अजित पवारांच्या बंडानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं ‘ते’ भाकित चर्चेत; Video सोशल मीडियावर Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह बंडखोरी करत शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सहभाग घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यांच्यासोबत ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या एकूण सर्व राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. याच दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागील महिन्यातील एका भाषणाची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत जाणार ही भविष्यवाणी पृथ्वीराज चव्हाणांनी आधीच केली होती. याबाबतचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण कर्नाटकात गेले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका करत भाजपसोबत काही राष्ट्रवादी नेत्यांची बोलणी सुरु असल्याचा आरोप केला होता. अजून तरी ते नेते आमच्यासोबत महाविकास आघाडीत आहेत, पण अजून किती दिवस ते आमच्यासोबत राहतील ते माहित नाही. कोण नेता जाणार, कोण राहणार याबाबत रोज पेपरमध्ये बातम्या येत आहेत. त्यांना काय निर्णय घायचा तो घेऊद्या असं पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या जाहीर भाषणात म्हंटल होते. आज अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं ते भाकीत खरं ठरल्याचे स्पष्ट झालं.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ३० पेक्षा अधिक आमदार आहेत. आमदार फोडल्यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हांवरच दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकार सोबत आलो आहोत. पक्षातील आमदार माझ्या सोबत असून आम्ही येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी म्हणूनच घड्याळ या चिन्हावर लढवणार आहोत असं अजित पवार यांनी म्हंटल. त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्षानंतर आता येत्या काळात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतो.