सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला विधानसभेच्या तोंडावरच आणखी एक धक्का बसला आहे. चव्हाण यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार आनंदराव पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत स्वतःची भूमिका कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये जाहीर केल्यानंतर आठच दिवसात त्यांचे पुत्र प्रताप पाटील व पुतणे शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत.
मुंबई येथे सोमवारी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सुरू आहे.
सातार्याच्या दोन्ही राजांनी काही दिवसांपूर्वी भाजपा प्रवेश केला आहे. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक आमदार आनंदराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा असतांना त्यांचा पक्ष प्रवेश जरी अद्याप झाला नसला तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून वेगळे राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. मात्र, त्यांचे पुत्र प्रताप पाटील व पुतणे सुनिल पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त समोर येत आहे.