कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सध्या गोवा विधानसभा निवडणुकीमुळे अनेक पक्षांकडून गोव्यात प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दरम्यान आज काँग्रेसच्यावतीने गोव्यात महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवनिशाणा साधला. “भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पणजीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनिल कवठणकर आणि नौशाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, “महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करावा लागणार आहे. नोटबंदी, तसेच वस्तू आणि सेवाकर (GST) लागू करणे हे मोदी सरकारची मोठी चूक होती. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी गोव्यातील जनता देणार नाही.’’
‘‘सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. पण मोदी सरकार ती फुगवून दाखवत आहे.’’ मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि सद्याची स्थिती खुपच गंभीर आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोदी कसे आकडे दाखवतात त्याच्यावर देशातील लोकांची नजर आहे. “मोदी सरकारने महागाई वाढवून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भावनांशी खेळ केला आहे. लोकांना त्रास दिला आहे. असे असताना, त्यांच्या भांडवलदार मित्रांचे उत्पन्न दिवसेंदिवस हजारो कोटींनी वाढत आहे.” असे चव्हाण म्हणाले.
पाच राज्यात महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन
यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करीत लोकार्पण केले. या पुस्तिकेचे प्रकाशन देशात एकाचवेळी पाच राज्यातील 7 ठिकाणी करण्यात आले. यामध्ये गोव्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, लखनऊ येथे रणदिप सुरजेवाला, चंदीगड येथे छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल, जलंधर येथे दिग्विजय सिंह, डेहराडून येथून सचिन पायलट, मेरठ येथून हार्दिक पटेल आदींनी महागाई वरील पुस्तिकेचे प्रकाशन केले.