारला इशाराही दिला. ते पुढे म्हणाले की, भाजपने उद्या जर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले तर त्या आंदोलनाला सर्वस्वी सरकार जवाबदार असेल. देशात लोकशाही आहे. सोमय्या ज्या पद्धतीने पुराव्यासहित प्रकरण बाहेर काढत आहेत, याचा अर्थ सोमय्या यांनी केलेले आरोप खरे आहेत. भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने हल्ला केला. हल्ला करणारे शिवसैनिक आहेत, असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.