हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोलापूरमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या घटकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. हा गृहनिर्माण प्रकल्प तब्बल शंभर एकरामध्ये पसरलेला असेल ज्यामध्ये 30 हजार घरे उभारली जातील. यातील 15 हजार घरे ही उद्घाटना पूर्वीच बांधली गेली आहेत. आता या योजनेचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. या योजनेअंतर्गत 30 हजार कुटुंबांना हक्काची घरे देण्यात येतील. हा प्रकल्प गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाअंतर्गत राबविण्यात येत आहे.
हे कामगार असणार लाभार्थी
सोलापूरमध्ये उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाला केंद्र सरकारच्या PMAY चे सहाय्य देखील मिळेल. या प्रकल्पांतर्गत असंघटित कामगार, कापड कामगार, विडी कामगार, बांधकाम कामगार, कचरा वेचक आणि वस्त्र कामगार अशा सर्वांना हक्काचे घर देण्यात येईल. यातील प्रत्येक घर 300 चौरस फुटांमध्ये बांधलेले आहे. या घरांचा लाभ तीन लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना घेता येईल. या योजनेचा सर्वात जास्त हातावर पोट असलेल्या कामगारांना फायदा होईल.
15 हजार घरांचे बांधकाम पूर्ण
सध्या या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ही 15 हजार घरे कुंभारी गावात या वसाहतीत उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पाला 2019 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. हा प्रकल्प केंद्र सरकार आणि म्हाडाअंतर्गत राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत दुर्बल घटकातील कामगारांना मदत करणे त्यांना घरे उपलब्ध करून देणे असा उद्देश आहे. मुख्य म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आल्यामुळे यामध्ये केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार आवास योजनेवर जास्त भर देताना दिसत आहे. 2015 साली या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. आता या योजनेचा अनेक गरजू कुटुंबांना फायदा होत असल्याचे दिसत आहे. सोलापूरमध्ये देखील लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या पंधरा हजार घरांचे उद्घाटन केले जाईल. उद्घाटनानंतर ही घरे लाभार्थ्यांना सोपवली जातील.